Sunday, 23 November 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनीला भेट

 

नागपूर, दि. 23 : मध्य भारतातील शेतकऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या आणि नागपुरात मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अॅग्रोव्हिजन-2025 या कृषी प्रदर्शनीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दुपारी भेट दिली. या भेटीत त्यांनी प्रदर्शनीतील कृषी उत्पादने आणि पूरक उद्योगांच्या दालनांची पाहणी करून शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती जाणून घेतली.

यावेळी अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनीच्या कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात या प्रदर्शनीचे प्रणेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार, अॅग्रोव्हिजन फाऊंडेशनचे अध्यक्ष रवी बोरटकर तसेच अॅग्रोव्हिजन सल्लागार परिषदेचे चेअरमन       डॉ. सी.डी. मायी हे मान्यवर उपस्थित होते. अॅग्रोव्हिजनची ही आतापर्यंतची सोळावी प्रदर्शनी आहे. याशिवाय फाऊंडेशनला 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृषी प्रदर्शनीतील विविध संस्था आणि कंपन्यांच्या दालनांना भेट दिली. विशेषतः मुख्यमंत्र्यांनी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती जाणून घेतली.

 

000000

 


‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हल’च्या माध्यमातून वैचारिक कक्षा रुंदावतील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

   

·         चार दिवसीय ‘फेस्टिव्हलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 नागपूर, दि. 23 : मनुष्याला मानवी संवेदना आहेत. ही संवेदना अभिव्यक्त करण्याचे वरदान त्याला लाभले आहे. ही अभिव्यक्ती करण्यासाठी त्याच्याकडे भाषा, साहित्य, पुस्तके ही माध्यमे आहेत. अभिव्यक्ती संपते तिथे संस्कृती संपते. त्यामुळे ही प्रगल्भ संस्कृती जपण्याची गरज असून हा सांस्कृतिक ठेवा जपण्याचे काम पुस्तकांच्या माध्यमातून होत असते. नागपूर पुस्तक महोत्सवांतर्गत होत असलेल्या झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हलच्या माध्यमातून प्रगल्भता येऊन जाणिवा विस्तारित होतील. विविधांगी विषय या फेस्टिव्हलमध्ये मांडण्यात येतील. त्यातून वैचारिक कक्षा रुंदावून प्रगल्भ व्यक्तिमत्व तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.  

नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी) इंडियाच्या वतीने व महाराष्ट्र शासन आणि झिरो माईल यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपूर बुक फेस्टिव्हल 2025 अंतर्गत चार दिवसीय ‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हलचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. 23 आणि 24 तसेच 29 आणि 30 नोव्हेंबरदरम्यान हा साहित्य महोत्सव रेशीमबाग मैदानावर होत आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ वर्ध्याच्या कुलगुरू व साहित्य अकादमीच्या उपाध्यक्षा डॉ. कुमुद शर्मा, लेखक व शिवकथाकार विजयराव देशमुख, एनबीटीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, झिरो माईल यूथ फाउंडेशनचे मार्गदर्शक सत्यनारायण नुवाल, अध्यक्ष अजय संचेती, संचालक समय बनसोड आदी मान्यवर उपस्थित होते.


मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, नागपूर हे  समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेले शहर म्हणून ओळखले जाते. देशाला दिशा देणारे आणि देशाला दिशा देणाऱ्या अनेक घटनांचे साक्षीदार असलेले हे सांस्कृतिक शहर आहे. गोंड राजांनी सार्वजनिक ग्रंथालयाची परंपरा सुरू करून ज्ञानसंस्कृती रुजवली. भोसले काळात हिंदवी स्वराज्याच्या विस्तारात नागपूरने मोलाची भूमिका बजावली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे साहित्य हे अभिजात आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राजा बढे, राम शेवाळकर, महेश एलकुंचवार, सुरेश भट, ग्रेस, वि.भि. कोलते, ग.त्र्यं. माडखोलकर, मारुती चितमपल्ली, परशुराम खुणे यांच्यासारख्या अनेक साहित्यिकांनी या संस्कृतीला समृद्ध करण्याचे काम केले आहे. विदर्भाची भूमी ही भाषेच्या संगमाची भूमी आहे. मराठी आणि हिंदी साहित्य निर्मितीची समांतर समृद्ध परंपरा येथे पहायला मिळते. लिटरेचर फेस्टिव्हलच्या माध्यमातून नागपूरच्या सांस्कृतिक जडणघडणीत अत्यंत मोठा असा बदल होणार असल्याचे ते म्हणाले.


