· विषबाधेमुळे आतापर्यंत पाच शेतकऱ्यांचा मृत्यू
· शेतकऱ्यांना संपूर्ण सहाय्य करण्याचे निर्देश
· शेतकऱ्यांना संपूर्ण मदतीची ग्वाही
नागपूर दि. 9 : कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विषबाधा झालेल्या शेतकरी कुटुंबांना शासनातर्फे आवश्यक संपूर्ण मदत देण्यात येईल. पिकांवर फवारणी करतांना विषबाधेसारख्या घटना टाळण्यासोबतच मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागातील कृषी सहाय्यक व तालुका कृषी अधिकारी यांनी मुख्यालयी राहून प्रत्येक शेतकऱ्यांना सहाय्य करावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलेत.
रविभवन येथील सभागृहात कीटकनाशक वापरामुळे झालेल्या विषबाधेसंदर्भात विशेष बैठक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून या घटनेची गंभीर दखल घेताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल, कृषी व पोलिस विभागाने अशाप्रकारच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी दिलेत.
यावेळी आमदार मल्लिकार्जून रेड्डी, सुनील केदार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे तसेच उपविभागीय महसूल अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, उपसंचालक, आरोग्य सेवा, जिल्हा कृषी अधिकारी आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शेतातील पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होवून यामध्ये जिल्ह्यात पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कळमेश्वर येथील माणिक सदाशिव शेंडे, भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथील प्रभाकर बापूराव मिसाळ, कामठी तालुक्यातील उमगाव येथील मुरलीधर रामचंद्र खडसे, मौदा तालुक्यातील पावड दवना येथील संभाजी मोतीराम वांगे तसेच मौदा तालुक्यातील खात येथील दिनेश देवराव ढोलवार या शेतकऱ्यांचा समावेश आहे.
शेतातील पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना झालेल्या विषबाधेसंदर्भात गंभीर दखल घेऊन प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विषबाधा झालेल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या घरी जावून सांत्वन करावे. विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तात्काळ मदत करावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्यात.
कृषी विभागातील कृषी सहाय्यक व तालुका कृषी अधिकारी यांनी मुख्यालयी राहून शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन व मदत करावी. प्रत्येकी दोन ते तीन गावासाठी एका कृषी सहाय्यकाची नियुक्ती असल्यामुळे गावातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीविषयक सर्व अडचणी सोडविण्यासोबतच कीटक फवारणीसारख्या घटनासंदर्भात दखल घेऊन यासंदर्भात लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी शेत पिकांवरील कीटकनाशकांच्या फवारणी करताना झालेल्या विषबाधेसंदर्भात यावेळी माहिती दिली.
******
No comments:
Post a Comment