Thursday, 13 April 2017

गुणवत्तापूर्ण जीवन व उत्कृष्ट राहणीमानासाठी स्वच्छ शहरांची निर्मिती करुया - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




* 1622 कोटी रुपयांच्या 28 विविध प्रकल्पांचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न
* एकाच वेळी 28 विविध प्रकल्पांचा ई-भूमिपूजन होण्याचा राज्यातील पहिलाच उपक्रम
मुंबई, दि. 13 : राज्याचा विकास दर हा शहरांच्या विकासावर अवलंबून असल्याने तो अधिकाधिक वाढण्यासाठी नागरीकांना चांगले राहणीमान व गुणवत्तापूर्ण जीवन देण्यासाठी स्वच्छ शहरांची निर्मिती होणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
अमृत व नगरोत्थान अभियानातंर्गत राज्यातील 28 शहरांमध्ये 1 हजार 622 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा ई-भूमिपुजन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वर्षा निवासस्थानी संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सुनील तटकरे, विनायकराव जाधव पाटील, मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, नगरपरिषद संचालनालयाचे आयुक्त विरेंद्र सिंग यांचेसह नगरविकास व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, उंच इमारती, सुंदर रस्ते व बगीचे तयार केले म्हणजे शहरांचा विकास झाला असे मानणे पूर्णत: योग्य ठरत नाही तर शहरांमधील नागरिकांना शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे, मलनि:स्सारणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करणे, सांडपाण्याचा पुनर्वापर करुन शहरांमध्ये हरितपट्टे तयार केल्यास शहरांचा विकास होईल. शहरांच्या विकासावरच राज्याचा विकास दर अवलंबून असल्याने शहरांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीच्या माध्यमातून राज्यात मोठया प्रमाणात विकासाची कामे होत आहेत.   मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, वाढते नागरीकरण ही समस्या न मानता संधी मानून शहरांचा विकासास प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी राज्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीचा पुरेपूर वापर करुन शहरांचा विकास साधण्यात येत आहे. या विकासाच्या माध्यमातून  शहरांमध्ये रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे.
स्वच्छ, सुंदर व स्मार्ट शहरांच्या निर्मितीसाठी शहरांचा विकास आराखडा महत्वाचा असतो. यासाठी विकास आराखड्याला महत्व देण्यात आले आहे. शहरांचा नियोजनबध्द विकास होण्यासाठी यापुढे शहरांतील बांधकामांचे नकाशे डिजिटल पध्दतीने मंजूर करण्यात येणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, शहरांमधील कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण होण्यासाठी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. कामांची गुणवत्ता न राखल्यास संबंधितांवर कारवाई करण्यास शासन मागेपुढे पाहणार नाही. त्याचबरोबर उत्तम शहरे निर्माण व्हावीत यासाठी निवड स्पर्धा सुरु करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून शहरांच्या विकासाला चालना देण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण कामे होण्यास मदत होणार आहे.
नागरिकांना त्यांच्या कामासाठी कार्यालयात जाण्याची गरज भासू नये यासाठी नागरी भागातील सर्व सेवा ऑनलाईन देण्यासाठी ई- पोर्टल तयार करण्यात येत आहे. या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना त्यांना आवश्यक असलेल्या सेवा ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. तसेच नगरपालिकांनी नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यासाठी  विकास आराखडा तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
स्वच्छ व स्मार्ट शहरांत महाराष्ट्र आघाडीवर
ते पुढे म्हणाले की, केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील 100 शहरे संपूर्ण हागणदारीमुक्त झाली आहे. येत्या ऑक्टोबर 2017 पर्यंत राज्यातील संपूर्ण शहरे हागणदारीमुक्त करण्यात येणार आहे. देशातील स्वच्छ शहरांमध्ये सर्वाधिक स्वच्छ शहरे महाराष्ट्रातील आहेत.  त्याचबरोबर, सर्वाधिक 7 स्मार्ट शहरे असणारे देशातील महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. तर अमृत अभियानात राज्यातील 44 शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या विविध योजनांच्या माध्यमातून राज्यातील नागरी भागात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरु आहेत. या विकास कार्यात सर्वांनी सहभाग द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थितांशी वेब कास्टद्वारे संवाद साधताना केले.