माहिती ही ज्ञानामध्ये परिवर्तित होत नाही तोवर ती केवळ माहिती असते. त्यामुळे माहितीकडून ज्ञानाकडे जायचे असेल तसेच ज्ञानी म्हणून नावलौकीक मिळवायचा असेल तर पुस्तकांशिवाय पर्याय नाही. तरुण पिढीपर्यंत पुस्तके पोहोचविण्याची गरज असल्याचेही ते पुढे म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नागपूर बुक फेस्टिव्हलच्या यशस्वी आयोजनाबद्दल  कौतुक केले. एनबीटी देशभरात वाचनसंस्कृती पुनर्स्थापित करण्याचे उत्कृष्ट कार्य करीत आहे. या उपक्रमाचा एक भाग असलेले नागपूर पुस्तक महोत्सव नवी उंची गाठेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध  पुस्तक प्रकाशनांच्या स्टॅाल्सला भेट दिली.  मुख्यमंत्र्यांनी बालमंडपला भेट देऊन विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. 

वाचन संस्कृती जोपासण्याची गरज — राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर 

शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले की, आजच्या काळात वाचनाची गरज सर्वाधिक आहे आणि त्या जाणिवेतून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. डिजिटल माध्यमामुळे वाचनाला धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या पुस्तक महोत्सवाचे महत्त्व अधिक आहे. वाचन संस्कृती जोपासण्याची गरज आहे. या महोत्सवात 300 हून अधिक प्रकाशक आणि 15 लाखांहून अधिक पुस्तके उपलब्ध आहेत. परिसरातील विद्यार्थी आणि नागरिकांना याचा मोठा फायदा होईल. नागरिकांनी या महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. शिवकथाकार विजयराव देशमुख यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनबीटीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद सुधाकर मराठे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदिका मिश्रा यांनी केले तर आभार प्रदर्शन  युवराज मलिक यांनी केले.

000000

 


Tuesday, 18 November 2025

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

 


नागपूर, दि.19: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.

आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात तहसीलदार (महसूल) शरद कांबळे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. श्री.कांबळे यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. उपस्थितांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

00000


Monday, 17 November 2025

उद्योग क्षेत्राला सहाय्यभूत लॉजिस्टिक दर कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशिल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक्सएसआयओ इंडस्ट्रीयल अँड लॉजिस्टिक पार्कचे भूमिपूजन 

एक्सएसआयओ इंडस्ट्री व ब्लॅकस्टोन कंपनीचा उद्योग विभागासोबत 3 हजार  कोटींचा करार

 

                नागपूर, दि.15 : राज्य शासनाने उद्योगांसाठी पुरक असे लॉजिस्टिक धोरण आणले असून उद्योग क्षेत्रात उत्तम दळणवळच्या सोयी उपलब्ध करून देत लॉजिस्टिक दर कमी करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नरत असल्याचे प्रतिपादन करत एक्सएसआयओ च्या माध्यमातून नागपूर शहराला देशाचे लॉजिस्टिक हब बनण्याच्या दिशेने गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्याच्या विविध भागात गुंतवणुकीसाठी एक्सएसआयओ इंडस्ट्री व ब्लॅकस्टोन कंपनी आणि उद्योग विभागासोबत 3 हजार कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. 

            येथील समृद्धी माहामार्गालगत वडगाव परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एक्सएसआयओ इंडस्ट्रीयल अँड लॉजिस्टीक पार्कचे भूमिपूजन व शिलान्यास करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.  आमदार समीर मेघे आणि डॉ. आशिष देशमुख, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी.अन्बलगम, एक्सएसआयओ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आशिष अग्रवाल, ब्लॅक स्टोन कंपनीचे तूहीन पारेख आदी यावेळी उपस्थित होते. 

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ब्रिटिशांनी नागपूरला भौगोलिकदृष्ट्या झिरो माईल हे मध्य भारताचे केंद्र बिंदू म्हणून घोषित केले होते. आता हे शहर देशाचे लॉजिस्टिक हब होण्याच्या मार्गाने पुढे जात आहे. एक्सएसआयओ इंडस्ट्रीयल अँड लॉजिस्टीक पार्कच्या माध्यमातून या कार्यास गती मिळेल. नागपूर हे नागरी विमान क्षेत्रातही पुढे जात आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानांच्या फेऱ्या या शहरात दररोज होत आहे. समृद्धी महामार्गामुळे उद्योग क्षेत्रातील दळणवळास चालना मिळाली आहे.  

