
v अबालवृद्धांनी केले वृक्षारोपण
v वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा सहभाग
v राष्ट्रीय सेवा योजनेची आकर्षक वृक्षदिंडी
v एनसीसी, शालेय विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण
v एकच लक्ष- दोन कोटी वृक्ष झाली लोकचळवळ
v सकाळपासूनच जनतेमध्ये प्रचंड उत्साह
नागपूर, दि.1 : नागपूरकर नागरिकांनी आजचा वृक्षारोपणाचा दिवस वृक्षारोपण करुन उत्साहात साजरा केला. लहान मोठ्या सर्वांनींच अगदी राजकीय मंडळींनी देखील, विद्यार्थी, लहान मुले यांच्या सोबत शहराच्या मोकळ्या जागेत विविध प्रकारचे वृक्ष लावून संगोपणाचा संकल्प केला.
वनविभाग, सामाजिक वनिकरण, महसूल, पोलिस, सार्वजनिक बांधकाम, महानगर पालिका आदी विभागांना वृक्षारोपणासाठी उदिष्ट दिले होते. आजचा वृक्षारोपण दिन हा शासकीय व निमशासकीय कार्यालय पर्यंतच मर्यादित न राहता या मोहिमेत नागपूरसह सर्व विभागातील नागरिकही सहभागी झाले होते. नागपूर जिल्ह्यासाठी 13 लक्ष 53 हजार 324 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असतांना यापेक्षा अधिक नागरिकांच्या सहभागाने रोपे लावण्यात आलीत. वृक्षरोपणासाठी 1 हजार 564 क्षेत्रावर वृक्षारोपण करण्यात आले.
भंडारा जिल्ह्यात 1 हजार 689 ठिकाणी 871.5 हेक्टर क्षेत्रावर 8 लक्ष 52 हजार 951 वृक्ष, गोंदिया 3 हजार 092 ठिकाणी 10 हजार 141.87 हेक्टर क्षेत्रावर 10 लक्ष 50 हजार 594 वृक्ष तर वर्धा जिल्ह्यात 19 हजार 505 ठिकाणी 1 हजार 708 हेक्टर क्षेत्रावर 7 लक्ष 64 हजार 364 वृक्षांची लागवड करण्यात आली.
भावी डॉक्टरांचे वृक्षारोपण
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 13 व 14 व्या बॅचच्या शंभर मुलींनी सकाळीच ओटल गार्डन वसतिगृहाच्या परिसरात पाचशे वृक्ष लावून आजच्या वृक्षारोपण मोहिमेत आपला सहभाग नोंदविला. वृक्षारोपणासाठी मुलींमध्ये प्रचंड उत्साह होता. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे , बालरोग तज्ञ डॉ. अविनाश गावंडे डॉ. श्रीमती मिताली मिश्रा आदींनी विद्यार्थ्यांच्या समवेत वृक्षारोपण केले. एक विद्यार्थी एक वृक्ष ही संकल्पना असून वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात सर्व रस्त्यांच्या दुतर्फा आज वृक्ष लावण्यात आले. आज लावण्यात आलेल्या वृक्षाच्या संगोपणाची जबाबदारी विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचेही डॉ. निसवाडे यांनी सांगितले.
एनसीसी कॅडेटचे वृक्षारोपण
धनवटे महाविद्यालयाच्या परिसरात एनसीसी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ. बबन तायवाडे यांच्या मार्गदर्शंनाखाली वृक्षारोपण केले. मुख्य रस्त्यांसह महाविद्यालयाच्या परिसरात दोनशे वृक्ष लावून आजचा वृक्षमहोत्सव साजरा केला.
वृक्षदिंडीने जागृती
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशातील टाळ मृदुंगाच्या स्वरात अत्यंत आकर्षक पद्धतीने काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीने वृक्षारोपण मोहिमेसाठी वातावरण निर्मिती झाली होती. शहरातील विविध महाविद्यालयातील सुमारे दीड हजार विद्यार्थी या वृक्ष दिंडीत सहभागी झाले होते.
रविनगर परिसरातील क्रीडा संकुल परिसरातून निघालेल्या वृक्षदिंडीस कुलगुरु डॉ. सिद्धार्थ काणे यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी प्र. कुलगुरु प्रमोद येवले, कुलसचिव पुरण मेश्राम, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम समन्वयक डॉ. भाऊ दायदार आदी उपस्थित होते.
वृक्षदिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक तसेच आकर्षक पोषाख परिधान करुन सहभागी झाले होते. अमरावती रोडवरील विद्यापीठाच्या परिसरात दीडहजार वृक्ष लावण्यात आलीत. नागपूर विद्यापीठाच्या परिक्षेत्रात असलेल्या सातशे महाविद्यालयांनी 15 हजार वृक्ष लावून या मोहिमेत सहभाग नोंदविला.
*****


No comments:
Post a Comment