* ‘महाराष्ट्र वार्षिकी-2018’ चे विमोचन
* विस्तृत माहिती असलेला संदर्भ ग्रंथ
नागपूर, दि. 25: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेली ‘महाराष्ट्र वार्षिकी’ स्पर्धा परीक्षेसाठी जितकी उपयुक्त आहे, तितकीच सर्वसामान्य माणसांसाठी देखील उपयोगाची आहे, असे विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात आज ‘महाराष्ट्र वार्षिकी’चे विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, माहिती संचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकरउपायुक्त संजय धिवरे, सुधाकर तेलंग, के. एन. के. राव, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, संजय नाथे, डॉ. सुरेश जाधव, विभा जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
अलिकडच्या काळात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे शासकीय योजना आणि राज्य व जिल्ह्याची संपूर्ण माहिती नसते. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांना त्याबाबतीत प्रश्न विचारले की ते ठामपणे उत्तरे देत नाहीत, असा अनुभव आहे.
महाराष्ट्र वार्षिकीमध्ये संशोधन पद्धतीचे पालन करून माहितीचे संकलन केल्याने वार्षिकीची सत्यता आणि पारदर्शकता यावर विश्वास ठेवता येईल. या पुस्तकात केवळ जिल्ह्याची भौगोलिक किंवा ऐतिहासिक माहिती संकलीत नाही तर कला, परंपरा, संस्कृती, पर्यटन अशा विविध घटकांचा समावेश केला आहे. त्यामुळे या वार्षिकीतून प्रत्येकाला घर बसल्या ‘महाराष्ट्र दर्शन’ घडू शकते, असे विभागीय आयुक्त अनूप कुमार म्हणाले.
माहिती व जनसंपर्क विभाग कात टाकून नव्या रुपात लोकांसमोर येत आहे. संवादाच्या नव-नवीन माध्यमांद्वारे या विभागाने आपली नवी ओळख निर्माण केली आहे. माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र वार्षिकी’ स्पर्धा परीक्षाच नव्हे तर सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी व्यक्त केला.
‘महाराष्ट्र वार्षिकी’च्या निमित्ताने ग्रामीण भागासाठीच्या विविध योजनांची माहिती या पुस्तकात नमुद करण्यात आली आहे. या माध्यमातून ही माहिती ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यत पोहोचेल, असे मत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र वार्षिकी 2018 हा संदर्भग्रंथ विक्रीसाठी जिल्हा माहिती अधिकारी, प्रशासकीय भवन क्र. 1, तिसरा माळा तसेच प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. अभ्यासक तसेच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त असलेला संदर्भग्रंथ खरेदी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
प्रारंभी माहिती संचालक राधाकृष्ण मुळी यांनी स्वागत व प्रास्ताविक करतांना महासंचालनालयाच्या विविध उपक्रमांची तसेच वार्षिकीची माहिती दिली. जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
*****
No comments:
Post a Comment