            समृद्धी महामार्गालगतच एक्सएसआयओ हा 700 कोटी गुंतवणूकीचा लॉजिस्टिक पार्क हा जागतिक दर्जाचा पार्क उभारला आहे. आज 105 एकरावरील दुसऱ्या टप्प्यातील 1100 कोटी गुंतवणूकीच्या उद्देशाने तयार करण्यात येणाऱ्या लॉजिस्टिक पार्कचे भूमिपूजन झाले आहे. या दोन्ही टप्प्यातून जवळपास 10 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. ही आनंदाची बाब असून उद्योग क्षेत्रातील वस्तूंना देशांतर्गत तसेच जागतिकस्तरावर पोचविण्यासाठी राज्य शासन आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगत समृद्धी मार्गावरील इगतपुरी भागातून वाढवण बंदरापर्यंत जोडण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी शासन लॉजिस्टिकचा आणि ब्लॉकचेन ची सांगड घालून या क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्याच्या दृष्टीने कार्य करत असल्याचेही त्यांनी सांगितले.एक्सएसआयओ राज्यात 5 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याने राज्याच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान ठरेल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्याच्या विविध भागात गुंतवणुकीसाठी एक्सएसआयओ इंडस्ट्री व ब्लॅकस्टोन कंपनी आणि उद्योग विभागासोबत 3 हजार कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. यापूर्वी राज्य शासना सोबत 5 हजार कोटींचा सामंजस्य करार झाला आहे. आता राज्यातील गुंतवणुकीची ही रक्कम 3 हजार कोटींनी वाढून 8 हजार कोटी करण्यात आली आहे. 

            तत्पूर्वी, एक्सएसआयओ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आशिष अग्रवाल आणि ब्लॅक स्टोन कंपनीचे तूहीन पारेख यांनी मनोगत व्यक्त केले.

00000

 


आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे थाटात उद्घाटन 

नागपूर, दि.15: राज्य शासन प्रत्येक आदिवासींना वन जमीन पट्टा देत आहे व त्यांच्या संस्कृतीचे रक्षण करीत आहे. आदिवासींच्या कल्याणासाठी राज्य शासन आदिवासी विकास विभागाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. जनजाती वर्षाच्या निमित्ताने राज्य शासन भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आदिवासींच्या जल, जंगल आणि जमीन व संस्कृतीचे रक्षण करेल, असा विश्वास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

         आदिवासी विकास विभागाच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त व जनजातीय गौरव वर्षांतर्गत येथील मानकापूर विभागीय क्रीडा संकुलात राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे 15 ते 17 नोव्हेंबर 2025 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके, विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव राजेश कुमार, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘जनजातीय वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आदिवासी जननायकांचे चरित्र जनतेसमोर आणण्याचे तसेच त्यांचे स्मारके उभारण्याचा कार्यक्रम दिला आहे. राज्य शासनानेही राज्यातील आदिवासी नायकांचा गौरवशाली इतिहास पुस्तकरूपाने जनतेसमोर आणला आहे. विविध योजनांद्वारे आदिवासी समाजाचा विकास साधण्यात येत आहे. राज्यातील आदिवासी आश्रम शाळांचा दर्जा सुधारला आहे. आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी ‘स्वयम् योजना’ राबविण्यात येत आहे. एकही आदिवासी मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये. यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. राणी दुर्गावती सक्षमीकरण योजनेद्वारे दीड लाख आदिवासी महिलांना पन्नास हजार ते दीड लाखांपर्यंत मदत करण्यात आली आहे. 

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात आदिवासी समाजाच्या विकासासाठी ‘धरती आबा कार्यक्रम’ देशभर राबविण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात ‘धरती आबा कार्यक्रम’ राबविण्यासाठी 17 मंत्रालयांच्या 25 योजना एकत्र करून 32 जिल्ह्यातील 5 हजार गावांतील प्रत्येक आदिवासी पाड्यांवर रस्ते, पाणी, वीज, रोजगार आणि महिला विकासाच्या योजना पोचविल्या जात आहेत. आश्रमशाळांचे डिजिटायजेशन झाले आहे. 37 एकलव्य शाळांतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. प्रत्येक आदिवासींना वन जमीन पट्टे देण्यात येत आहे. विविध कल्याणकारी योजनांद्वारे आदिवासींच्या कल्याणासाठी राज्य शासन आदिवासी विकास विभागाच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचेही त्यांनी सांगितले.         

