नागपूर, दि. 21 : डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंसाधन संस्थेंतर्गत उभारण्यात येत असलेल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला आज सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी भेट दिली. इन्स्टिट्यूटच्या पूर्ण झालेल्या पहिल्या टप्प्यातील कामांची त्यांनी यावेळी पाहणी केली.
मौजे जामठा परिसरात या इन्स्टिट्यूटचे काम सुरु असून पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. डॉ. सावंत यांच्या समवेत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, आमदार डॉ.अनिल बोंडे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, संचालक सतिश पवार आदींनीही पाहणी केली. यावेळी संस्थेच अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, सचिव शैलेश जोगळेकर, कोषाध्यक्ष आनंद औरंगाबादकर, मेडिकल संचालक आनंद पाठक, सहसंचालक डॉ.अतुल अडानीया, कर्नल ए.के.शर्मा हेही याप्रसंगी उपस्थित होते. श्री.जोगळेकर यांनी मान्यवरांना पहिल्या टप्प्यातील झालेल्या कामांबद्दल माहिती दिली.
पहिल्या टप्प्यामध्ये अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे मेडिकल ऑनकोलॉजी, सर्जिकल ऑनकोलॉजी, रेडिएशन थेरपी, रेडिओलॉजी, न्युरोकेयर मेडिसीन, लेबॉरेटरी मेडिसीन, ॲनेस्थेसिया व पेन मॅनेजमेंट, क्रिटीकल केअर व मेडिसीन, पेडिट्रिक आणि औषधी विभागाचे दालने तयार करण्यात आले आहेत. डिजिटल एक्सरे, डिजिटल मॅमोग्राफी, अल्ट्रासाऊंड, सी.टी.स्कॅन, एम.आर.आय.आदी अत्याधुनिक दर्जाच्या मशिनची सुविधा याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. रुग्णांची तपासणी व उपचारही येथे सुरु झाले आहेत.
कॅन्सरवरील उपचार, रुग्णांची काळजी आणि संशोधन या उद्देशाने उभारण्यात येत असलेले नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट सुमारे 27 एकर जागेवर बांधण्यात येत आहे. 470 बेडची संख्या असणाऱ्या या इन्स्टिट्यूटमध्ये ही संस्था भविष्यात 700 बेडपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या व दरात उपचार मिळावा, हा इन्स्टिट्यूटचा उद्देश आहे. दोन टप्प्यामध्ये इन्स्टिट्यूटचे काम पूर्ण होणार असून पहिल्या टप्प्यातील पूर्ण झालेल्या कामांचा शुभारंभ ऑगस्ट 2017 मध्ये झाला. दुसऱ्या टप्प्यातील काम 2018 अखेर पूर्ण होणार आहे.
******
No comments:
Post a Comment