Friday, 31 January 2025

खेळाडुवृत्तीचे प्रदर्शन करा व विभागासाठी कार्यक्षमतेने कार्य करा - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

 


Ø  जलसंपदा विभागाच्या चतुर्थ राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेची दिमाखदार सुरुवात

Ø  1600 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग; 2 फेब्रुवारीपर्यंत स्पर्धेचे आयोजन

 

नागपूर, दि.31 : राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये खेळाडुवृत्तीचे उत्तम प्रदर्शन करा, आयुष्यात शरीर सदृढ ठेवा, व्यसनापासून दूर रहा आणि जलसंपदा विभागासाठी कार्यक्षमतेने कार्य करा, असा संदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिला.

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाच्या रवि नगर येथील क्रीडा संकुलात जलसंपदा विभागाच्या चतुर्थ राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-2025 चे उद्घाटन श्री. महाजन यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे आदी उपस्थित होते. जलसंपदा विभागाच्या एकूण 9 विभागांचे 1600 खेळाडू सहभागी झाले असून 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 



जलसंपदा मंत्री श्री. महाजन म्हणाले, राज्यातील उद्योग, शेती, उर्जा प्रकल्प आदिंना पाणी पुरवठा करण्याची महत्वाची भूमिका जलसंपदा विभाग पार पाडत आहे. विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमुळे हे कार्य अधिक प्रभावीपणे करता येते. त्याकरिता त्यांचे आरोग्य उत्तम राहणे आवश्यक आहे. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम, आहार, विहार गरजेचा आहे. तसेच व्यसनापासून दूर राहणे तेवढेच महत्वाचे आहे. हे लक्षात घेवूनच या विभागाचा मंत्री म्हणून 2017 मध्ये छत्रपती संभाजी नगर येथे जलसंपदा विभागाची पहिली राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. स्वत: एक उत्तम खेळाडू असून गेल्या जवळपास 40 वर्षांच्या राजकीय जीवनातील व्यस्ततेतही नियमीत व्यायाम करतो व व्यसनापासून दूर असल्याचे सांगून त्यांनी स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडुंना शुभेच्छा दिल्या.

 



वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी शासकीय नोकरीमध्ये कामासोबतच खेळाला असलेल्या महत्वाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच राज्य शासनाच्या विविध विभागांच्या आंतरविभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

स्पर्धेमध्ये जिंकण्याची इच्छाशक्ती शेवटपर्यंत कायम ठेवून खेळाडुवृत्तीचे उत्तम प्रदर्शन करा, असा संदेश अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी यावेळी दिला.   

                                                                                                                    

कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीत व महाराष्ट्र गिताने झाली. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिक्षक अभियंता सोनाली चोपडे यांनी क्रीडा शपथ दिली. सचिव संजय बेलसरे यांनी प्रास्ताविक केले. रेणुका देशकर यांनी सूत्रसंचलन केले तर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के यांनी आभार मानले.

 

तत्पूर्वी, श्री. महाजन यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. पोलीस बँड पथकाच्या तालावर दहा संघांनी यावेळी पथ संचलन केले. यात मंत्रालय मुंबई संघ, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजी नगर, तापी पाट बंधारे विकास महामंडळ जळगाव, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था नाशिक, यांत्रिकी पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय पुणे, गुणनियंत्रण, जलविद्युत, मुख्यलेखा परीक्षक, जल व सिंचन छत्रपती संभाजीनगर, स्वेच्छेने सहभागी झालेले शेगाव येथील गजानन महाराज संस्थेचे सेवेकरी, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर अशा 10 संघांचा समावेश होता.

 

शुभारंभाच्या कार्यक्रमानंतर श्री. महाजन यांच्या हस्ते 100 मिटर धावण्याच्या स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून या आयोजनातील पहिल्या स्पर्धेचे उद्घाटन झाले.

 

            स्पर्धेत सहभागी 1600 खेळाडुंपैकी 550 महिला खेळाडू असून क्रिकेट, कबड्डी, व्हॉली बॉल आदी क्रीडा स्पर्धांसह गायन, संगीत, नाटक, एकांकिका, छायाचित्र आदी सांस्कृतिक स्पर्धा होणार आहेत.