आदिवासींच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करूया

-          केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

देशाच्या विकासात आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. भगवान बिरसा मुंडा हे या समाजाच्या अभिमान व स्वाभिमानाचे प्रतिक आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहून आपली समृद्ध परंपरा जपण्याचे कार्य हा समाज करीत असून त्यांच्या सर्वांगिक विकासाठी संकल्प करण्याचे आवाहन यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. जंगलात राहत असल्याने व शहरी भागापासून दूर असल्याने त्यांच्या विकासासाठी काम होणे गरजेचे आहे. आदिवासींना योग्य संधी मिळण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच हस्तउद्योग, कुटीर उद्योग आदींच्या माध्यमातून व आदिवासी विकासाच्या विविध योजना केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येत आहेत. आदिवासींच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकासासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्नरत आहे. त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी आर्थिक विकासाचे मॉडेल आखून शासन कार्य करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

          आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले की, एप्रिल महिन्यापासून भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाच्या वतीने भगवान बिरसा सांस्कृतिक मंचाची स्थापना केली. याद्वारे 40 हजार युवा-युवतींची नोंदणी व विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. जनजातीय गौरव वर्षांतर्गत करण्यात आलेल्या विविध आयोजनांची त्यांनी माहिती दिली. राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव आयोजनामागील भूमिका व कार्यक्रमाची माहितीही त्यांनी दिली. राणी दुर्गावती योजनेच्या माध्यमातून आदिवासी महिला लखपती दीदी होत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन भूमिपूजन व लोकार्पण 

सुराबर्डी, नागपूर येथील गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय तथा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण उपकेंद्राचे भूमिपूजन, शासकीय आश्रमशाळा, घानवळ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार, जि. पालघर येथील इमारतीचे लोकार्पण, शासकीय आश्रमशाळा पळसुंडा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार, जि. पालघर येथील प्रयोगशाळा इमारतीचे लोकार्पण. शासकीय आश्रमशाळा, देवगाव, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक येथील संकुलात मुलींच्या वसतिगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे यावेळी करण्यात आले. 

            आदिवासी विभागाच्या वतीने आयोजित विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरवही त्यांच्या हस्ते करण्यात आला. 

            तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर आधारित  चित्रमय पुस्तका'चे  आणि 'आदिवासी परंपरा व सर्जनशिलता' यावर आधारित कॉफीटेबल बुकचे प्रकाशन झाले. आमदार सर्वश्री रविंद्र चव्हाण, डॉ. आशिष देशमुख, माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचीही यावेळी उपस्थिती होती. 

            आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी प्रास्ताविक केले तर आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांनी आभार मानले.

000


परिवर्तनवादी व्यक्तींचा इतिहास विसरू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

 


अनसूयाबाई काळे स्मृती सदनाचे मुखमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन 

नागपूर, दि. 15 : आपला समाज इतिहास विसरतो, त्यामुळेच कधी काळी आपल्याला गुलामगिरीत जावे लागले होते.  त्यामुळे परिवर्तनवादी व्यक्तींचा इतिहास विसरू नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. उत्तर अंबाझरी मार्गावरील अनसूयाबाई काळे स्मृती सदन आणि पूर्व विदर्भ महिला परिषदेच्या वर्किंग वूमन अँड गर्ल्स होस्टेलच्या नूतनीकरण झालेल्या वास्तूचे उद्घाटन 15 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. अतिथी म्हणून अँम्परसँड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रुस्तम केरावाला उपस्थित होते. 

जातीयतेविरोधातील लढ्यासाठी आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या अनसूयाबाई यांनी महिलांच्या उत्थानासाठी, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी केलेले परिश्रम प्रेरणादायी असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले की, देशाच्या पहिल्या संसदेत त्यांनी नागपूरचे प्रतिनिधित्व केले होते. महिलांच्या सामाजिक, आर्थिक परिवर्तनाच्या लढ्यातील हक्काचा आवाज म्हणजे अनसूयाबाई होत्या. त्यांचे विचार, लेखन पुरोगामी होते. त्यात सुधारणवादाचा विचार होता. आयुष्यात अनेकांच्या प्रेरणा ठरलेल्या अनसूयाबाई या आपल्या समाजाच्या आदर्श आहेत. नागपूर शहराने जी उत्तुंग व्यक्तिमत्त्वे पाहिली, त्यापैकी अनसूयाबाई एक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

प्रारंभी काळे फाऊंडेशन ट्रस्टचे विश्वस्त विलास काळे यांनी प्रास्ताविकात अनसूया बाईंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. व्यासपीठावर एआयडब्ल्यूसी च्या माजी अध्यक्ष शीला काकडे, पूर्व विदर्भ महिला परिषदेच्या अध्यक्ष नीलिमा शुक्ला, सचिव नीला कर्णिक उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन सरिता कौशिक यांनी केले. आभार अनसूया काळे-छाबरानी यांनी मानले. 

