Sunday, 10 December 2017

दूध उत्पादनासाठी एनडीडीबीच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार - मुख्यमंत्री

नागपूर, दि. 10 : शेतीसोबतच पशुसंवर्धन आणि दुग्ध उत्पादन हा शेतक-यांचा जोडधंदा आहे. याद्वारे शेतक-यांचे उत्पन्न वाढीस मदत होऊ शकते. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या माध्यमातून शेतकरी आणि नागरिकांना प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याचे प्रयोजन आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
रामगिरी येथे विदर्भ आणि मराठवाडासंदर्भात दुग्धविकास प्रकल्पाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते, भुपृष्ठ आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विकास विभागाचे सचिव विकास देशमुख, कृषी सचिव विजयकुमार आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाला जिल्हास्तरावर संबंधित जिल्हाधिकारीसुध्दा जागा उपलब्ध करून देऊ शकतात, असे सांगून मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस म्हणाले, राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघाला अधिक सक्षम करण्यासाठीसुध्दा प्रशिक्षण देण्यात येईल. मदर डेअरीला शासन सर्वतोपरी मदत करेल. या व्यवसायाबद्दल शेतक-यांसोबतच गावातील नागरिक आणि सरपंचांनासुध्दा माहिती देणे गरजेचे आहे. मदर डेअरीसाठी राज्यातील जागांची आणि सुविधांची माहिती उपलब्ध करून द्यावी. या योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारचा निधी देण्यात येईल. जलयुक्त शिवारच्या धर्तीवर जनावरांसाठी चारायुक्त शिवार राबविण्याचा मानस आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी ना. नितीन गडकरी म्हणाले, शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मदर डेअरी प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या माध्यमातून 25 लक्ष दूध संकलन होऊन त्याचे मार्केटिंग झाले पाहिजे. केंद्रातून या प्रकल्पासाठी निधी देण्यात येईल. या प्रकल्पामुळे विदर्भ आणि मराठवाड्याचे चित्र नक्की बदलणार, असे गडकरी यांनी सांगितले.
राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ आणि मदर डेअरी फ्रुट्स ॲन्ड व्हिजीटेबल यांच्या मार्फत विदर्भ आणि मराठवाडा विभागातील 10 जिल्ह्यांमध्ये दूध उत्पादनात वाढ होण्याच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम राबविण्यासाठी 3 हजार 23 गावांची निवड करण्यात आली आहे. यात अमरावती जिल्ह्यातील 248 गावे, बुलडाणा 352 गावे, वर्धा 248, नागपूर 363, अकोला 120 आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 139 असे विदर्भातील एकूण 1 हजार 470 गावांची प्रकल्पांतर्गत निवड करण्यात आली आहे. तर मराठवाडा विभागातील लातूर जिल्ह्यातील 349, नांदेड 309, उस्मानाबाद 494 आणि जालना जिल्ह्यातील 401 गावे असे मराठवाडा  विभागातील एकूण 1 हजार 553 गावांचा  समावेश आहे. सद्यस्थितीत 1 हजार 48 गावांमध्ये 22 हजार 239 दूध उत्पादकांकडून प्रतिदिन 1 लक्ष 45 हजार 111 लिटर दूध संकलन करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.  
यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आयुक्त राजीव जाधव, कृषी सहसंचालक विजय घावटे, चंद्रपूर महानगर पालिकेचे आयुक्त संजय काकडे, अमरावती महानगर पालिकेचे आयुक्त हेमंतकुमार पवार, मदर डेअरीचे महाव्यवस्थापक डॉ. चेतन शर्मा, संदीप घोष्, व्यवस्थापकीय संचालक वंजीव खन्ना, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे प्रादेशिक प्रमुख  अनिल हातेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

                                                            0000

No comments:

Post a Comment