भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र सुधारण्यासाठी बैठक
Ø भारतीय प्रशासकीय सेवेतील मराठी टक्का वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील
Ø स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक बनण्याचा विभागातील सनदी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला मनोदय
नागपूर, दि. 24 : भारतीय प्रशासकीय सेवेत मराठी विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेचा टक्का वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. विदर्भात स्पर्धा परिक्षेची चिकाटी व ध्येयाने तयारी करणारे विद्यार्थी असून आपल्या कार्यक्षेत्रातील अशा विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये पाठविण्यास प्रेरीत करा, असे आवाहन राज्याचे माजी मुख्यसचिव जे. पी. डांगे यांनी आज नागपूर विभागातील सनदी अधिकाऱ्यांना केले. विभागातील सनदी अधिकाऱ्यांकडून प्राप्त महत्वाच्या सूचना शासनापर्यंत पोहचविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या प्रशिक्षण केंद्राप्रमाणेच जिल्हास्तरावर केंद्र सुरू व्हावे, स्पर्धा परीक्षेच्या खाजगी क्लासेसची जिल्हाधिकाऱ्यांनी नोंदणी करून विद्यार्थ्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या भागातील विद्यार्थ्यांचे सनदी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन व समुपदेशन करावे, स्पर्धा परीक्षेचे इंग्रजीत उपलब्ध साहित्य मराठीत अनुवादित व्हावे आदी महत्वाच्या सूचना नागपूर विभागातील सनदी अधिकाऱ्यांनी केल्या. तसेच स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक बनण्याचा मनोदयही व्यक्त केला.
माजी मुख्य सचिव जे.पी. डांगे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. त्यांनी नागपूर विभागातील सर्व सनदी अधिकाऱ्यांची विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. यावेळी त्यांनी काही सूचना केल्या व माहिती जाणून घेतली. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, अपर आयुक्त डॉ. माधवी चवरे, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिना, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूरचे संचालक डॉ. प्रमोद लाखे आदींसह विभागातील सनदी अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी राज्यात नागपूरसह एकूण सहा प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहेत. नागपूर येथील प्रशिक्षण केंद्र 1985 पासून कार्यरत असून 120 विद्यार्थ्यांना दरवर्षी या केंद्रात प्रवेश दिला जातो. त्यासाठी घेण्यात येणारी चाळणी परिक्षा व संबंधित प्रक्रीया याविषयी डॉ. प्रमोद लाखे यांनी माहिती दिली. यावेळी उपस्थित सनदी अधिकाऱ्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत मराठी टक्का वाढण्यासाठी शासनाच्या प्रशिक्षण केंद्र बळकट करण्याकरिता विविध उपाय सूचविले. यामध्ये प्रामुख्याने राज्य शासनाच्या राज्यातील प्रशिक्षण केंद्राच्या धरतीवर जिल्हास्तरावरही असे केंद्र सुरु होवून एक ते दोन महिन्याचे लघु अभ्यासक्रम सुरू व्हावे अशी सूचना देण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील स्पर्धा परिक्षेच्या खाजगी कोचींग क्लासेसची नोंदणी करून विद्यार्थ्यांची फसवणूक होणार नाही व या विद्यार्थ्यांना उचित मार्गदर्शन व समपुदेशन मिळावे असेही सांगण्यात आले. नागपूरमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवा व भारतीय पोलीस सेवेसह अन्य सेवेमध्ये कार्यरत सनदी अधिकाऱ्यांनी नागपूर येथील राज्य शासनाच्या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक बनावे असे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी केले.अपयश आलेल्या विद्यार्थ्यांना सावरून पुढे जाण्यासाठी उचित मार्गदर्शन करण्याकरीता समुपदेशन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यास उपस्थित अधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली.
मनपा आयुक्त डॉ. चौधरी यांनी नागपूरातील प्रशिक्षण केंद्राद्वारे विभागातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थ्यांसाठी दरमहिन्याला विशेष कार्यक्रम घ्यावा व उपक्रमासाठी मनपातर्फे कविवर्य सुरेश भट सभागृह उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले. मुळचे अन्य राज्यातील सनदी अधिकाऱ्यांनी त्यांच्या राज्यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध सेवांविषयी माहिती दिली व राज्यातील प्रशिक्षण केंद्र बळकट करण्यासाठी सूचना केल्या.
00000
No comments:
Post a Comment