नाटकाच्या प्रॅक्टिसची आठवण

आपण लहानापासून ही इमारत पाहतो आहे. वेगवेगळ्या कारणाने अनेकदा इथे आलो. अलीकडे इमारतीची अवस्था वाईट झाली होती. त्यामुळे या इमारतीच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव येताच त्याला मंजुरी देण्यात आली. कधी काळी नाटकाच्या प्रॅक्टिससाठी मी या इमारतीत यायचो, अशी आठवणही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितली.

00000

 

 


हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात 28 नोव्हेंबर पासून सचिवालयाचे कामकाज - डॉ. विलास आठवले

 


Ø  अधिवेशनाच्या व्यवस्थेचा आढावा

Ø  निवास व कार्यालय व्यवस्था प्राधान्याने पूर्ण करा

Ø  व्यवस्थेसंदर्भात विभागप्रमुखांनी समन्वयाने काम करावे

 

          नागपूर, दि. 14 : महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विविध विभागांकडे सोपविण्यात आलेली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करावी. विधानमंडळ सचिवालयाचे कामाकज येत्या 28 नोव्हेंबर पासून नागपूर येथे सुरू होत आहे. त्यादृष्टीने निवास व कार्यालयीन व्यवस्थेसंदर्भातील सर्व कामे तातडीने पूर्ण होईल यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव डॉ. विलास आठवले यांनी आज दिल्यात.  

            विधानभवन येथे महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशनासंदर्भातील व्यवस्थेचा आढावा विधानमंडळ सचिव डॉ. विलास आठवले व शिवदर्शन साठ्ये यांच्या प्रमुख उपस्थित आज घेण्यात आला, त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना श्री. आठवले बोलत होते. 

            यावेळी विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त बी. वैष्णवी, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत तसेच विधानमंडळाचे उपसचिव रवींद्र जगदाळे, विजय कोमटवार, अजय सरवनकर, निलेश वडनेरकर, कक्ष अधिकारी कैलास पाझारे आदी वरिष्ठ अधिकारी तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

              हिवाळी अधिवेशनानिमित्त रविभवन, नागभवन, आमदार निवास आदी ठिकाणी पीठासीन अधिकारी तसेच इतर लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी निवास व्यवस्था करण्यात येते. निवास व्यवस्था लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने प्राधान्याने कामे पूर्ण करावी अशी सूचना करतांना मुख्य प्रतोद व प्रतोद यांना मंत्री व राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यालयासाठी व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. आमदार निवास येथे महिला सदस्यांसाठी पहिल्या इमारतीमधील पहिला व दुसरा माळा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आमदार निवासातील इतर इमारतींमध्ये स्वच्छता, पाणी, विद्युत आदी सुविधा खंडित होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, अशी सूचनाही यावेळी सचिव डॉ. विलास आठवले यांनी केली. 

             अधिवेशन काळात विधानभवन परिसरात तसेच आमदार निवास व रविभवन येथे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात तसेच वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था सुलभ होईल यासाठी पोलीस विभागातर्फे उपाययोजना करण्यात याव्यात. संपूर्ण परिसरात स्वच्छता, अग्निशमन व्यवस्था तसेच अखंडित वीजपुरवठा राहील यासाठी महानगरपालिका व इतर विभागाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. विधिमंडळाचे काही अधिकारी व कर्मचारी येत्या 20 तारखेपासून नागपूर येथे रुजू होत असल्यामुळे त्यांना आवश्यक वाहन व निवासाच्या सुविधा पूर्ण कराव्यात. अधिवेशनानिमित्त आमदार निवास, विधानभवन, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी बसेसची व्यवस्था करण्यात येते. रेल्वेस्टेशनवर वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करतांना अडचण येणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी.

               विधानभवन, रविभवन, आमदार निवास व सुयोग येथे आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. आमदार निवास व विधानभवन येथे हिरकणी कक्ष सज्ज ठेवण्यात येणार आहे. मंत्रिमंडळातील सदस्यांसाठी विधानभवन परिसरात कार्यालयीन दालनांची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे. विद्युत, दूरध्वनी व्यवस्था तसेच अधिवेशन कालावधीत विधानसभा व विधान परिषद येथे करावयाच्या व्यवस्थेचा यावेळी आढावा घेण्यात आला. 

               प्रारंभी विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांनी हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत निवास, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा, वाहन व्यवस्था आदीसंदर्भात प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या व्यवस्थेसंदर्भात माहिती दिली. हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनातर्फे संपूर्ण सहकार्य असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. 

                विधिमंडळ अधिवेशनाचे दैनंदिन कामकाज सुरळीत व्हावे यासाठी सर्व विभागांचे सहकार्य मिळत असून सर्वांच्या सहकार्यामुळे नागपूर अधिवेशन यशस्वी होते. अधिवेशनासाठी राज्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधींसह नागरिकही नागपूरला भेट देतात. त्यांच्या व्यवस्थेसंदर्भातही प्रशासनाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे विधिमंडळ सचिव डॉ. विलास आठवले यांनी यावेळी सांगितले.

