Saturday, 2 March 2019

मिहान प्रकल्पांतर्गत विकास कामांसाठी अतिरिक्त निधी विमानतळाची प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि. 2 : राज्यातील महत्वाच्या जिल्ह्यात असलेल्या विमानतळांची प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत दिले.
या बैठकीत मार्गदर्शन करताना श्री. फडणवीस म्हणाले, शिर्डी, कोल्हापूर आणि नाशिक येथून सुरु असलेल्या देशांतर्गत विमान वाहतुकीस प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. तेथे प्रवाशांना अधिक चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. याचवेळी मिहान प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या विविध विकास कामांना तसेच अतिरिक्त निधीसही त्यांनी मंजुरी दिली. तसेच अमरावती, अकोला, धुळे, कराड, चंद्रपूर, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील विमानतळाच्या विविध विकास कामांचाही त्यांनी आढावा घेतला. त्याचबरोबर शिर्डी विमानतळावर इंधन साठविण्यासाठी अतिरिक्त जागा देण्यास आणि पुरंदर येथील छत्रपती संभाजी राजे आंतराष्ट्रीय विमानतळाचा विकास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर विविध विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त जागेचे भूसंपादन, विविध कामांच्या निविदा, अंतर्गत रस्त्यांची कामे, पाणीपुरवठा व्यवस्था, विद्युतीकरणाची कामे अशा कामांचाही आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.
मिहान प्रकल्पातील विविध विकास कामांना मंजुरी
नागपूर येथील मिहान प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या अनेक विकास कामाबाबतचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. मिहान प्रकल्पांतर्गत प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणे, प्रकल्प बाधीत कुटुंबासाठी सानुग्रह अनुदान देणे, खापरी आणि शिवणगाव येथील घरांच्या मुल्यांकनाची रक्कम देणे. झुडपी जंगल जमिनीचे निर्वनीकरण तसेच विविध रस्त्यांची कामे करणे, ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याची कामे करणे, विद्युतीकरणाची कामे करणे अशा विविध विकास कामांना या आढावा बैठकीत मंजुरी देण्यात आली.
या आढावा बैठकीला विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र, प्रधान सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव नितिन करीर, सिकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ.कविता गुप्ता आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
००००

No comments:

Post a Comment