मुंबई दि. 10: पंजाब नॅशनल बँकेतर्फे स्थापन करण्यात आलेल्या पी. एन. बी. फार्मर्स वेलफेअर ट्रस्ट संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या शेतकरी प्रशिक्षण केंद्राकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील अजयपूर येथील 4.34 हेक्टर जमीन मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून नुकतीच राज्य मंत्रिमंडळात या निर्णयाला मान्यता देण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
शेतकरी, ग्रामीण युवक आणि महिला यांचा कौशल्य विकास घडवताना सामाजिक तसेच आर्थिक कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचे अधिकाधिक कल्याण साधण्याच्या उद्देशाने पंजाब नॅशनल बँकेने पी.एन.बी. फार्मर्स वेलफेअर ट्रस्ट ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून देशातील विविध 11 ठिकाणी शेतकरी प्रशिक्षण केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून दारिद्र्य निर्मूलन व्हावे यादृष्टीने या केंद्रातून शेतकरी, ग्रामीण युवक व महिलांना निवासी व्यवस्थेसह विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येते.
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या उच्चाधिका-यांशी चर्चा करून चंद्रपूर जिल्ह्यात अजयपूर येथे सदर प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला पंजाब नॅशनल बँकेने प्रतिसाद दिला. तसेच पी.एन.बी. फार्मर्स वेलफेअर ट्रस्ट च्या माध्यमातून अजयपूर येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. अजयपूर येथील सर्व्हे नं. 26, 27 व 312 या एकूण 5.58 हे. आर पैकी 4.34 हे. आर शासकीय जमीन या प्रशिक्षण केंद्रासाठी मंजूर करण्यात आली आहे.
या शेतकरी प्रशिक्षण केंद्रामार्फत शेतक-यांना गावामधून केंद्रामध्ये येण्यासाठी विनामूल्य प्रवास, महिला व ग्रामीण युवक तसेच युवतींना शेती व शेतीसंबंधातील कामे, संगणक अभ्यासक्रम, ड्रेस डिझायनिंग व भरतकाम आदींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दत्तक घेतलेल्या गावांमध्ये मॉडेल म्हणून गाव विकसित करण्यासाठी विकास कार्यक्रम हाती घेणे, सार्वजनिक सुविधा उपलब्ध करणे, वर्गखोल्यांची निर्मिती, वाचनालये, दवाखाने आदी सोयी उपलब्ध करणे, स्वयंसहाय्यता गटांना उत्तेजन देणे अशी सर्व कामे यात करण्यात येणार आहेत.
एक निवासी कक्ष, तीन वर्गखोल्या, दोन संगणक कक्ष, एक ट्रॅक्टर दुरूस्ती कार्यशाळा, एक कार्यालय, एक संचालन कक्ष, एक वाचनालय, एक मनोरंजन कक्ष, एक स्वयंपाकघर, एक भोजन कक्ष, एक माती परीक्षण प्रयोगशाळा, एक शेती उपकरणांसाठी साठवण कक्ष, मोबाईल व्हॅन, जीप यांच्या दोन गॅरेज, एक अतिथी कक्ष, बैठ्या खेळांसाठी एक कक्ष असे शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे स्वरूप राहणार आहे. या केंद्रात पॉलीहाऊस, फळबाग, पुष्प संवर्धन या कार्यक्रमांसह गांडूळ खत, मधमाशी संगोपन, अळंबी शेती, मत्स्यतळे, सुगंधी औषधी वनस्पती लागवड, भाज्या मशागत आदी प्रात्यक्षिके करण्यात येणार आहेत. कर्ज, ठेवीबाबतच्या योजना, आर्थिक समावेशनाबाबत जागरूकता निर्माण करणे आदी उपक्रमांवर या केंद्राच्या माध्यमातून भर दिला जाईल.
०००००
No comments:
Post a Comment