00000

 

 


पंडित जवाहरलाल नेहरू यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

 

 

नागपूर, दि. १४ : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.

          आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात महसूल अपर आयुक्त राजेश खवले यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

0000


Thursday, 13 November 2025

विभागातील जिल्ह्यांच्या आर्थिक प्रगतीतून विकास साधण्यासाठी नियोजनानुसार प्रभावी कार्य करा - विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

 



विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली महास्ट्राईड अंतर्गत नागपूर विभागाची बैठक 

नागपूर,दि.१३: कृषी संलग्नित उद्योग, कौशल्य आधारित उद्योग, खनन, पर्यावरण व पर्यटन आदी क्षेत्रांच्या आधारे जिल्ह्यांची आर्थिक प्रगती व पर्यायाने नागपूर विभागाचा विकास साधण्यासाठी सर्व विभागांनी वेळोवेळी भागधारकांच्या बैठका घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज विविध विभाग प्रमुखांना दिल्या. 

            जिल्हास्तरीय विकासास चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्पाअंतर्गत (महास्ट्राईड) श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विभागातील जिल्ह्यांसाठी विभागीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची प्राथमिक बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात झाली, त्यावेळी श्रीमती बिदरी बोलत होत्या. महसूल अपर आयुक्त राजेश खवले, रोहयो सहआयुक्त अविनाश हदगल, पुरवठा उपायुक्त अनिल बनसोड, कृषी सह संचालक उमेश घाटगे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख तसेच मित्रा संस्थेचे वरिष्ठ अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. 

            राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जिल्हा हा केंद्रबिंदू मानून सर्वसमावेशक आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आणि सार्वजनिक सेवा वितरणात सुधारणा करण्यासाठी जिल्ह्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने संस्थात्मक व्यवस्था, डेटा व्यवस्थापन, समन्वय व संनियंत्रण प्रणाली आणि प्लॅटफॉर्मसह राज्यस्तरीय नियोजन यंत्रणा सक्षम करणे ही महास्ट्राईड प्रकल्पाची उद्दिष्ट्ये असून त्यासाठी परिणाम क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. 

           नागपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये असलेल्या उद्योग, कृषी, पर्यटन, खनन आदी क्षेत्रातील बलस्थानांचा परिपूर्ण अभ्यासकरून महास्ट्राईड अंतर्गत सुयोग्य नियोजन करण्याच्या सूचना यावेळी श्रीमती बिदरी यांनी दिल्या. दर महिन्याला यासंदर्भात भागधारकांच्या बैठका घ्याव्या व येणाऱ्या अडचणींबाबत समाधान शोधून उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न व्हावे,असे निर्देशही त्यांनी दिले. 

           केंद्र शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त "विकसित भारत-२०४७" करण्याचा संकल्प केला आहे. यामध्ये २०२५-२६ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर पर्यत नेण्याचे उद्दिष्ट आहे. विकसित भारताची उद्दिष्टे साध्य करीत असताना, राज्यांना सुद्धा २०४७ पर्यंत संपूर्णपणे विकसित होणे गरजेचे आहे. यादृष्टीने महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था २०२८ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर व २०४७ पर्यंत ३.५ ट्रिलियन डॉलर पर्यंत नेणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. या ध्येयपूर्तीकरिता जागतिक बँक सहाय्यित महास्ट्राईड प्रकल्प बनविण्यात येत असून याचा अंमलबजावणी कालावधी पाच वर्षांचा आहे.

 

00000   


Monday, 10 November 2025

विभागीय लोकशाही दिनात एकही नवीन तक्रार नाही

 

 

नागपूर, दि. 10: विभागीय लोकशाही दिनात आज एकही तक्रार प्राप्त झाली नसून प्रलंबित दोन तक्रारींबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. 

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात अपर आयुक्त सामान्य प्रशासन तेजुसिंग पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विभागीय लोकशाही दिनात नव्याने एकही तक्रार प्राप्त झाली नाही. यावेळी महिला व बालविकास, कृषी, पोलीस, जलसंपदा, कामगार, भूमी अभिलेख आदी विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. 

यापुर्वीच्या लोकशाही दिनात प्राप्त चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील दोन तक्रारींबाबत श्री. पवार यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यास यापुर्वी मागविण्यात आलेल्या अहवालाबाबत विचारणा केली. संबंधित अहवाल वेळेत सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.  

