भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर… एक युगपुरुष, भारतीय
राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ज्ञ, उत्तम
जलव्यवस्थापक, विधिज्ज्ञ, पत्रकार असे
अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे महामानव…! डॉ.
बाबासाहेबांच्या अशा विविधांगी पैलूंना जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न माहिती व
जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महामानव’ या
पुस्तकाने नव्हे संदर्भग्रंथाने केला असून अल्पावधीतच हे पुस्तक लोकप्रिय झाले
आहे. आज, महापरिनिर्वाणदिनानिमित्त ‘महामानव’ या पुस्तकावर टाकलेला दृष्टिक्षेप…
शासनाच्या प्रसिद्धी
व जनसंपर्कासाठी कार्यरत माहिती व जनसंपर्क महासंचालनालनालयाने अलिकडच्या काळात जी
महत्त्वपूर्ण प्रकाशने काढली आहेत, त्यापैकीच ‘महामानव’ हे अव्वल
दर्जाचे प्रकाशन ठरले आहे. यापूर्वी डॉ. आंबेडकरांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकणारी
अनेक प्रकाशने महासंचालनालयाने प्रकाशित केली, त्यात ‘महामानव’ हे एक
महत्त्वाचे प्रकाशन आहे.
‘महामानव’ पुस्तक एकूण
9 घटकांमध्ये
विभागले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांचे कार्य, त्यांनी समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांना न्याय मिळवून
देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची मांडणी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मनोगत व्यक्त करतानाच महामानवाच्या
व्यक्तिमत्वाचे अनेक श्रेष्ठतम पैलू मांडले आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या रुपाने समाजात कशा पध्दतीने परिवर्तन घडले? आणि डॉ.
बाबासाहेबांना परिवर्तनाचा महामेरु का म्हटले जाते? हे प्रा.
अविनाश डोळस यांनी अतिशय सोप्या शब्दांत मांडले आहे. श्रीपाद अपराजित, अविनाश
धर्माधिकारी आणि नागसेन कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा विविध
अंगांनी वेध घेऊन हे व्यक्तिमत्व किती महान, अभ्यासू आणि
तज्ज्ञ आहे, यावर प्रकाश टाकला आहे.
आधुनिक भारताच्या
विकासात डॉ. बाबासाहेबांनी दिलेले योगदान बहुमूल्य असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांनी सामाजिक न्यायाचा नवा इतिहास लिहिला. आणि नेमके हेच या पुस्तकाच्या दुसऱ्या
भागात अधोरेखित करण्यात आले आहे. देश उभारणीच्या कामात डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांचे योगदान विशद करतानाच जगातील सर्वोत्कृष्ट अशा घटनांपैकी एक आपली राज्यघटना
डॉ. आंबेडकर यांनी लिहिली आणि देशाच्या लोकशाहीला समर्थ आणि सक्षम बनविले याविषयी
डॉ. प्रदीप आगलावे, डॉ.रमेश शंभरकर, न्या. पी.बी.सावंत, डॉ.विजय खरे, प्रा.दत्ता
भगत,
प्रा.प्रदीप
गायकवाड यांचे लेख अतिशय वाचनीय आणि संदर्भपूर्ण झाले आहेत.
डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांनी समाज उभारणीसाठी मोलाचे कार्य केले आहे. समताधिष्ठित समाज
घडविण्यासाठी त्यांनी केलेले कार्याचा गौरव ‘महामानव’ या
पुस्तकाच्या तिसऱ्या भागात मांडण्यात आला आहे. प्रा. शैलेश धोंगडे, डॉ. रुपा
कुलकर्णी बोधी, डॉ. त्रिलोक हजारे, भि.म.कौसल, डॉ. गंगाधर
पानतावणे, पितांबर दुपारे, प्रा.केशव मेश्राम, प्रा.डॉ.
सरोज डांगे आणि मुंशीलाल गौतम यांनी समाज उभारणीच्या वेगवेगळ्या क्षेत्रात डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अधोरेखित केले आहे.
पुस्तकाच्या चौथ्या
भागात अर्थक्रांतीवर भाष्य करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. नरेंद्र जाधव, ज्योती
वर्मा,
डॉ.
सरोज आगलावे आणि अनिल सूर्या यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थशास्त्र आणि
अर्थक्रांतीची शाश्वत सूत्रे नेमकी काय स्वीकारली, एक
अर्थशास्त्रज्ञ म्हणून डॉ. बाबासाहेबांच्या योगदानाचा वेध घेतला आहे.
नागभूमी ते दीक्षाभूमी
हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवास कसा झाला? डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेला बुध्दधम्म काय होता? बुध्दधम्माने
जगाचा कसा उध्दार केल याविषयी मान्यवरांचे लेख पाचव्या भागात आहे. यामध्ये रत्नाकर
गायकवाड, वामन निंबाळकर, डॉ. भाऊ लोखंडे, प्रा.विजेंद्र
मेंढे आणि मिलिंद मानकर यांचा समावेश आहे. पुस्तकाच्या सहाव्या भागाद्वारे डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची
वास्तव्य असलेली पाच ठिकाणे आता पंचतीर्थे म्हणून घोषित करण्यात आली असून याविषयी
बबन जोगदंड यांनी तर मिलिंद मानकर, डॉ.प्रदीप आगलावे, डॉ.सतीश
पावडे आणि भगवान दास यांनी बाबासाहेबांचे कार्य मांडले आहे.
पुस्तकाचा सातवा, आठवा भाग
विशेष आहे. कारण या दोन भागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास
आणि जीवनपट मांडण्यात आला आहे. तर संदर्भसूची या शेवटच्या भागात महत्वाच्या
संदर्भाची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पुस्तकाच्या पृष्ठभागी मनूची
आत्महत्या या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेतून घेतलेली कुसुमाग्रज यांची कविता आहे.
‘महामानव’ हे पुस्तक
अभ्यासक, संशोधक आणि सामान्य वाचक अशा सर्वांसाठीच उपयुक्त असून ‘महामानव’ मध्ये
प्रसिद्ध झालेल्या विविध लेखांना एक वेगळे अभ्यास व संदर्भमूल्य आहे. डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांनी केलेले काम, त्यांचे
चौफेर व्यक्तिमत्व जाणून घेण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे ‘महामानव’ हा
संदर्भग्रंथ नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
००००
वर्षा फडके, विभागीय
संपर्क अधिकारी
varsha100780@gmail.com
No comments:
Post a Comment