मुंबई, दि. 5 : शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान
आणि ग्राहकांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील
व्यापारी, माथाडी कामगार आदींनी पुकारलेला उद्याचा बंद मागे
घ्यावा, असे आवाहन सहकार, पणन मंत्री
सुभाष देशमुख यांनी केले आहे. बाजार समितीतील संबंधीत सर्व घटकांशी त्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यास राज्य शासन
तयार आहे, असे त्यांनी सांगितले.
तृणधान्य, तेलबिया व कडधान्य हे बाजार
समित्यांमधून नियमनमुक्त करण्याच्या धोरणासंदर्भात विचार करण्यासाठी शासनाने समिती
नेमली आहे. याविरोधात एपीएमसीतील व्यापारी, माथाडी कामगार
यांनी 6 डिसेंबर रोजी कामकाज बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात मंत्री
सुभाष देशमुख यांनी आवाहन केले आहे.
तृणधान्य, तेलबिया व कडधान्य हे बाजार
समित्यांमधून नियमनमुक्त करण्याच्या धोरणासंदर्भात विचार करण्यासाठी नेमण्यात
आलेली समिती ही सर्व संबंधितांशी चर्चा विचारविनिमय करुनच आणि लोकांची मते लक्षात
घेऊनच शासनास शिफारस करणार आहे. या शिफारशींचा अभ्यास करुन शासन योग्य तो निर्णय
घेईल. शिवाय या समितीमध्ये सर्व संबंधीत घटकांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.
त्यामुळे बाजार समितीमधील संबंधीत घटकांना समितीसमोर आपले म्हणणे मांडण्याची पूर्ण
संधी उपलब्ध आहे. तसेच ही प्रक्रिया अद्याप सुरू असून बाजार समितीमधील व्यापारी,
कामगारांनी बंद पुकारुन शेतकरी तसेच ग्राहकांची गैरसोय करणे योग्य
नाही. यामुळे शेतमालाचे मोठे नुकसान होण्याबरोबरच ग्राहकांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे
बंद मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
००००
No comments:
Post a Comment