* जिल्हा परिषद अध्यक्ष व सीईओंनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
* आजपासून जिल्ह्यातील सर्व शाळा सुरु
नागपूर दि.26 : शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव दिन म्हणून साजरा करण्यात आला. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी संजय यादव यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
शाळा प्रवेशोत्सव दिवस आज जिल्ह्यातील सर्व शाळात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशाताई सावरकर तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी संजय यादव, शिक्षण सभापती उकेश चव्हाण यांनी सकाळी फेटरी तसेच माहुर झरी येथील शाळेमध्ये उपस्थित राहून नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे प्रवेश दिंडी तसेच प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभामध्ये विद्यार्थ्यासह पालकांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यासोबतच त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषदेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांची 100 टक्के उपस्थिती त्यासोबतच संपुर्ण शाळा प्रगत व डिजीटल करण्याच्या दृष्टीनेही जिल्हा परिषदेतर्फे विशेष उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
यावेळी समाज कल्याण सभापती दिपक गेडाम, अतिरिकत् मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी आदी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी शाळा प्रवेशोत्सव दिन साजरा होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह तसेच आनंद द्विगुणीत झाला होता. यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले.
मुख्य कार्यपालन अधिकारी संजय यादव यांनी विद्यार्थ्यासोबत संवाद साधून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या आवडी संदर्भात मार्गदर्शन केले.
*****

No comments:
Post a Comment