Tuesday, 26 September 2017

पारदर्शक प्रशासनासाठी विधिमंडळातील कामकाज पद्धती आत्मसात करावी -डॉ. अनंत कळसे



     * नव नियुक्त अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण

नागपूर,दि. 26 :  राज्याच्या विकासाची दिशा विधिमंडळ ठरवते. प्रशासकीय सेवेत नव्याने रूजू झालेल्या अधिकाऱ्यांच्या हाती उद्या प्रशासनाचे भवितव्य असणार आहे. त्यांनी शासकीय कामकाज करताना पारदर्शकता व नियमाने काम केल्यास शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होवू शकते. असे प्रतिपादन विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी केले.
            वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर, विधानमंडळ सचिवालय आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत सरळ सेवेने निवड झालेल्या नवनियुक्त गट ब परिविक्षाधीन अधिकाऱ्यांचे विधिमंडळ कामकाजाबाबतचे तीन दिवसीय प्रशिक्षण आज नागपूर येथील विधानभवन संकुलातील वरिष्ठ सभागृहात आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणाचे उद्घाटन विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
            यावेळी विधिमंडळाचे सचिव उत्तमसिंग चव्हाण, विधान परिषद सभापतीचे सचिव महेंद्रसिंग काज, अवर सचिव सुनील झोरे, महेश जगताप, शशिकांत झाडे, महेंद्र गावळे, वनामतीचे अपर संचालक मिलिंद लाड, वनामतीचे प्रा. डॉ. किशोर वाघमारे, प्रशासन अधिकारी श्रीमती सुवर्णा पांडे, वनामतीचे जनसंपर्क अधिकारी पु. ना. राऊत उपस्थित होते.
            अध्यक्षीय भाषणात प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे म्हणाले की, भारतीय लोकशाही शासन प्रणालीत लोककल्याणाची संकल्पना सांगितली असून, ती लोकांनी लोकांसाठी समर्पित केली आहे. या विधिमंडळात लोककल्याणाच्या दृष्टीने कामकाज केले जाते. त्यामुळे विधिमंडळातील कामकाजाची पद्धत आत्मसात करून घेण्याचा प्रयत्न सर्व परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी केला पाहिजे. राज्याचे भवितव्य निवड झालेल्या सर्व अधिकाऱ्यांच्या हाती आहे. त्यामुळे अभ्यासू नेतृत्वात आणि घटनेच्या चौकटीत राहून प्रशासनाची अंमलबजावणी  करा. असे आवाहन त्यांनी केले.  वनामती मार्फत गेल्या तीन वर्षापासून  परिविक्षाधीन अधिकाऱ्यांकरिता प्रशिक्षणाचे यशस्वीपणे आयोजन केले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            लोककल्याणकारी राज्यांमध्ये उद्याच्या अधिकाऱ्यांना विधिमंडळातील  धोरण अंमलात आणून जनतेपर्यंत पोहचवायचे आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून देण्यात येणारी माहिती  आत्मसात करून त्याचा नक्कीच उपयोग केला जाईल असा विश्वास विधिमंडळाचे सचिव उत्तमसिंग चव्हाण यांनी व्यक्त‍ केला. विधानभवनाच्या इमारतीला आणि कामकाजाला ऐतिहासिक वारसा आहे. अशा ऐतिहासिक सभागृहात परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना प्रशिक्षण मिळणार ही गौरवाची बाब आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.
            वनामतीचे अपर संचालक मिलिंद लाड म्हणाले की, परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून विधिमंडळ कामकाजाची माहिती देण्यात येणार आहे. भारतीय लोकशाही शासन प्रणालीत कायदे तयार करणे. त्यावर धोरण ठरवणे, तारांकित प्रश्न मांडणे, लक्षवेधी सूचना आदी मांडले जातात.  यातील प्रक्रिया कांहीशी किचकट असली तरी कायद्याच्या चौकटीत राहून प्रत्येक अधिकाऱ्यांना काम करायचे आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना प्रशासकीय कामकाजाची माहिती जाणून घेण्याची सुवर्ण संधी मिळाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
                         या तीन दिवसीय  प्रशिक्षण कार्यक्रमासाठी महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, मुंबई येथील चमू आलेली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सेवेतील गट ब संवर्गातील नायब तहसिलदार, कक्ष अधिकारी, उप अधीक्षक , भूमी अभिलेख, सहा. गट विकास अधिकारी , सहा. प्रादेशिक  परिवहन अधिकारी, सहा. निबंधक सहकारी  संस्था अशा विविध विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
            सुरुवातीला वनामतीचे जनसंपर्क अधिकारी पु. ना. राऊत यांनी कार्यक्रमाचे  प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन प्रशिक्षण समन्वयक मिलिंद तारे यांनी तर, वनामतीचे प्रा.डॉ. किशोर वाघमारे यांनी आभार प्रदर्शन केले.

*****    

No comments:

Post a Comment