Saturday, 6 March 2021

शहीद जवानाच्या कुटुंबियांच्या पाठीशी प्रशासन; पालकमंत्र्यांच्या शोकसंवेदना

शहीद जवानाच्या कुटुंबियांच्या पाठीशी प्रशासन; पालकमंत्र्यांच्या शोकसंवेदना नागपूर दि.6 : छत्तीसगडमधील कोहकामेटा परिसरात नक्षली विरोधी कारवाई दरम्यान भिवापूर येथील 40 वर्षीय जवान मंगेश हरिदास रामटेके हे शहीद झाले. पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी शहीद जवानाच्या कुटुंबीयाप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. शहीद जवान मंगेश हरिदास रामटेके हे इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस ( आयटीबीपी ) सेवेत होते. कोहकामेटा परिसरात 5 मार्च रोजी नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंग स्फोटात ही दुर्घटना घडली. नक्षलवाद्यांविरुद्ध लढताना त्यांना वीर मरण आले. पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज जाहीर केलेल्या आपल्या शोक संदेशात मंगेश रामटेके यांच्या कुटुंबीयांसोबत शासन असल्याचे सांगितले. नक्षली विरोधात लढताना भिवापूरच्या या जवानाला वीर मरण आले असून त्यांच्या शौर्याची आणि समर्पणाची समाज कायम आठवण ठेवेल. रामटेके कुटुंबीयांची ही कधीही भरून न निघणारी हानी असून या दुःखद क्षणी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण रामटेके कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. *****

No comments:

Post a Comment