Friday, 31 March 2017

नांदेड जिल्ह्यातील पाच हजार शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात समिती गठित - कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर

मुंबई, दि. 29 : नांदेड जिल्ह्यात हवामान आधारीत पीक विमा योजना सन 2015-16 मधील 8 हजार 188 शेतकऱ्यांनी पीक विमा केलेला होता. त्याकरीता 69.93 कोटी विमा सुरक्षीत रक्कम होती. हवामान केंद्राच्या अंदाज आकडेवारीनुसार 2 हजार 881 शेतकऱ्यांना केळी पिकासाठी 3.25 कोटी रुपयांची नुकसान भरपाई भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. उर्वरित 5 हजार 307 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या संदर्भात समिती गठित करुन चौकशी करण्यात येईल्.  या शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात शासन सकारात्मक विचार करेल, असे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज विधानसभेत सांगितले.
नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादकांना पीक विमा परताव्याची रक्कम न मिळाल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सुभाष साबणे यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. फुंडकर बोलत होते.
नांदेड जिल्ह्यातील 5 हजार 307 शेतकरी पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नुकसान भरपाईस पात्र ठरत नसल्याने या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. या संदर्भात पीक विमा कंपनीचे अधिकारी आणि आयुक्त यांची संयुक्त्‍ बैठक घेऊन यासंदर्भात चौकशी अहवाल तातडीने देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सन 2017-18 च्या खरीप हंगामापासून पीक विम्यामध्ये पीक निहाय समावेश करण्यात येईल, आणि नुकसान भरपाईचा पंचनामे करताना महसूल, कृषी आणि पीक विमा कंपनीचे अधिकारी एकत्र प्रत्यक्ष पाहणी करतील, असेही श्री.फुंडकर यांनी सांगितले.
उपप्रश्नाला उत्तर देताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले की, सन 2015-16 मध्ये 17 महसूल मंडळामध्ये पिक विमा भरण्यात आला होता. गारपिटीमुळे नुकसान झालेल्या 8 मंडळामध्ये ‍पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला आणि 9 महसूल मंडळात पिक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही. या संदर्भात आयुक्त, पीक विमा कंपनीचे अधिकारी यांची बैठक घेण्यात आली आहे. या शेतकऱ्यांच्या पीक नुकसान संदर्भात हवामान अंदाज केंद्रानुसार अहवाल  देण्यात यावा, तसेच सर्व हवामान अंदाज केंद्र सुरु होती का याचा तपास घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, असे श्री.खोत यांनी सांगितले.
या चर्चेत विधानसभा सदस्य सर्वश्री जयप्रकाश मुंदडा, हेमंत पाटील, योगेश सागर, चंद्रदीप नरके यांनी सहभाग घेतला होता.
०००००

No comments:

Post a Comment