*****

Thursday, 30 January 2025

विभागीय आयुक्त कार्यालयात हुतात्म्यांना अभिवादन

 





नागपूर, दि. 30 देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना आज विभागीय आयुक्त कार्यालयात हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

आयुक्तालयाच्या प्रांगणात हुतात्मा दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात  हुतात्म्यांना श्रध्दांजली देण्यात आली. यावेळी अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) प्रदीप कुलकर्णी, उपायुक्त (विकास) कमलकिशोर फुटाणे, उपायुक्त (विकास-आस्थापना) विवेक इलमे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

*****

 

Tuesday, 28 January 2025

नागपूर जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे थाटात उद्घाटन

 

Ø  ३१ जानेवारी पर्यंत मानकापूर क्रीडा संकुल येथे आयोजन

           नागपूर, दि. २९ :  जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय महसूल व सांस्कृतिक स्पर्धेचे आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या हस्ते मानकापूर विभागीय क्रीडा संकुल परिसरातील मैदानावर थाटात उद्घाटन झाले.

 जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी स्पर्धेत सहभागी स्पर्धकांची भेट घेवून संवाद साधला व त्यांना प्रोत्साहन दिले. जिल्हाधिकारी  कार्यालयाच्यावतीने दरवर्षी जिल्ह्यातील महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकरिता क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. वर्ष २०२४-२५ च्या स्पर्धेचे आज उद्घाटन झाले. अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 श्री. महामुनी यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून तसेच हवेत फुगे सोडून या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यानंतर स्पर्धेत सहभागी संघांचे पथसंचलन झाले.  मान्यवरांनी उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

 उपविभागीय कार्यालय मौदा, सावनेर, उमरेड, काटोल, रामटेक यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय आणि उपविभागीय कार्यालय नागपूर ग्रामीण असे एकूण आठ संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. कोतवाल, तलाठी, महसूल सहायकापासून अधिकारी यांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

 श्री.महामुनी यांनी पुरूषांच्या ४५ वर्षा खालील गटात १०० मिटर धावण्याच्या स्पर्धेस हिरवी झेंडी दाखवून या स्पर्धांचेही औपचारिक उद्घाटन केले.

 यावेळी पथसंचलनाचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय नागपूरने पथसंचलनात पहिला क्रमांक पटकाविला, उपविभागीय कार्यालय काटोल दुसऱ्या तर उपविभागीय कार्यालय उमरेड तिसऱ्या स्थानावर राहिले.

                हिंगणा नायब तहसीलदार सुजाता गावंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.  ३१ जानेवारी २०२५ पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.

 


००००

 


मनीष नगर परिसरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यास मदत होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


मनीषनगर आरयूबीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर, दि. २८ - मनीष नगरचा कनेक्टिव्हिटीचा प्रश्न हा गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून सतावतो आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी गेल्या काळात  एका फ्लायओव्हरची निर्मिती या भागात करण्यात आली. मात्र त्यातून वाहतुकीची समस्या फारशी सुटली नाही. त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून ही दुसरी कनेक्टिव्हिटी आपण या भागात सुरू करण्याचा निर्णय घेतला. यातून या भागातील वाहतुकीची समस्या सोडविण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 शहरातील सोमलवाडा (मनीषनगर) भागातील नागरिकांची वाहतूक कोंडीपासून सुटका करणा- या रेल्वे अंडर ब्रिजचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.


या कार्यक्रमाच्या लोकार्पणप्रसंगी वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल
, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आ .कृपाल तुमाने, व्यवस्थापकीय संचालक- महा मेट्रो श्रावण हर्डीकर, महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी  आदी यावेळी  प्रामुख्याने उपस्थित होते.

