Wednesday, 6 July 2016

हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना विधान भवनात विनम्र अभिवादन


*  लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत जयंती उत्सव
*  वृक्षारोपण करुन विनम्र आदरांजली अर्पण

नागपूर, दि. 01 :  मागासवर्गीय भटक्या जमातीमध्ये जन्माला येवून स्वकर्तृत्वाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर प्रदिर्घकाळ विराजमान झालेले कुशल प्रशासन व हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती विधानभवन परिसरात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. स्वर्गीय नाईक यांचा जन्म दिन आज राज्यात कृषी दिन म्हणूनही साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र विधान मंडळाच्या परिसरात स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या 103 व्या जयंती समारोहाप्रसंगी आमदार प्रा. अनिल सोले, प्रकाश गजभिये व डॉ. मिलिंद माने यांनी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करुन तसेच पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले.
यावेळी विधान मंडळाचे सचिव उत्तमसिंह चव्हाण, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी श्रीमती कांदबरी भगत-बलकवडे, प्रा. मोहन चव्हान, उपआयुक्त रमेश आडे, श्रीमती प्रगती पाटील, माहिती उपसंचालक मोहन राठोड, विधान मंडळाचे सहसचिव महेंद्र काज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत नवघरे आदीनीही स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या फोटोस गुलाबपुष्प अर्पण करुन भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो. संपूर्ण राज्यात दोन कोटी वृक्ष लागवडीची मोहिम आज राबविण्यात येत असून ही लोकचळवळ झाली आहे.
महाराष्ट्रासारख्या विशाल व पुरोगामी राज्याचे प्रदिर्घकाळ मुख्यमंत्री पद भुषवितांना रोजगार हमी योजना, पंचायत राज व्यवस्था, हरित क्रांतीसाठी शेतीचा विकास आदी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा दिली होती. शेतीवर अमाप प्रेम करण्यासोबत मानवतेचा बहूमोल विचार देणारा विचारवंत म्हणूनही स्वर्गिय वसंतराव नाईक यांची देशभर ओळख होती.
प्रारंभी महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव उत्तमसिंह चव्हाण यांनी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या 103 व्या जन्मदिनाच्या आयोजनासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर विधानभवन परिसरात अशोक वृक्षासह विविध प्रगतीचे वृक्षारोपण करण्यात आले.                
​                                               ​
******* 
          



No comments:

Post a Comment