- ग्राम स्वच्छतेचा पुरस्कार करणाऱ्या महिला सरपंचाचा सत्कार
- शौचालयासाठी बालहट्ट करणाऱ्या विद्यार्थीनींचा गौरव
- जागतिक महिला दिनाचे आयोजन
नागपूर, दि. 8 : ग्रामीण भागातील स्वच्छता, आरोग्य व समूह विकासासाठी स्त्रियाच निस्वार्थपणे कार्य करु शकतात. त्यामुळे ग्राम विकासाची सुत्रे महिलांनी सांभाळावी असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या डॉ.आबासाहेब खेडकर सभागृहात गावांच्या विकासामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महिला सरपंच व मुलींनी आग्रहाने तसेच हट्टाने आपल्या घरी शौचालय बांधून घेतले अशा विद्यार्थीनींचा सत्कार विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या हस्ते जागतिक महिला दिनी कार्यक्रमात करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कांदबरी भगत बलकवडे, महिला व बालविकासच्या सभापती पुष्पाताई वाघाडे, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा परिषद सदस्या अरुणा मानकर, कुंदाताई औधंरे, कल्पणा चहांदे व छायाताई ढोले यांची उपस्थिती होती.
अजून पर्यंत स्त्रियांच्या हाती खऱ्या अर्थाने सत्ता आलेली नाही. स्त्रियांच्या हाती सत्तेची सुत्रे आल्यास नि:स्वार्थपणे विकास घडून येतो. याकरिता त्यांच्या नेतृत्वाला वाव देण्यात यावा. असे विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, शहरी भागातील स्त्रियांचे सक्षमीकरण होत आहे. या तुलनेत ग्रामीण महिला सक्षमीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे. सोबतच त्यांच्या समस्या नष्ट करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज असून ग्रामीण स्त्री समक्षीकरणासाठी अडसर ठरत असलेल्या प्रवृत्ती विरुद्ध लढा उभारण्याची आवश्यकता असल्याचे अनूप कुमार यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान भिवापूर, हिंगणा, कळमेश्वर, काटोल, मौदा, नरखेड, पारशिवनी, रामटेक, सावनेर व उमरेड या तालुक्यातील स्वच्छ शक्ती ग्राम पंचायत महिला सरपंचांना यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच वडिलांना आग्रहाने शौचालय बांधालय प्रवृत्त करणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, बनपुरी, झुणकी, येरखेडा, चाचेर, उपरवाही, चिरवा,वानाडोंगरी या शाळेतील विद्यार्थीनींचा विभागीय आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हागणदारी मुक्त गांव योजनेअंतर्गत कामठी येथील यशस्वी झालेल्या ध्वनीमुद्रिकेचे विमोचन आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पारशिवनी तहसील मधील स्वच्छता अभियानाअंतर्गत शौचालय बांधकामाविषयी जनजागृती करणारे ग्रामसेवक निर्गुण शेळके व सहकाऱ्यांनी स्वच्छता गीत सादर केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिनेश मासोडकर यांनी तर प्रास्ताविक महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांनी केले.
*****


No comments:
Post a Comment