मुंबई, दि. 30 : वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्यमींनी राज्यातील तंत्रनिकेतन विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत करण्यासाठी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या साह्याने शैक्षणिक अभ्यासक्रम तयार करुन वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्य निर्मीती करावी, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे सांगितले. फिक्की या संस्थेच्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन उद्योगमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
श्री. देसाई पुढे म्हणाले, कापुस उत्पादनात राज्य अग्रेसर आहे, मात्र त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग राज्यात उभे राहणे आवश्यक आहे. शेती ते कापड व कापड ते फॅशन अशी व्यवस्था उभी राहिल्यास शेतकऱ्यांना फायदा मिळेल. बाहेरील देशातील मोठ्या ब्रॅण्डच्या कापड निर्मितीत सध्या बाग्लादेश, इंडोनिशिया यासारखे देश आहेत. या क्षेत्रातही भारतीय उद्योजकांनी पुढाकार घेतल्यास रोजगार निर्मितीमध्ये वाढ होईल.
परकीय गुंतवणुकीत राज्याला नेहमी पहिली पसंती देण्यात येते. देशातील एकूण गुंतवणुकीपैकी 50 टक्के गुंतवणुक ही महाराष्ट्रात होते. इज ऑफ डुईग बिझनेस अंतर्गत राज्यात उद्योग उभारणे सुलभ झाले आहे. त्याचप्रमाणे इन्सपेक्टर राज संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. पायाभूत सुविधा आणि मुबलक मनुष्यबळ यामुळे उद्योजक गुंतवणुकीस राज्याला प्राधान्य देत आहेत.
राज्यात एकूण 107 आयटीआय आहेत. यापैकी काही आयटीआयला मर्सडीज, वॉक्सवैगन, फोर्स मोटर्स यासारख्या मोठ्या उद्योगांनी दत्तक घेतले आहेत. यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ॲटोमोबाईल इंडस्ट्रीजसाठी लागणारे विशेष कौशल्य शिकविले जात आहे. याच धर्तीवर वस्त्रोद्योग क्षेत्रातील संस्थांनी आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वस्त्रोद्योगाशी निगडीत कौशल्य शिकविल्यास कुशल मनुष्यबळ आणि रोजगार निर्मितीस चालना मिळेल, असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त डॉ. कविता गुप्ता, उद्योगपती श्री. सुरेश कोटक, प्रशांत अग्रवाल, जी.व्ही. आरास उपस्थित होते. यावेळी फिक्कीचा वार्षिक अहवाल प्रकाशित करण्यात आला.
००००