अतिशय आव्हानात्मक प्रकारचे हे काम होते. महा मेट्रोसह सर्वांनी चांगले काम केले आहे त्यातून ही कनेक्टिव्हिटी तयार झाली आहे. लवकरच मनीष नगरला जोडणारी तिसरी कनेक्टिव्हिटी ही आपण या भागात तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. आपण एक अंडरपास तयार केला होता. पण त्यातून समस्या सुटली नाही. म्हणून दुसऱ्या प्रकल्पाची योजना आखण्यात आली. नवीन अंडरपाससाठी जागेची निवड करण्यात आली आणि महामेट्रोकडे कामाची जबाबदारी सोपविण्यात आली. आता तिसराही उड्डाणपूल महाराष्ट्र सरकारने मंजूर केला आहे. हा उड्डाणपूल थेट हॉटेल रेडिसनजवळ उतरणार आहे. त्यामुळे भविष्यात मनीषनगर, बेसा, बेलतरोडी येथील नागरिकांची अधिक सोय होणार आहे. या भागात रेल्वेचे फाटक होते. पण १७० रेल्वे धावत असल्यामुळे नागरिकांना त्रास व्हायचा. आता नवीन अंडरपासमुळे हा त्रास दूर झाला आहे, असे केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले.

सोमलवाडा (मनीषनगर) येथील रेल्वे अंडर ब्रिजविषयी...

सोमलवाडा (मनीष नगर) आरयूबी प्रकल्पाचा एकूण खर्च ३३.८३ कोटी रुपये असून, आरयूबीची लांबी १९० मीटर, रुंदी ८ मीटर आणि उंची ४ मीटर आहे. आरयूबीचे निर्माण मुंबई-हावडा व दिल्ली-चेन्नई या निरंतर व्यस्त रेल्वे मार्गावर करण्यात आले आहे. या अंडर ब्रिजमध्ये पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र पादचारी मार्ग देखील उपलब्ध करण्यात आला आहे. आरयूबीमुळे मनीषनगर परिसर आणि वर्धा मार्ग यांच्यात चांगली कनेक्टिव्हिटी होईल. याचा मोठा फायदा मनीषनगर, बेसा, घोगली आणि बेलतरोडी येथील लाखो नागरिकांना होईल. रेल्वे फाटकामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळेल तसेच यामुळे या परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून मुक्ती मिळेल. तसेच मनीषनगर येथील रहिवाश्यांना वर्धा मार्गावर सहज प्रवेश मिळवता येईल.  क्रॉसिंगवर होणारा जामचा त्रास दूर होईल आणि त्यासोबतच प्रवासात वेळेचीही बचत होईल.

 

00000


विधीतज्ज्ञांच्या घडवणूकीसाठी उत्तम विधी महाविद्यालयांची नितांत गरज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी समारोहाचे उद्घाटन

नागपूर,दि. 28 : लोकशाही व्यवस्थेमध्ये कायद्याचे राज्य या संकल्पनेला सवोच्च स्थान आहे.  न्यायव्यवस्था हा सर्वात महत्वाचा लोकशाहीचा स्तंभ म्हणून आपण पाहतो. आजही नागरिकांचा सर्वाधिक विश्वास हा न्याय व्यवस्थेवर आहे. हा विश्वास कायम ठेवण्यासाठी उत्तम वकील आवश्यक आहेत. उत्तम वकील तयार करण्यासाठी चांगली महाविद्यालय व अनुभवी गुरुजन वर्गाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी समारोहाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री आशिष जैस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे, न्यायमूर्ती व्ही एस सिरपूरकर, प्राचार्य डॉ रविशंकर मोर, रजिस्ट्रार डॉ राजू हिवसे यांची प्रमूख उपस्थिती होती.

मी जे काही घडलो त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचा वाटा खुप मोठा आहे. येथील गुरुजनांनी दिलेल्या ज्ञानाच्या बळावर एक आमदार ते मुख्यमंत्री म्हणून कायदेमंडळाच्या प्रतिनिधीत्वाची  महत्वपूर्ण जबाबदारी मी विश्वासाने सार्थ करु शकत असल्याच्या कृतार्थ भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. कायदेमंडळाचा प्रतिनिधी म्हणून कायदेविषयक संकल्पना या अतिशय सुस्पष्ट माहित असणे आवश्यक आहेत. त्याबळावर आमदार म्हणून पहिल्याच टर्ममध्ये मला उत्कृष्ट संसदपटुचा पुरस्कार मिळाला असे त्यांनी सांगितले. 

