Friday, 24 January 2025

जादुटोणा विरोधी कायद्याच्या जनजागृतीसाठी सामाजिक संस्थांचा सहभाग घ्या - विजयलक्ष्मी बिदरी

 




Ø  विभागीय स्तरावरील अंमलबजावणीचा आढावा

Ø  जिल्हास्तरावर आढावा बैठक घेणे अनिवार्य

Ø  प्रचार व प्रसिध्दीसाठी कार्यशाळांचे आयोजन

 

नागपूर दि 24 : अंधश्रद्धा, जादुटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तसेच या कायद्याच्या

 जनजागृतीसाठी शासकीय, निमशासकीय यंत्रणेसोबतच सामाजिक संस्थांच्या सहभागाने समाजातील सर्वच घटकांसाठी विशेष प्रशक्षिण शिबीराचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या.

            विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रमासंदर्भात विभागीयस्तरावरील आढावा बैठकीत गुरूवारी श्रीमती बिदरी बोलत होत्या.

            यावेळी अपर जिल्हाधिकारी  तुषार ठोंबरे, जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, सहआयुक्त प्रदिप कुलकर्णी,  समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, शासकीय अभियोक्ता प्रशांत साखरे, सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, पोलीस विभागाचे वरीष्ठ अधिकारी तसेच दुरदृषप्रणालीद्वारे नागपूर विभागातील जिल्हाधिकारी, पोलीस उपमहानिरीक्षक, मुख्यकार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त उपस्थित होते.

            नागपूर विभागात जादुटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात आढावा घेतांना श्रीमती बिदरी म्हणाल्या की, या कायद्याअंतर्गत आतापर्यंत 100 गुन्ह्यांची नोंद झाली असून कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी महसूल व पोलीस यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरावर जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती, प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणीसाठी समित्या गठीत करण्यात आल्या आहे. या समित्यांमध्ये अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून त्यांच्यामार्फत जनजागृती शिबीर व कार्यक्रम घेण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांना सूचना देण्यात आल्या आहे.

            जादुटोणा विरोधी कायद्यातंर्गत नागपूर जिल्ह्यात 32 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये शहरातील 15 तर ग्रामीण भागातील 17 गुन्ह्यांचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यात 7, भंडारा 14, गोंदिया 11, चंद्रपूर 26 तर गडचिरोली जिल्ह्यातील 10 गुन्ह्यांचा समावेश आहे. न्यायालय तसेच पोलीस स्तरावर प्रलंबित गुन्ह्यांबाबत पाठपुरवठा करून तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. 

            अंधश्रद्धा निमुर्लन समितीचे सुनिल वंजारी, व्हि, के. राजुरकर, प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी यासंदर्भात सूचना केल्या. या कायद्याच्या जनजागृतीसाठी तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवक तसेच शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याच्या सूचना करण्यात आली. ग्रामीण भागात उपचारासाठी स्थानिक वैद्याची मदत न घेता शासकीय रूग्णालयातच उपचार घेण्यासंदर्भात जागृती असावी, असेही यावेळी समितीच्या सदस्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment