Wednesday, 6 July 2016

नागपूर शहर टँकरमुक्त करण्यासाठी 100 कोटी रुपयाचा निधी -- मुख्यमंत्री



          *  शहरातील विविध विकास प्रकल्पासाठी कालबद्ध कार्यक्रम
*  सुरेश भट सभागृहासाठी 60 कोटी रुपये
*  शहरातील पूरग्रस्तांसाठी 59 कोटी रुपये
*  कस्तुरचंद पार्क, चिटणवीस पार्कसह यशवंत स्टेडियमचा विकास
*  सेमिनरी हिल्स इको फ्रेंडली पार्क करणार
*  कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी आधुनिक तंत्राचा वापर

नागपूर, दि. 3 : नागपूर शहराचा सर्वांगिण विकासासाठी राबविण्यात येणारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे सूचना करताना शहर टँकरमुक्त करण्यासाठी अमृत योजनेअंतर्गत 100 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
हैद्राबाद हाऊस येथे नागपूर शहरातील विविध विकास प्रकल्पाच्या प्रगती संदर्भात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर प्रवीण दटके तसेच लोकप्रतिनिधी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, नगर विकास सचिव मनिषा म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, नासुप्रचे सभापती डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आदी वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.
शहरातील अनधिकृत वस्त्या व इतर भागांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा ऐवजी अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा करण्यासाठी 100 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून महानगरपालिकेने तात्काळ विकास आराखडा तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. मागील पावसाळ्यात शहरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे झालेल्या नुकसानीसाठी 59 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून महानगरपालिकेतर्फे बांधण्यात येत असलेल्या सुरेश भट सभागृहासाठी 60 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरिबांना परवडेल अशा घरांची निर्मिती करण्यात आली. महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास व महसूल विभागांकडे असलेल्या 140 हेक्टर जागेचा प्रस्ताव 15 दिवसात सादर करण्याच्या सूचना करताना मुख्यमंत्री म्हणाले की, गृहबांधणीचा कार्यक्रम तयार करताना गृहनिर्माण मंडळासह सर्व यंत्रणांनी लो कॉस्ट हाऊसिंगची योजना तयार करावी यासाठी महानगरपालिका आयुक्त हे या प्रकल्पाचे समन्वयक म्हणून काम पाहतील.
नागपूर शहराचा मेट्रो रिजन विकास आराखडा ऑगस्टपूर्वी मंजूर करण्याच्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना करताना मुख्यमंत्री म्हणाले की, शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचऱ्याचे एकूण नियोजन करुन अत्यंत कमी जागेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कमी जागेत त्यावर प्रक्रिया करावी. शहरांमध्ये नवीन बांधकामांना परवानगी देताना कचऱ्याच्या विल्हेवाटी संदर्भात व त्यावर तेथेच प्रक्रिया करण्याची तरतूद करावी.
सेमिनरी : इको फ्रेंडली पार्क
सेमिनरी हिल्स परिसरात असलेल्या नैसर्गिक सौंदर्याचे जतन करताना येथे भेट देणाऱ्या पर्यटकासाठी जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा कौशल्यपूर्ण वापर करुन इको फ्रेंडली पार्क तयार करण्यासंदर्भात वनविभागाने एक महिन्यात आराखडा सादर करावा, अशा सूचना करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेमिनरी हिल्स परिसरात पिण्याच्या पाण्याचा वापर न करता बगिचाच्या सौंदर्यीकरण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करण्याची यंत्रणा विकसित करावी. गोरेवाडा परिसराच्या विकास आराखडा संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.
 चिटणवीस पार्कच्या सौंदर्यीकरणासोबत येथे पार्किंगची सुविधा तसेच खेळासाठी आवश्यक असलेले मैदान विकसित करणे, त्यासोबत यशवंत स्टेडियम आणि सभोवतालच्या जागेचा विकासाचा एकत्रित आराखडा तयार करण्यात येणार आहे. कस्तुरचंद पार्कचे ऐतिहासिक महत्व तसेच या परिसराच्या सौंदर्यीकरणा सोबत आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी अंतरराष्ट्रीय दर्जाच्या वास्तुविशारद कडून आराखडा तयार करावा अथवा स्पर्धा घेऊन शहराच्या सौंदर्यीकरणांमध्ये भर पडेल अशा पद्धतीने नियोजन करावे, असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
झिरो मॉईलचे मेट्रो रेल्वेतर्फे सौंदर्यीकरण व विकास करण्यात येणार असून देशाच्या हृदयस्थानी असलेल्या या वास्तूसोबतच इतरही स्थळांना पर्यटकांनी भेट द्यावी यासाठी हेरिटेज वॉव ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. मेट्रो रेल्वे स्टेशनसह या भागाचा विकास आराखडा फ्रान्स येथील सुप्रसिद्ध श्री. जोशी हे करणार असल्याचे मेट्रो रेल्वेचे श्री. दिक्षित यांनी सांगितले. यावेळी आमदार निवास डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या जागेवरील पाथ वे नागपूर शहराचा विकासासाठी विशेष निधी, विधानभवन इमारत परिसरातील बांधकाम आदी विषयावरही यावेळी चर्चा करण्यात आली.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर शहरातील विकास योजना राबविताना कालबद्ध कार्यक्रम तयार करावा. तसेच शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी केंद्र शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही यावेळी सांगितले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर शहरातील पंजाबराव कृषी विद्यापीठात पाथ वे, कस्तुरचंद पार्क, चिटणवीस पार्क, विधानभवन, सेमिनरी हिल्स, गोरेवाडा तसेच नागपूर शहरासाठी विशेष निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी केली.
                                                *******

No comments:

Post a Comment