Friday, 22 May 2020

ग्रामीण भागातील सर्व कार्यालये नियमित सुरु राहतील - रविंद्र ठाकरे


मास्क व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक

        नागपूर, दि. 22 :  नागपूर शहर हद्दी बाहेरील क्षेत्र रेड झोनमध्ये नसल्यामुळे सर्व शासकीय व इतर कार्यालये नियमितपणे सुरु राहणार आहेत. तथापि कोरोना संसर्गाचा धोका  टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग तसेच मास्क लावणे व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी  आज दिली.
            कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. नागपूर शहर वगळता ग्रामीण भागात सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अत्यावश्यक  वस्तूंच्या दुकानासह शेती व इतर साहित्याची दुकाने सुरु राहणार आहेत. परंतु सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत ग्रामीण भागात संचारबंदी लागू राहणार आहे. संचारबंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे राबविण्यात येणार असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेला केले आहे.
            ग्रामीण भागात उद्योग व व्यापार सुरु राहणार असला तरी कोरोनासंदर्भात लागू करण्यात आलेल्या आरोग्य विषयक सूचनांची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर तसेच सॅनिटायझरचा वापर न करणाऱ्या आस्थापना व व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश अंमलबजावणी यंत्रणांना देण्यात आले आहे. या नियमांचे पालन न झाल्यास ग्रामीण भागातही पूर्ववत निर्बंध लावण्यात येतील. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
            मुंबई, पुण्यासह रेड झोनमधून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. अशा नागरिकांना 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येईल. ग्रामस्थांनी गावात येणाऱ्या अशा नागरिकांबद्दल संबंधित यंत्रणांना माहिती देवून प्रशासनाला सहकार्य करावे. वाहन चालवितांना दिलेल्या निर्देशानुसारच दुचाकी व चारचाकी वाहनांना परवानगी आहे. जिल्हाअंतर्गत बससेवा सुद्धा सुरु करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
*****

No comments:

Post a Comment