ज्ञानाच्या परिभाषा या कृत्रिम बुध्दीमत्तेच्या पार्श्वभूमीवर वेगाने बदलत आहेत. सर्वच ज्ञान शाखांना हे आव्हान आहे. या बदलत्या तंत्रज्ञानाचा चपखल उपयोग आपण केला पाहिजे.  न्याय प्रणालीला यातून गती मिळू शकते हे आपण समजून घेतले पाहिजे. न्यायव्यवस्था जर उत्तम हवी असेल तर उत्तम वकील आवश्यक आहेत. उत्तम वकील तयार करण्यासाठी चांगली महाविद्यालय व अनुभवी गुरुजन वर्गाची आवश्यकता आहे. महाराष्ट्रामध्ये यादृष्टीने चांगल्या तीन लॉ स्कुल अर्थात विधी महाविद्यालय उभारण्याचे भाग्य मला मिळाले. न्यायमूर्ती  सिरपूरकर यांच्या पुढाकाराने इथे आपण नॅशनल लॉ स्कुल उभारू शकलो, असे ते म्हणाले.

शंभर वर्षाचा वैभवी वारसा असलेल्या या महाविद्यालयाच्या नवीन वास्तुला शासनातर्फे  सर्वोतोपरी मदत करु. यात कोणतीही कमतरता आम्ही पडू देणार नाही. या महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून  मला उपस्थित रहातांना मनस्वी आनंद झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.  

लोकशाही मूल्यांमध्ये सर्वांत महत्वाचे मूल्य हे संविधानातील मूलभूत तत्वात आहे. या मूलभूत तत्वांवरच सर्वांना न्यायाची हमी आहे. वेळेत न्याय मिळणे यातच लोकशाहीच्या सक्षमीकरणाचा मार्ग दडला असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. प्रबोधन, प्रशिक्षण, संशोधन यात त्रिसुत्रीवरच कोणत्याही शिक्षण संस्थांचा पाया भक्कम होत जातो.  बदलते तंत्रज्ञान याचा विधी प्रक्रियेत जितका चांगला उपयोग होईल त्या प्रमाणात दीर्घकाळ चालणारे न्यायालयीन प्रकरणे तत्काळ मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य  डॉ. रविशंकर मोर यांनी केले. यावेळी कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी महाविद्यालयातून घडलेल्या न्यायमूर्तींचा गौरवाने उल्लेख केला. चांगल्या शिक्षणसंस्था या समाजाच्या संमृध्दीचे द्योतक असतात, असे त्यांनी सांगितले.

00000

 


Monday, 27 January 2025

विभागीय आयुक्त कार्यालयात 'मराठी भाषा पंधरवाडा' साजरा Ø विविध स्पर्धांचे आयोजन आणि उत्स्फूर्त सहभाग


             नागपूर, दि. २७ : विभागीय आयुक्त कार्यालयात आज विविध स्पर्धांचे आयोजन करून मराठी भाषा पंधरवाडा साजरा झाला. या कार्यक्रमात विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.

     आयुक्त कार्यालयातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन अपर आयुक्त सामान्य प्रशासन  प्रदीप कुलकर्णी यांच्या हस्ते आणि प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी दिपाली मोतीयेळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या संयोजक तथा सहायक आयुक्त भूसुधार, शिल्पा सोनुले, तहसीलदार संदीप माकोडे, स्पर्धेचे  परीक्षक अध्यापक महाविद्यालयाचे प्रा. डॉ. शैलेश गायकवाड आणि वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयाच्या प्रा. पल्लवी कर्वे यावेळी उपस्थित होत्या.

 


श्री. प्रदिप कुलकर्णी आणि दिपाली मोतीयेळे यांनी मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा, मराठीतील विविध भाषा व्यवहार आणि मराठीच्या संवर्धनासाठी आवश्यक प्रयत्न याबाबत विचार मांडले.

 मराठी भाषेच्या महत्वावर आधारित निबंध लेखन, प्रशासकीय व न्यायालयीन शब्दांवरील प्रश्न मंजुषा, शुद्ध लेखन आणि कविता वाचन स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या. विभागीय आयुक्तालयातील  विविध विभाग, लेखा व कोषागारे, नागरी हक्क संरक्षण, पोलीस, वने, सार्वजनिक बांधकाम आदी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. संदीप माकोडे यांनी सूत्रसंचालन केले तर शिल्पा सोनुले यांनी आभार मानले.

