नागपूर, दि.10 : धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे.
यासाठी सकारात्मक विचाराकरिता स्वस्थ टिकवून ठेवले पाहिजे. सुखी जीवनाची गुरुकिल्ली
म्हणजे मानसिक स्वास्थ होय, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश विलास डोंगरे यांनी
केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व प्रादेशिक मनोरुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक
मानसिक आरोग्य दिना’ निमित्त कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन प्रादेशिक
मनोरुग्णालय येथे करण्यात आले होते. यावेळी श्री डोंगरे बोलत होते.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल जाधव, प्रादेशिक मनोरुग्णालयाचे
अधीक्षक डॉ. आर. एस. फारुखी, उपअधीक्षक डॉ. प्रवीण नवखरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे
सदस्य राजेंद्र राठी, सदस्या श्रीमती सुरेखा बोरकुटे, प्रादेशिक मनोरुग्णालयाचे डॉ. नितीन गुल्हाने,
डॉ. नितीन शहा, डॉ. अवचर उपस्थित होते. उत्कृष्ट काम करणाऱ्या परिचारिका श्रीमती सुनंदा
टेकाम यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मनोरुग्ण आणि पालकांना मार्गदर्शन करताना सत्र न्यायधीश विलास डोंगरे म्हणाले की,
मानसिक आरोग्य कायद्याविषयी समाजात जनजागृती करताना वैधानिक दृष्टीकोन ठेवला पाहिजे.
शारीरिक आजारांपेक्षा मानसि़क आजारांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. या
आजाराविषयी गुढ आणि भितीचे वलय असते. पण योग्य उपचार मिळाल्यास मानसिक आजार
बरा होवू शकतो. कायदा आणि विज्ञानाची सांगड घातली असता सकारात्मक विचारांना प्रेरणा
मिळते. मनातील सकारात्मक विचारच व्यक्तीची प्रगती करु शकतो. तसेच ‘जगा आणि जगू द्या’
चे धोरण स्वीकारल्यास आपले जीवन सुकर होईल,असे श्री डोंगरे यांनी यावेळी सांगितले.
मानसिक आरोग्य कायद्याविषयी माहिती देताना श्रीमती सुरेखा बोरकुटे म्हणाल्या की,
मानसिकरित्या आजारी असणाऱ्या व्यक्तीची काळजी आणि उपचार व्यवस्थित व्हावेत तसेच
त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने मानसिक आरोग्य कायदा 1987 पारित करण्यात आला आहे. या
कायद्यातंर्गत नियमानुसार अशी मानसिकरित्या आजारी व्यक्ती स्वत: तिचे नातेवाईक अथवा मित्र
अशा प्रकारच्या आजारावर उपचार घेण्याकरिता मानसिक रुग्णालयात दाखल होण्याकरिता अर्ज
करु शकतात. मानसिक आजारी असणाऱ्या व्यक्तीला तिला असणाऱ्या अधिकाराची, हक्काची
जाण नसते ती या जाणीवांच्या पलीकडे असते. परंतु तिला मानवी हक्क आहेत. तिला असणाऱ्या
अधिकारांची आणि हक्कांची जाणीव मानसिकरित्या सुदृढ असणाऱ्या व्यक्तींनी आणि समाजाने
ठेवावी. असेही श्रीमती बोरकुटे यावेळी म्हणाल्या.
मानसिक आजाराविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची महत्त्वाची
भूमिका असते. कायद्याने संरक्षण फक्त मानसिकरित्या सुदृढ व्यक्तीसच नाही तर मानसिकरीत्या
आजारी व्यक्तींना देखील दिलेले आहे. त्याची अमंलबजावणी मात्र आपल्यासारख्या सज्ञान आणि
सजग नागरिकांनी करावी, असे आवाहन राजेंद्र राठी यांनी केले.
यावेळी प्रादेशिक मनोरुग्णालयाचे उपअधीक्षक प्रवीण नवखरे यांनी मानसिक रुग्णांच्या
समस्या मांडल्या. तसेच अधीक्षक डॉ. आर.एस. फारुखी यांनीही विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन श्रीमती मधुमती मंथनवार यांनी तर प्रास्ताविक व आभार जिल्हा
विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल जाधव यांनी मानले.
****


No comments:
Post a Comment