Tuesday, 12 December 2017

अमरावती जिल्ह्यात ग्रीन लिस्टमध्ये 1 लाख 44 हजार शेतक-यांचा समावेश

जिल्ह्यात 13 हजार 373 शेतक-यांना प्रोत्साहन अनुदान
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना

अमरावती, दि. 12 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफीअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील 1 लाख 44 हजार शेतक-यांचा ग्रीन लिस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यात 1 लाख 6 हजार शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, 24 हजार 681 शेतक-यांना वनटाईम सेटलमेंट योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच, 13 हजार 373 शेतक-यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे.
   छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यात साधारण 41 लाख शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी 19 हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. या योजनेत 77 लाख अर्ज प्राप्त झाले होते. छाननीअंतर्गत डुप्लिकेशन झालेले खाते दूर करुन 69 खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यापैकी जवळपास 41 लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे 19 हजार कोटी रुपये इतका निधी हस्तांतरित करण्यात आला आहे.
जे शेतकरी पात्र होते ते अर्ज करु शकले नाहीत अशा शेतक-यांनाही  या योजनेत सामावून घेतले जाणार आहे. शेवटच्या पात्र शेतक-याला मदत मिळेपर्यंत ही योजना सुरु ठेवण्यात येणार आहे.
   शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची ही योजना कृषी व्यवस्थेला बळ पुरवणारी ठरली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाचे दीड लाख रुपयांपर्यतचे कर्ज माफ करणे, नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 25 हजार रुपयांपर्यत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांना योजनेत सामावून घेण्यात आले आहे. योजनेच्या गतिमान व पारदर्शक कार्यवाहीसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणारी जिल्हा सहकारी बँक व विविध राष्ट्रीयकृत बँकांवर कर्जमाफीची रक्कम वितरणाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. ऑनलाईन प्रक्रियेसाठी अद्ययावत यंत्रणाही उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे देशातील आजवरची सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफी गतीने होण्यास मदत झाली आहे.
जिल्ह्यातील शेतक-यांच्या खात्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँकेमार्फत जिल्ह्यातील शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रियेने आता वेग घेतला आहे. जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहणार नाही, असे शासनाचे धोरण आहे. कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्याने शेतकरी बांधवांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील चिंचपूर गावाचे रहिवाशी नरेश राऊत म्हणाले की, माझे 65 हजार रुपये कर्ज माफ झाले आहे. कर्जाचा डोंगर उतरल्यामुळे मी समाधानी आहे. रेवसा येथील उत्तम बोलवार यांचीही 60 हजार रुपयांची कर्जमाफी झाली आहे. ते म्हणाले की, शेतकरी सन्मान योजना शेतक-याला बळ देणारी योजना आहे. चिंचपूर येथील रामभाऊ लांबाडे यांचेही 60 हजार रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. त्यांनीही या योजनेबद्दल समाधान व्यक्त केले. तेथील दिलीप धारणे म्हणाले की, या योजनेमुळे माझे 50 हजार रुपयांचे कर्ज माफ झाले. मी व माझे कुटुंबीय समाधानी आहोत.
00000

No comments:

Post a Comment