Thursday, 21 December 2017

पाणीपुरवठा मंत्र्यांनी घेतला जलधर व्यवस्थापनाचा आढावा



नागपूर, दि. 21 : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज रविभवन येथील कुटीर क्रमांक 15 मध्ये जलधर व्यवस्थापन, पाणीगुणवत्ता तपासणीबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हानिहाय जलधर निर्धारण आणि लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
यावेळी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे अतिरिक्त संचालक डॉ.आय.आय.शहा, सहसंचालक मिलींद देशपांडे, उपसंचालक (जलस्वराज्य) सी.पी.भोयर, उपसंचालक मुकुल गजभिये (कोकण विभाग), पी.एल.साळवे (औरंगाबाद विभाग),  प्रमोद रेड्डी (पुणे विभाग), प्रविण कथने (अमरावती विभाग), मंगेश चौधरी (नागपूर विभाग) तसेच पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, बुलडाणा, अहमदनगर, जळगाव, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक तसेच संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणकर यांनी यावेळी जलधर निर्धारण व लोकसहभागातून भूजल व्यवस्थापनातील पुणे, सातारा, अहमदनगर, जळगाव, बुलडाणा, अमरावती, औरंगाबाद या जिल्ह्यातील कामांबाबत चर्चा केली. जलयुक्त शिवाराची कामे ज्या जिल्ह्यामध्ये चांगली झाली आहे, त्या जिल्ह्यामधील भूजलाची स्थिती समाधानकारक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फ्लॅगशीप प्रोग्राम असलेल्या जलयुक्त शिवारामुळे शेतशिवारात अधिक पाणी मुरल्यामुळे भूजल पातळी चांगली आहे. टंचाईग्रस्त जिल्ह्यांसाठी जलयुक्त शिवार वरदान आहे. यावेळी त्यांनी सविस्तर भूजल शास्त्रीय सर्वेक्षण, भूभौतिक सर्वेक्षण, रासायनिक सर्वेक्षण, जलधर निर्धारण, पाण्याचा ताळेबंद, भूजल व्यवस्थापन कृषी आराखड्याबाबत संबंधितांशी चर्चा केली.
 जलधर निर्धारण व लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन अधिक योग्यरितीने व्हावे, यासाठी जिल्हानिहाय जलजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. आगामी काळात ज्या जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईची शक्यता आहे, अशा टंचाईग्रस्त गावांना हाताळण्याबाबत तसेच त्यांच्या निकषांबाबत यावेळी सूचना देण्यात आल्या.
जलवेध शाळा बळकटीकरणासाठी राज्यात बारा स्वयंचलित जलवेध शाळा प्रस्तावित आहे. यांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. स्वयंचलित जलवेध शाळा खरेदी करणे व त्या बसविण्याबाबत करण्यात येणाऱ्या ई-निविदा प्रक्रियेचे काम प्रगतिपथावर आहे. पहिली स्वयंचलित जलवेध शाळा मौजे मंठा, जिल्हा जालना येथे स्थापित करण्यात आली आहे. लातूर (येळवट), ठाणे (चाविंद्रा), रायगड (अंजरुण), चंद्रपूर (चिरोली), वर्धा (मूल), अहमदनगर (वडझिरे), बुलडाणा (येळगाव), धुळे (निमडाळे), पुणे (वडगाव बु.), भंडारा (खुर्सीपार), तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरस येथे जलवेध शाळेचे काम प्रगतिपथावर आहे.
राज्यातील 26 जिल्हा प्रयोगशाळांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून 19 प्रयोगशाळांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. राज्यात विभाग स्तरावर पुणे, कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती तसेच नागपूर या सहा ठिकाणी प्रयोगशाळा असून जिल्हा प्रयोगशाळा 28 तर उपविभागीय प्रयोगशाळा 138 आहे. कोल्हापूर, नंदूरबार, धुळे, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, रायगड तसेच पालघर या जिल्ह्यांमधील जिल्हा प्रयोगशाळा इमारत बांधकाम प्रगतिपथावर आहे. उर्वरित जिल्ह्याने देखील प्रयोगशाळा इमारतीचे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना श्री. लोणीकर यांनी यावेळी दिल्यात.  गुणवत्ता बाधित गावे हाताळणे, टंचाईग्रस्त गावे हाताळणे, निरिक्षण जाळे वाढविणे तसेच जिल्हानिहाय पाणी गुणवत्ता तपासणीबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला.

*******

No comments:

Post a Comment