नागपूर, दि. 04 : संरक्षण विभागाच्या मालकीची असलेली सिताबर्डी टेकडीच्या पायथ्याची आणि समांतर रस्ता व पार्कींगसाठी आवश्यक जागा गणेश टेकडी मंदिर देवस्थानाला हस्तांतरीत करण्यासंदर्भात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज रात्री मंदिराच्या सभागृहात आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त अभिजित बांगर, उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे, मनपाचे अधिकारी, संरक्षण विभागाचे श्री. सी. तायडे तसेच गणेश टेकडी मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
गणेश टेकडी मंदिराच्या जीर्णोद्धार आणि पुनर्विकासकामासाठी संरक्षण विभागाची जागा आवश्यक आहे. जयस्तंभ चौक ते मानस चौकापर्यंत रस्ता विकासाचे काम प्रस्तावित असून या संदर्भात निधी सुध्दा मंजूर करण्यात आला आहे. टेकडीचा उड्डाणपूल पाडल्यानंतर त्या ठिकाणच्या रिक्त जागेवर पार्कींग तसेच समांतर मार्गाकरीता हि जागा महत्वपूर्ण ठरणार आहे. सद्यस्थितीत मध्यप्रदेश परिवहन मंडळाचे बसस्थानक, रेल्वे स्टेशन यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होत असून संरक्षण विभागाअंतर्गत येणारी अंदाजे 20 मी. रुंद आणि 200 मी. लांबीची जागा वाहनतळासाठी आवश्यक असल्याचे श्री. गणेश मंदिर टेकडीचे सचिव श्रीराम कुळकर्णी यांनी वित्त मंत्र्यांना सांगितले.
भारतीय संरक्षण विभागाच्या मालकीची जागा स्थानिक प्रशासनास हवी असल्यास त्या जागेच्या किमतीची जागा संरक्षण खात्याला देणे अपेक्षित असते. तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या काळात गणेश टेकडी मंदिराच्या वतीने नागपूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पत्रव्यवहार केला होता. नुकतीच या जागेसंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि संरक्षण मंत्री निर्मला सितारामण यांच्यात बैठक झाली असून या जागेच्या बदल्यात अहमदनगर येथील जागा संरक्षण विभागाला देण्यात येणार आहे. त्यामुळे श्री. गणेश मंदिर टेकडीला आवश्यक पर्यायी जागा देण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे.
*****



No comments:
Post a Comment