महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्यप्रदेशातील रुग्णांना फायदा
नागपूर, दि. 19 : एलेक्सिस मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने कर्करोगावर अचूक उपचार व्हावा, यासाठी महागडी अत्याधुनिक यंत्र सामुग्री उपलब्ध करुन दिल्यामुळे महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्य प्रदेशातील कर्करोग रुग्णांवर जलद उपचार होणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात अत्याधुनिक साधनसामुग्री ही मोठी उपलब्धी असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले.
नागपुरातील एलेक्सिस मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलमधील अत्याधुनिक रेडिएशन थेरपी आणि व्यापक साधन सामुग्रीने सुसज्ज रेडिएशन युनिटचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फित कापून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार अजय संचेती, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सुधाकर देशमुख, हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक ताहेर शम्स, डॉ. जितेंद्र अरोरा, सुरज त्रिपाठी, डॉ. चंदानी होतवानी, डॉ. सुमित सेठ, डॉ. अमोल डोंगरे, डॉ. सुरज अग्रवाल यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले की, नागपूर व परिसरातील कर्करोग रुग्णांना या हॉस्पिटलच्या माध्यमातून कर्क रोगावर अत्याधुनिक साधन सामुग्रीने उपचार मिळणार आहे. यामुळे राज्य शासनाच्या वतीने मी या हॉस्पिटलच्या व्यवस्थानाचे अभिनंदन करतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, कर्क रोगासारख्या भयंकर रोगावर उपचाराच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ही विदर्भासाठी मोठी उपलब्धी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी एलेक्सिस मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलमधील रेडिएशन थेरपी आणि व्यापक कर्करोग कक्षातील अत्याधुनिक साधन सामुग्रीचीही पहाणी करुन कर्करोगावर आधुनिक यंत्राच्या सहाय्याने करण्यात येणाऱ्या उपचाराविषयी संबंधित तज्ज्ञांकडून माहिती जाणून घेतली.
यावेळी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक ताहेर शम्स यांनी हॉस्पिटलमधील कर्क रोगावर उपचाराविषयी माहिती देतांना सांगितले की, युएईच्या झुलेखा हेल्थ केअर ग्रुपच्या पुढाकाराने एलेक्सिस मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. येथे पुरवण्यात येणाऱ्या उच्चतम दर्जाच्या सेवेचा लाभ मध्य भारतातील सर्व समूहाच्या विविध वर्गाला होणार आहे. येथे नामांकित तज्ज्ञ आणि विविध वैद्यकीय व्यक्तींद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असल्याने सर्व प्रकारची सेवा आणि संपूर्ण आराम मिळण्याची खात्री आहे. एकूण 200 बेड्सची सोय असलेल्या या हॉस्पिटलमध्ये कॅन्सर आणि रेडिओथेरपी, हृदयरोगविषयक सेवा, न्यूरोसायन्स, ऑर्थेपेडिक, क्रिटिकल केअर, मिनिमल इनव्हॅसिव्ह सर्जरी, युरोलॉजी, नेफ्रॉलॉजी, गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी,, एन्डोक्रिनॉलॉजी, प्रसूती, बालरोग आणि निओनॅटॉलॉजी, क्रिटिकल केअर ( CCU, ICU, NICU, SICU) अंतर्गत औषधालय, जोड प्रत्यारोपण आणि अर्थ्रोस्कोपी, अपघात विभागसेवा, आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी आणि रोगप्रतिबंधक औषधी या सर्व सुविधा व्यापक प्रमाणात उपलब्ध आहेत. मध्य भारतातील वैद्यकीय सेवेतील गरज लक्षात घेता अवयव प्रत्यारोपण केंद्राची सुविधादेखील एलेक्सिस मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये लवकरच व्यपक स्वरुपात उपलब्ध होणार असल्याचे येथे उपस्थित तज्ज्ञांनी सांगितले.
****


No comments:
Post a Comment