एक दिवसीय पत्रकार कार्यशाळेचे आयोजन
नागपूर, दि. 19 : पत्रकारिता लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजाला दिशा मिळत असते. स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींमध्ये व सामाजिक परिवर्तनामध्ये वृत्तपत्रांचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच देशाच्या विकासाला एक नवी दिशा मिळाली आहे.
समाजाच्या विकासाला गती प्राप्त होण्यासाठी निर्भीड पत्रकारिता होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन नागपूर ग्रामीणचे पेालिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले.
लोकशाहीत पत्रकारितीची महत्त्वपूर्ण भूमिका या विषयावर बुटीबोरी येथे बुटीबोरी मराठी पत्रकार संघाद्वारे आयोजित एक दिवसीय पत्रकार कार्यशाळा आज पार पडली. यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे, माहिती व जनसपंर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी, पोलिस उपअधीक्षक डॉ. विजय मराठे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप घुमटकर, हेमंत डोर्लीकर, सरचिटणीस योगेश कोरडे, सुदर्शन चक्रधर आदी उपस्थित होते.
बळकट लोकशाहीसाठी पत्रकारिता मजबूत असावी. त्याकरिता पत्रकारांनी व प्रसार माध्यमांनी जबाबदारी व सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून कार्य करावे. तसेच बातमीची पूर्ण सत्यता जाणून वृत्तपत्रामधून समाजापर्यंत पोहचविल्यास त्याबाबत समाजमन प्रभावित होऊन पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होते. लोकशाहीचा सुपंथ समोर नेण्याकरिता बातम्यांची सकारात्मकता वाढविणे आवश्यक असल्याचे आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी सांगितले.
लोकशाहीत पत्रकारांची महत्त्वाची भूमिका या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेदरम्यान पत्रकारांना मार्गदर्शन करतांना नागपूर-अमरावती विभागाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक राधाकृष्ण मुळी म्हणाले की, लोकशाहीमध्ये विकास प्रक्रिया महत्त्वाची असते. समाजामध्ये विकास साधण्यासाठी वृत्तपत्रे व पत्रकार मोलाची भूमिका पार पाडतात. मानवी जीवनाचे पैलू वृत्तपत्रांमधून उलगडण्याचे तसेच माहिती व ज्ञानावर आधारित जनमत तयार करण्याचे कार्य पत्रकारांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून करावे. असा मोलाचा संदेश राधाकृष्ण मुळी यांनी दिला.
वृत्तपत्रे ही समाजाचा आरसा असतात. त्यामध्ये समाजाचे प्रतिबिंब स्पष्ट होते. वस्तुस्थिती सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यामध्ये पत्रकारांची भूमिका महत्त्वाची ठरते. याकरिता पत्रकारांनी समन्वयाने कार्य करण्याचे तसेच लोकशाही बळकटिकरणासाठी वृत्तपत्रांच्या माध्यमातून सकारात्मक भूमिका पार पाडण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले.
बुटीबोरी मराठी पत्रकार संघाचे जितेंद्र मेश्राम, नासीर हुसैन, सुरेश रोहनकर, वसंत बडनेरकर, चंदू बोरकर, विनोद लोहकरे, प्रवीण शर्मा, मंगेश बनारसे, संजय जीवने, गंगाधर कातुरे, संजयसिंह चंदेल, सतीश जैस्वाल, मनोज हिरुडकर, पांडूरंग राऊत, सतीश निखाडे, संदीप शेलकर आदींनी पत्रकार कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुटीबोरी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जितेंद्र मेश्राम यांनी केले. तर संचालन संदीप बलवीर यांनी व आभार सुभाष राऊत यांनी मानले.
****


No comments:
Post a Comment