Ø अधिवेशनाच्या व्यवस्थेचा आढावा
Ø निवास व कार्यालय व्यवस्था प्राधान्याने
पूर्ण करा
Ø व्यवस्थेसंदर्भात विभागप्रमुखांनी समन्वयाने
काम करावे
नागपूर, दि. 14 : महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विविध विभागांकडे सोपविण्यात आलेली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करावी. विधानमंडळ सचिवालयाचे कामाकज येत्या 28 नोव्हेंबर पासून नागपूर येथे सुरू होत आहे. त्यादृष्टीने निवास व कार्यालयीन व्यवस्थेसंदर्भातील सर्व कामे तातडीने पूर्ण होईल यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव डॉ. विलास आठवले यांनी आज दिल्यात.
विधानभवन येथे महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशनासंदर्भातील व्यवस्थेचा आढावा विधानमंडळ सचिव डॉ. विलास आठवले व शिवदर्शन साठ्ये यांच्या प्रमुख उपस्थित आज घेण्यात आला, त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना श्री. आठवले बोलत होते.
यावेळी विभागीय आयुक्त श्रीमती
विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र
दाभाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महानगरपालिकेच्या
अतिरिक्त आयुक्त बी. वैष्णवी, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत तसेच विधानमंडळाचे उपसचिव
रवींद्र जगदाळे, विजय कोमटवार, अजय सरवनकर, निलेश वडनेरकर, कक्ष अधिकारी कैलास पाझारे
आदी वरिष्ठ अधिकारी तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
अधिवेशन काळात विधानभवन परिसरात
तसेच आमदार निवास व रविभवन येथे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात
तसेच वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था सुलभ होईल यासाठी पोलीस विभागातर्फे उपाययोजना
करण्यात याव्यात. संपूर्ण परिसरात स्वच्छता, अग्निशमन व्यवस्था तसेच अखंडित वीजपुरवठा
राहील यासाठी महानगरपालिका व इतर विभागाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना बैठकीत देण्यात
आल्या. विधिमंडळाचे काही अधिकारी व कर्मचारी येत्या 20 तारखेपासून नागपूर येथे रुजू
होत असल्यामुळे त्यांना आवश्यक वाहन व निवासाच्या सुविधा पूर्ण कराव्यात. अधिवेशनानिमित्त
आमदार निवास, विधानभवन, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी बसेसची व्यवस्था करण्यात येते. रेल्वेस्टेशनवर
वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करतांना अडचण येणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी.
विधानभवन, रविभवन, आमदार निवास व सुयोग येथे आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. आमदार निवास व विधानभवन येथे हिरकणी कक्ष सज्ज ठेवण्यात येणार आहे. मंत्रिमंडळातील सदस्यांसाठी विधानभवन परिसरात कार्यालयीन दालनांची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे. विद्युत, दूरध्वनी व्यवस्था तसेच अधिवेशन कालावधीत विधानसभा व विधान परिषद येथे करावयाच्या व्यवस्थेचा यावेळी आढावा घेण्यात आला.
प्रारंभी विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांनी हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत निवास, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा, वाहन व्यवस्था आदीसंदर्भात प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या व्यवस्थेसंदर्भात माहिती दिली. हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनातर्फे संपूर्ण सहकार्य असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
विधिमंडळ अधिवेशनाचे दैनंदिन
कामकाज सुरळीत व्हावे यासाठी सर्व विभागांचे सहकार्य मिळत असून सर्वांच्या सहकार्यामुळे
नागपूर अधिवेशन यशस्वी होते. अधिवेशनासाठी राज्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात
लोकप्रतिनिधींसह नागरिकही नागपूरला भेट देतात. त्यांच्या व्यवस्थेसंदर्भातही प्रशासनाकडून
आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे विधिमंडळ सचिव डॉ. विलास आठवले यांनी
यावेळी सांगितले.
00000

No comments:
Post a Comment