यापूर्वी 13 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित विभागीय लोकशाही दिनात चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील दोन तक्रारी प्राप्त झाल्या. यातील पहिल्या तरीनुसार महापालिकेच्या जागेवर अवैध बांधकाम करून अनधिकृतपणे रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. अन्य एका तक्रा0रीनुसार खाजगी भुखंडाच्या जागेवर महापालिकेने गल्ली रस्ता सोडून रूंद पुल बांधल्याचे प्रकरण आहे.  

00000


सांस्कृतिक मूल्यांमुळेच देशात सशक्त लोकशाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


संस्कार भारतीची अ.भा. वार्षिक सर्वसाधारण सभा

          नागपूर, दि.8 : आपल्या शेजारी देशांमध्ये लोकशाही टिकू शकली नाही. मात्र, भारतात ती अधिक चांगल्या प्रकारे रूजली, कारण आमची मूळ संस्कृतीच लोकशाही आणि सहिष्णूतेच्या मूल्यांवर आधारित आहे. तीच मूल्ये आमच्या संविधानात समाविष्ट असल्याने आम्हाला मजबूत असे संविधान मिळाले आहे. यामुळेच आमचा देश प्रगती करतोय आणि लोकशाही देखील सशक्त होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

संस्कार भारतीच्या  अ.भा. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्घाटन सत्राचे प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. रेशीमबागेतील महर्षी व्यास सभागृहात दोन दिवस चालणाऱ्या या सभेच्या उद्घाटन सत्रात गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे, झाडीपट्टी रंगभूमीचे अध्वर्यू पद्मश्री परशुराम खुणे या विशेष अतिथींसह संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष डॉ. मैसुरू मंजूनाथ, विदर्भ प्रदेश अध्यक्षा कांचनताई गडकरी यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती.

एआयसारख्या नवकल्पनामुळे माणसाला यंत्रांशी स्पर्धा करावी लागत असताना, तंत्रज्ञानाने घडवून आणलेली उलथापालथ समजून घेऊन ते योग्य दिशेने वळविण्याचे आणि समाजाला सकारात्मक दिशा देण्याचे कार्य संस्कार भारतीसह सर्वांना करावे लागेल, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

संस्कार भारतीचे अखिल भारतीय महामंत्री आशीष दळवी, अभिनेते नितीश भारद्वाज यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. या सर्वसाधारण सभेत देशभरातून सुमारे चारशे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. सुरुवातीला संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष डॉ. मंजुनाथ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.

*****

 


 

Friday, 7 November 2025

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना (रब्बी हंगाम) मध्ये सहभागी होण्याचे आवाहन

 



        नागपूर, दि 7 : अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी उत्पादंनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2025-26 अंतर्गत सहभागी होण्याकरिता रब्बी ज्वारी पिकासाठी 30 नोव्हेंबर 2025 तर गहु व हरभरा पिकांसाठी 25 डिसेंबर 2025 अंतिम मुदत असून नागपूर विभागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाडगे यांनी केले आहे.

                सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26  या एक वर्षासाठी विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून निवड करण्यात आली आहे. योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होऊ शकतात. रब्बी हंगाम 2025 करिता वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनी मुंबईची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून निवड करण्यात आली आहे. ई-पीक पाहणी व प्रत्यक्ष पेरलेले पीक या मध्ये विसंगती आढळून आल्यास विमा अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येतील.

 या योजनेमध्ये बोगस विमा घेतल्याचे आढळून आल्यास संबंधित खातेदाराचा आधार क्रमांक 5 वर्षाकरिता काळया यादीत टाकून त्यास किमान 5 वर्षाकरिता शासनाचा कोणताही लाभ दिला जाणार नाही. याची नोंद घेण्याचे कृषी विभागाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

नागपूर विभागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याकरिता नजिकच्या बँक शाखेत तसेच आपले सरकार सेवा केंद्रामध्ये विहित मुदतीत विमा हप्ता भरुन सहभागी व्हावे असे आवाहन, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाडगे यांनी केले आहे. योजनेबाबत अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावरील मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे संपर्क साधता येणार आहे.   

योजनेची वैशिष्ट्ये

          योजना अधिसूचित केलेल्या पीकांसाठी लागू आहे. योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पीकांसाठी 5 टक्के असा मर्यादित आहे. ॲग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र असणे बंधनकार आहे. पीक नुकसान भरपाईसाठी, ई पीक पाहणी अंतर्गत पीकांची नोंद करणे आवश्यक आहे.