नगरविकास विभागाचा अभिनव उपक्रम - रामराजे नाईक निंबाळकर
एकाचवेळी राज्यातील 28 शहरांमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून 1 हजार 266 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे ई-भूमिपूजनाचा उपक्रम राज्यात प्रथमच होत आहे. नगरविकास विभागाचा हा अतिशय अभिनव उपक्रम असल्याचे गौरवोद्गार विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांशी ‘फेसटाईम’च्या माध्यमातून संवाद साधताना काढले.   
गुणवत्तापूर्ण कामास प्राधान्य देऊ – बबनराव लोणीकर
अमृत व नगरोत्थान योजनेतंर्गत आज ई-भूमिपूजन करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला तांत्रिक सल्लागार नेमून विभागावर विश्वास टाकल्याबद्दल पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. त्याचबरोबर या प्रकल्पांची कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत होण्यासाठी विभागामार्फत काम करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यमंत्री विजय शिवतारे व सदाभाऊ खोत यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नगरपरिषदांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याने मोठ्या योजना राबविणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्यातील नगरपालिकांना या योजनांच्या माध्यमातून भरीव तरतूद केल्याबद्दल राज्यमंत्री विजय शिवतारे व सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तर गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागाचा या योजनांमध्ये समावेश करुन निधी दिल्याबद्दल आमदार देवराम होळी यांनीही मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
यावेळी मुख्य सचिव श्री. मल्लिक म्हणाले की, राज्यात विविध योजनांचा माध्यमातून होत असलेल्या विकास कामांचा वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. व या कामांची गुणवत्ता तपासण्यात येईल. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी नगरविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन या प्रकल्पांची कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करु, असा निर्धार व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिमोटद्वारे अमृत अभियानातंर्गत अंबरनाथ पाणी पुरवठा योजना 13.63 कोटी, कुळगाव बदलापूर  पाणीपुरवठा योजना 17.77 कोटी, नाशिक मलनिस्सारण योजना 28.79 कोटी, हिंगणघाट पाणीपुरवठा योजना 61.59, इचलकरंजी पाणी पुरवठा योजना 68.68 कोटी, अकोला पाणी पुरवठा योजना 110.82 कोटी, जळगाव पाणी पुरवठा योजना 249.16 कोटी तर यवतमाळ पाणी पुरवठा योजना फेज-1 व 2 साठी 276.28 कोटी असे 8 शहरांमधील एकूण 826.72 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे ई-भूमिपुजन केले.
नगरोत्थान अभियानातंर्गत चिखलदरा पाणी पुरवठा योजना 3.81 कोटी, रोहा नदी सौंदर्यीकरण 6.30 कोटी, मानवत पाणी पुरवठा 8.62 कोटी, सेनगाव पाणी पुरवठा 12.87 कोटी, देवळाली प्रवरा पाणी पुरवठा 15.25 कोटी, दोंडाईचा वरवाडे पाणी पुरवठा 20.91 कोटी, सिंदखेडा पाणी पुरवठा 21 कोटी, मालेगांव उड्डाणपूल 21.72 कोटी, राहता भुयारी गटार योजना 24.81 कोटी, रोहा भुयारी गटार योजना 28.81 कोटी, लोणावळा पाणी पुरवठा 33.49 कोटी, अहमदपूर पाणी पुरवठा 44.52 कोटी, पाचोरा भुयारी गटार योजना 56.96 कोटी, जयसिंगपूर भुयारी गटार योजना 58.96 कोटी, चांदवड पाणी पुरवठा 64.05 कोटी, जामनेर भुयारी गटार योजना 66.54 कोटी, इस्लामपूर भुयारी गटार योजना 69.42 कोटी, हिंगोली भुयारी गटार योजना 69.43 कोटी, फलटण भुयारी गटार योजना 72.70 कोटी, गडचिरोली भुयारी गटार योजना 94.37 कोटी असे 20 शहरांमधील एकूण 794.54 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे ई-भूमिपुजन केले.
या समारंभास त्या त्या शहरांच्या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, नगरसेवक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे त्या त्या शहरांमध्ये वेब कास्टद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले.  यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थितांशी थेट संवाद  साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी सोनटक्के यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहसचिव पांडुरंग जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरविकास विभागाचे ज. ना. पाटील, सुधाकर बोबडे, मिलींद कुलकणी यांनी विशेष परिश्रम घेतले.
०००००
विलास बोडके/विसंअ/13/4/17

No comments:

Post a Comment