Friday, 8 July 2016

कळंभा येथील कोल्हापुरी बंधाऱ्याची किमया पहिल्याच पावसात 7 कि.मी. पर्यंत पाणीसाठा

नागपूर,दि. 7 : नागपूर जिल्हयातील काटोल पासून जवळच असलेल्या कळंभा येथील कोल्हापुरी बंधाऱ्यात पहिल्याच पावसामुळे 7 कि.मी. लांबीपर्यंत पाणीसाठा झाल्याने या परिसरातील शेतकरी आनंदून गेला आहे.
            जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत 20 वर्ष जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे नूतनीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. त्यामुळे त्याचा उपयोग शेतकऱ्यांना म्हणावा तसा होत नव्हता. याठिकाणी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी भेट देवून कळंभा ते गोंडीदिग्रस या जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्यांतील गाळ काढून खोलीकरणास तात्काळ मंजुरी दिली. 3.21 कि.मी. खोलीकरण व रुंदीकरणाचे अंदाजपत्रक तयार करुन 1 कोटी 20 लाख रुपये खर्चास मंजूरी दिली.
            पूलवजा या कोल्हापुरी बंधाऱ्यांचे 1999 मध्ये जिल्हा परिषदेच्या लघूसिंचन विभागाने काम केले होते. सदर बंधारा दगडी बांधकामात असून लांडगी नदीवर बांधण्यात आला आहे. लोखंडी पाट्या टाकून पाणी अडविले जात होते. तथापि दगडी बांधकामामुळे पाणी झिरपत होते. संकल्पिय पाणी साठा होत नव्हता. परिणामी अत्यल्प सिंचन होत होते. या बंधाऱ्याला वरच्या बाजूस गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन विहिरी बांधण्यात आल्या आहेत. कळंभा व मोहखेडी या गावांना होणारा पाणीपुरवठा पाणी साठा होत नसल्यामुळे म्हणावा तसा होत नव्हता. परिणामी पाणी टंचाई जाणवत होती.
            जलयुक्त शिवारअंतर्गत खोलीकरण व रुंदीकरणाचे काम झाल्यानंतर पत्रकार दौरा देखील आयोजित करण्यात आला होता. या कामाचे दृश्य परिणाम आता या पावसाळ्यात दिसू लागल्याने शेतकरी व ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. दुरुस्तीचे काम होण्यापूर्वी 150 टी.सी.एम. पाणीसाठा होता. दुरुस्तीनंतर 450 टी.सी.एम. पाणीसाठा झाला आहे. अंदाजे 2 हजार हेक्टर शेतीला या पाण्याचा सिंचनासाठी लाभ होणार आहे. यासाठी 1 कोटी 20 लाख रुपये एवढा अत्यल्प खर्च आला, हे उल्लेखनीय होय !
            या पाणी साठ्यामुळे आजूबाजूच्या 350 विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच दोन गावांना नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. त्यांचा देखील प्रश्न मिटणार आहे.
********

No comments:

Post a Comment