0000

 


विभागीय आयुक्त कार्यालयात ‘वंदे मातरम्’ गीताचे समूहगान ‘वंदे मातरम्’ गीताच्या 'सार्ध शताब्दी’ महोत्सवास सुरुवात

 

 

नागपूर, दि. 7 : राष्ट्रभक्तीचे प्रतीक 'वंदे मातरम्' या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रभक्तीच्या वातावरणात आज ‘वंदे मातरम्’ गीताचे सामूहिक गायन  करण्यात आले. 

महसूल अपर आयुक्त राजेश खवले यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास रोहयो सहआयुक्त अविनाश हदगल, करमणूककर उपायुक्त तुषार मठकर आणि पुरवठा विभागाचे उपायुक्त अनिल बनसोड यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात ‘वंदे मातरम्’ या गीताचा विशेष उल्लेखनीय प्रभाव राहिला आहे आणि हे गीत स्वातंत्र्यसैनिकांसाठी प्रेरणास्त्रोत बनले होते. थोर कवी आणि तत्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 साली रचलेल्या ‘वंदे मातरम’ या गीताला शुक्रवारी, 7 नोव्हेंबर रोजी 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 या दरम्यान एकूण चार टप्प्यात राज्यात विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यातंर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे मंत्रालयात ‘वंदे मातरम्’ गीत ‘सार्ध शताब्दी’ महोत्सवासाची सुरुवात झाली आहे. या महोत्सवासाच्या माध्यमातून कौशल्य विकास विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने राज्यभरात वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

00000


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐकली जनतेची गऱ्हाणी

 



         नागपूर, दि. 6 : रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागरिकांना भेटून त्यांचे निवेदन स्विकारून त्यांची गऱ्हाणे ऐकली तसेच त्यांच्या अडचणी सोडवीण्यासंदर्भात आश्वस्त केले. 

रामगिरी येथे आज मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. यामध्ये महिला, दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांचा समावेश होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक नागरिकांना भेटून त्यांची निवेदन स्विकारली. आज भेटणाऱ्या नागरिकांनी आपल्या वैयक्तिक अडचणी तसेच आरोग्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी, विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांकडे असलेले प्रलंबित प्रश्न, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष, अनुकंपा नोकरी आदी प्रश्नाबाबत निवेदन सादर केले. प्रत्येक नागरिकांना त्यांच्या तक्रारीसंदर्भात समाधान केले.  

राज्यात निर्माण झालेल्या अतिवृष्टी व पूरामुळे बाधित शेतकऱ्यांना सहाय्य व्हावे यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश यावेळी मुख्यमंत्र्यांना नागरिकांनी यावेळी दिला. निवेदन सादर करणाऱ्यांमध्ये विविध संस्था व लोकप्रतिनिधींचा समावेश होता. 

0000

    


Thursday, 6 November 2025

एचआयव्ही सारख्या आजारांचे लवकर निदान एम्स मध्ये नॅट केंद्र - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

 


नागपूर,दि. 6 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था ( एम्स) नागपूर येथील न्युक्लिक ॲसिड टेस्टिंग (एनएटी) सेंटरचा शुभारंभ आज गुरुवारी, दिनांक 6 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. अशा प्रकारची सुविधा असणारी एम्स ही मध्य भारतातील पहिलीच सरकारी आरोग्य संस्था आहे. याचवेळी गॅमा ब्लड इरॅडिएटर या उपकरणाचेही उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. एम्सच्या रक्त संक्रमण विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

एनएटी ही रक्त, लाळ किंवा इतर नमुन्यातून रोगजंतू त्वरेने शोधणारी चाचणी आहे. या चाचणी द्वारे एचआयव्ही, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी या सारख्या गंभीर आजारांचे निदान प्राथमिक अवस्थेतच होऊन संबंधित रुग्णावर तातडीने उपचार सुरू होऊ शकतात. अचूक निदान हे या चाचणीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. हे उपकरण रक्तपेढ्यांमध्ये लावल्यास गरजू रुग्णांना दूषित रक्त देण्याचा धोका जवळपास संपतो.  गॅमा ब्लड इरॅडिएटर द्वारे अतिशय शुद्ध रक्त गरजू रुग्णांना मिळू शकते. रक्त संक्रमणातून होणारे आजार या उपकरणामुळे रोखले जातात. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दोन्ही उपकरणांची प्रशंसा करतानाच समाजातील गरजूंना त्याचा अधिकाधिक लाभ मिळावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. प्रारंभी एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. अधिष्ठाता डॉ. मृणाल पाठक, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रशासक डॉ. विंकी रुघवाणी, एम्स मधील रक्त संक्रमण विभाग प्रमुख डॉ. सौम्या दास, डॉ. पराग फुलझेले, डॉ. रौनक दुबे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

                                                                     00000