 


उद्या २८ जानेवारी रोजी स्पर्धेचा निकाल जाहीर होणार असून बक्षीस वितरण होईल. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार या महाराष्ट्र शासनाच्या मुख्य धोरणानुसार शासकीय कार्यालयांमध्ये १४ ते २८ जानेवारी दरम्यान दरवर्षी मराठी भाषा पंधरवाडा साजरा करण्यात येतो.

                   ०००००

 

शालेय विद्यार्थ्यांनी केला देशप्रेम व संविधान जागृतीचा जागर प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

 



          नागपूर, दि. 26 :  एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीते, नाटिका आणि संविधानाचे महत्त्व पटवून देणाऱ्या दमदार प्रस्तुतीने प्रजासत्ताक दिनाची सायंकाळ देशभक्तीमय झाली. औचित्य ठरले जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने काटोल रोड वरील जिल्हा परिषद कन्या शाळेमध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे. 

            जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रोहिणी कुंभार आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सिध्देश्वर काळुसे यांच्या हस्ते या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.



            नगरपरिषद शाळा कळमेश्वरच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या 'या देशाची शान आणि भारतीयांचा प्राण आमचे संविधान...' या संविधान गिताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याचं शाळेच्या विद्यार्थ्यांनी 'आम्ही भारताचे लोक...' हे भारतीय राज्यघटना व त्याचे देश विकासातील महत्व विशद करणारे समूह नृत्य सादर केले. या दोन्ही प्रस्तुतींनी उपस्थितांची मन जिंकली.

            जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय अंबाझरीच्या विद्यार्थ्यांनी 'आम्ही जातीचे शेतकरी, खातो कष्टाची भाकरी..' हे कृषी क्षेत्राचे महत्त्व सांगणारे शेतकरी  गीत सादर केले. याच विद्यालयाने 'गर्जा महाराष्ट्र माझा' आणि 'वंदे मातरम' या गीतांवर नृत्य सादर केले.



            लावा येथील न्यू स्टार पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासी गेलेले थोर क्रांतिकारक राजगुरू, भगतसिंह आणि सुखदेव यांच्या जीवनावरील चित्तथरारक व देशप्रेमाने ओतप्रोत संगीत नाटिका सादर केली. नागपूर शहर व ग्रामीण भागातील मनपा, जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांमध्ये बहारदार प्रस्तुती दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाचपावली येथील एससीएस गर्ल्स ज्युनिअर कॉलेजच्या मराठी विभाग प्रमुख शालिनी तेलरांधे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच प्रगती शाळांना 2024-25 चे पुरस्कारही प्रदान करण्यात आले.

 

00000

 

--


Sunday, 26 January 2025

विकसित महाराष्ट्रासाठी संकल्पबद्ध होवून काम करुया – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे










  

कस्तुरचंद पार्क मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम उत्साहात साजरा

 

                        पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्यासह उत्कृष्ट कार्यासाठी

विविध क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांचा सत्कार

 

नागपूर, दि. 26 : नागपूर आणि विदर्भात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. रोजगार निर्मिती, उद्योगांचा विकास, शिक्षण, आरोग्य, कृषी, महसूल अशा सर्वच क्षेत्रात विकास सुरु असून  देशासह महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वांनी संकल्पबद्ध होवून कार्य करण्याचे आवाहन, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.

            कस्तुरचंद पार्क मैदानावर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार श्यामकुमार बर्वे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, अपर आयुक्त डॉ. माधवी चवरे, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिना, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

            महसूल मंत्री श्री.बावनकुळे म्हणाले, इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोखडातून स्वतंत्र झालेल्या भारतदेशाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले. संविधानाला आधार ठेवूनच देशाची विविध क्षेत्रात प्रगती होत आहे. प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतदेश तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकासाकडे अग्रेसर झाला आहे. प्रधानमंत्र्यांनी देशाला वर्ष 2047 पर्यंत विकसित करण्याचा संकल्प केला आहे व या दिशेने कार्य सुरु आहे. पुढच्या दहा वर्षात देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने विविध क्षेत्राचा विकास होत आहे. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याने भारताच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमी फोरममध्ये मुख्यमंत्र्यांनी राज्यात 15 लाख 70 हजार कोटींची गुंतवणूक आणली. नागपूरसह विदर्भातही मोठी गुंतवणूक आली आहे. नागपुरात रोजगार निर्मितीसाठी ऑटोमोबाईल ईव्ही क्षेत्रात 500 कोटी तर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात (लिथियम बॅटरी) 42 हजार कोटींची गुंतवणूक आली आहे. बुटीबोरी भागात हरीत ऊर्जा क्षेत्रात जवळपास 16 हजार कोटींची गुंतवणूक आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात स्टील व मेटलमध्ये 10 हजार 319 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.  

