Monday, 11 December 2017

‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र प्रदशर्नाच्या माध्यमातून वैभवशाली परंपरेचे दर्शन



·        मध्यवर्ती संग्रहालयाच्या दालनात प्रदर्शनास प्रारंभ
·        राज्यस्तरावरील निवडक छायाचित्रे
·        विकास व ऐतिहासिक परंपरा यांचा संगम

नागपूर, दि. 11 :  छायाचित्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेसह विविध लोकल्याणकारी योजनांचे प्रतिबिंब असलेले महाराष्ट्र माझा हे राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन शासकीय मध्यवर्ती संग्रहालयाला (अजबबंगला) येथे आयोजित करण्यात आले आहे. या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व विकासात्मक परिवर्तनाची बोलकी छायाचित्र रसिकांना पाहण्यासाठी उपलब्ध झाली आहेत.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी राज्यस्तरावर छायाचित्रकारांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये राज्यभरातून 3210 छायाचित्रे प्राप्त झाली होती. त्यापैकी प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेल्या व स्पर्धेतील निवडक उत्कृष्ट छायाचित्राचे प्रदर्शन अजब बंगल्याच्या कला दालनात आयोजित करण्यात आले आहे. छायाचित्र प्रदर्शन येत्या 15 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत सर्वांसाठी नि:शुल्क खुले राहणार आहे.
‘महाराष्ट्र माझा’ या छायाचित्र स्पर्धेत पंढरपुरच्या वारीप्रसंगी अपंग वारकरी फुगडी खेळतांना घेतलेल्या छायाचित्राला प्रथम क्रमांक मिळालेले छायाचित्र कोल्हापूरच्या वेदांत कुळकर्णी यांनी काढले आहे. तसेच दीपक कुभांर व अंशुमन पोयरेकर यांचे पारितोषिक प्राप्त उत्कृष्ट  छायाचित्र हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे. राज्यातील सण, उत्सव, लोकजीवन तसेच योजनांच्या अंमलबजावणीमधून झालेले परिवर्तन ऐतिहासिक गडकिल्ले वैभवशाली परंपरा आदींचे दर्शन या छायाचित्र प्रदर्शनाचे माध्यम बघायला मिळत आहे.
महाराष्ट्र माझा हे छायाचित्र प्रदर्शन विनामूल्य असून या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी माध्यमिक शिक्षण मंडळाच्या समोरील गुप्ता हाऊस जवळील चौकातून अन्न धान्य वितरण कार्यालयाच्या बाजूच्या रस्त्याने मध्यवर्ती संग्रहालयाच्या (अजब बंगल्या)च्या प्रदर्शन गॅलरीत सहजपणे भेट देता येईल. हा रस्ता प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या अभ्यागतासाठी सुरु राहणार आहे. महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शन सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत विनामूल्य सर्वांसाठी खुले राहणार आहे.
*****

No comments:

Post a Comment