Monday, 18 September 2017

स्वच्छता पंधरवड्याची सुरुवात शासकीय कार्यालयापासून करा - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे


जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींनीझीरो पेंडन्सीवर भर द्यावा
1 ते 15 ऑक्टोबर ग्रामसमृद्धी व स्वच्छता पंधरवाडा
मुंबई, दि. 18: जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींनी आपल्या कार्यालयात साचलेले कालबाह्य फाईल्सचे ढिगारे, रेकॉर्ड, रद्दीचे गठ्ठे यांचे निर्लेखन करून स्वच्छता अभियानाची सुरुवात शासकीय कार्यालयांपासूनच करवी. झीरो पेंडन्सी व आपल्या कार्यालयांची स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. 
मिशन अंत्योदय अंतर्गत सह्याद्री अतिथीगृह येथे आज ग्रामसमृद्धी व स्वच्छता पंधरवड्याच्या नियोजनासाठी आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या.  या कार्यशाळेला ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर . विमला, राज्यभरातील विविध जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, आपले कार्यालय धूळमुक्त, रद्दीमुक्त, स्वच्छ असेल तर त्या कार्यालयात जाताना आपल्यालाच आनंददायी वाटते. कामाचे चांगले वातावरण निर्माण होते. ग्रामविकास विभागातर्फे 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान ग्रामसमृद्धी व स्वच्छता पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले असून या स्वच्छता अभियानाची सुरुवात जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतीनी स्वतःपासून करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
सोलापूर जि. प. मधून 4 हजार किलो रद्दी काढली
 सोलापूर जिल्हा परिषदेतील डआरडीएचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवले यांनी यावेळी  जि. प. तील सुमारे 4 हजार किलो वजनाच्या जुन्या रेकॉर्डचे  निर्लेखन  केल्याची माहिती दिली. ई - टेंडर काढुन 300 पोती रद्दी विकण्यात आली. यामुळे कार्यालयाचा बराचसा भाग मोकळा झाला असून तो वापरात आला आहे. कार्यालयात स्वछता झाली आहे. शिवाय बरीच वर्षे गुंतलेली कपाटे, रॅक रिकामी होऊन ती आता इतर कामासाठी वापर करण्यास मोकळी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूर जिल्हा परिषद व श्री. नवले यांच्या कार्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी कौतूक केले.
ग्रामसभांच्या धर्तीवर कृषीसभा
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, ग्रामसमृद्धी व स्वच्छता पंधरवड्याच्या कालावधीत गावांमध्ये ग्रामसभांच्या धर्तीवर स्वतंत्र्य कृषीसभांचे आयोजन करण्यात यावे. या कृषिसभांमध्ये प्रामुख्याने गाव- परिसरात उपलब्ध झालेल्या पाण्याचे बजेटिंग करण्यात यावे. तसेच किती पाणी उपलब्ध आहे हे निश्चित करून आगामी रब्बी हंगामाचा क्रॉप पॅटर्न ठरविण्यात यावा. गावपरिसरात कुठला पेरा झाला पाहिजे, हे ठरविण्यात यावे. यात पीक - पाण्याचे नियोजन करण्यात यावे. समूह शेतीची संकल्पना या कृषीसभांमधून विकसित व्हावी यासाठी प्रयत्न करावे व कृषी विभागाशी समन्वय साधून या कृषीसभांची मार्गदर्शिका ठरविण्यात यावी, असे निर्देश मंत्री महोदयांनी दिले.

सर्व अधिकाऱ्यांनी ग्रामसभेत उपस्थित राहावे
2 ऑक्टोबर रोजी राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे . मी स्वतः जिथे निवडणूक नाही तिथे ग्रामसभेला उपस्थित राहणार असून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांनी ग्रामसभांमध्ये उपस्थिती लावावी.अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून सभांमध्ये स्वच्छता हा मुद्दा प्रामुख्याने घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
झाड लावा आणि कमवा
गोरगरीब विद्यार्थ्यांना फळझाडे लावायला दिली तर ते आनंदाने ती जगवून, कालांतराने फळविक्री करुन त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून गरीब विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणी सुटू शकता व ते स्वावलंबी होऊ शकतात. अशा पद्धतीने झाडे लावा आणि कमवा ही संकल्पना राबविण्यासंदर्भात विचार करावा.  2 ऑक्टोबर रोजीच्या ग्रामसभेत हा विषय चर्चिला जावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
००००



No comments:

Post a Comment