            नागपूर शहरातील मेयो, मेडीकल आणि डागा रुग्णालयांच्या बळकटीकरणाकरिता राज्य शासनाने भरघोस निधी दिला आहे. उच्च तंत्रज्ञानाधारीत आरोग्य सुविधा येथे पुरविण्यात येत आहेत. दिवांग्य पार्क, ॲग्रो टुरीझम, मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल, कौशल्य विकास केंद्र उभारण्याच्यादृष्टीने जोमाने कार्य सुरु आहे. पायाभूत सुविधांसह सर्वच क्षेत्रात नेटाने कार्य करुन येत्या 5 वर्षात नागपुरला अंतरराष्ट्रीय शहर बनविण्यासाठी प्रयत्‍ करु, असेही त्यांनी सांगितले.                                  कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी राज्य सरकार कटीबद्ध असून विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. महसूल विभागाच्या योजना सुलभ पद्धतीने राबविण्यात येत असल्याचे सांगत पीएम किसान योजनेच्या लाभाचे थेट हस्तांतरण, पीक विमा योजनेसाठी पिकांच्या नुकसानीची अचूक नोंद, पीक कर्ज मिळण्यासाठी शेतकरी ओळखपत्र देणारी ॲग्रीस्टॅक योजना सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ॲग्रीस्टॅक योजनेद्वारे शेतकऱ्यांना रियल टाईममध्ये आवश्यक माहिती व सेवा उपलब्ध होणार आहे. या महत्वाकांक्षी योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहनही त्यांनी केले.  महसुलासह अन्य विभागांच्या योजनांचा लाभ सामान्य जनतेला होण्यासाठी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितले. शासन, प्रशासन आणि लोकसहभागातून विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी संकल्पबद्ध होऊन काम करुया असेही ते म्हणाले.

तत्पूर्वी, श्री. बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. परिमंडळ ३ नागपुरच्या पोलीस उपायुक्त महक स्वामी यांच्या नेतृत्वात खुल्या जिप्सीमधून श्री. बावनकुळे यांनी परेड निरीक्षण केले. राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ४, नागपूर शहर पोलीस, नागपूर ग्रामीण, नागपूर लोहमार्ग पोलीस, महिलांचे गृहरक्षकदल, भोसला सैनिकी शाळा, श्वान पथक, प्रहार समाज जागृती संस्था व प्रहार डिफेन्स अकादमी आदी पथकांनी पथसंचलन केले. विविध विभागांच्या चित्ररथांचे पथसंचलनही यावेळी झाले.

उत्कृष्ट कार्याचा सन्मान

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा श्री. बावनकुळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस उपायुक्त रोशन यादव, वरिष्ठ तुरुंगाधिकारी वामन निमजे आदींसह राष्ट्रपती पदक विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. ध्वजनिधी संकलन, गौरव पुरस्कार, जिल्हा क्रीडा पुरस्कार, जिल्हा युवा पुरस्कार, पोलीस पाटील उल्लेखनीय शौर्य पुरस्कार आदी पुरस्कार प्रदान करण्यात आले.  यावेळी जिल्हा परिषद व महानगरपालिका शाळांच्या विद्यार्थ्यांनी कवायती व सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रस्तुती दिली.

‘घर घर संविधान’ चित्ररथास हिरवी झेंडी

भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने श्री. बावनकुळे यांच्या हस्ते समाज कल्याण विभागाच्या ‘घर घर संविधान’ या प्रचार, प्रसिद्धी व जनजागृती चित्ररथास हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी हा चित्ररथ संपूर्ण जिल्ह्यांमध्ये फिरवण्यात येणार असल्याची माहिती दिली. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक साळीवकर, आकाशवाणीच्या प्रांजली बाविस्कर आणि महेश बागदेव यांनी केले.

                                                            ******