Friday, 5 March 2021

जागतिक महिला दिनापासून विभागात राज्य महिला आयोगाचे कार्यालय सुरु · सोमवारी प्रकरणांची सुनावणी नागपूर, दि. 5 : यंदाच्या जागतिक महिला दिनापासून नागपुरात राज्य महिला आयोगाचे विभागीय कार्यालय सुरु करण्यात येत आहे. त्या दिवशी विभागातील सर्व जिल्ह्यातील पीडित महिलांच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने ऐकून घेतल्या जाणार असून, त्यांचे समुपदेशनही करण्यात येणार आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारींचे या कार्यालयाच्या मार्फत तात्काळ निवारण तसेच त्यांचे समुपदेशन केले जाईल. स्थानिक पोलिस ठाण्यांकडून यासाठी सहकार्य घेतले जाणार आहे. अतिमहत्त्वाच्या गंभीर स्वरुपाच्या तक्रारी किंवा स्वत:हून नोंद घेण्याच्या तक्रारींबाबत राज्य महिला आयोगाच्या सल्ल्याने कार्यवाही करण्यात येणार आहे. ही सुनावणी विभागीय कार्यालयाकडून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून, त्यासाठी कार्यालयामध्ये विधी सल्लागार, संरक्षण अधिकारी, समुपदेशक व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तरी नागपूर‍ विभागातील अत्याचार पीडित महिलांनी समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्य महिला आयोग, शासकीय करुणा महिला वसतिगृह, पाटणकर चौक, नारी रोड, नागपूर‍ येथे किंवा ddy.commissionernagpur@rediffmail.com किंवा 0712-2640050 येथे प्रत्यक्ष संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय उपायुक्त, महिला व बालविकास यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. *****

No comments:

Post a Comment