Thursday, 21 December 2017

शेतकऱ्यांना तातडीने मोबदला द्या - ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे


                    राज्यातील विजेशी संबंधित विविध प्रश्नांबाबत आढावा बैठक
नागपूर, दि. 21 :  राज्यातील वीज प्रकल्पाशी संबंधित संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला तसेच विजेशी संबंधित नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावी, अशी सूचना ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.
राज्यातील विजेशी संबंधित विविध समस्यांचा निपटारा करण्यासाठी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित मतदार संघातील आमदारांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीत संबंधित मतदार संघाच्या आमदारांनी त्यांच्या भागातील विजेशी संबंधित असलेल्या विविध समस्या मांडल्या. यावर बैठकीत सदर समस्या सोडविण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी संबंधित आमदारांकडून त्यांच्या भागातील समस्या ऐकुन घेऊन त्या तातडीने सोडविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पंपांची वीज जोडणी, विविध जिल्ह्यामधील विजेशी संबंधित पायाभूत सोईसुविधांची उभारणी, वीज दुरुस्ती, जालना व परभणी येथे अतिउच्च दाबाचे नवीन वीज उपकेंद्र निर्मिती आदींच्या प्रगतीबद्दल आढावा घेण्यात आला. तसेच पावर ग्रीडकडून वीज प्रकल्पाशी संबंधित संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना त्वरीत देण्यात यावा. मोबदला व लेखी सूचना दिल्याशिवाय शेतकऱ्यांच्या जमिनीवर कोणतेही काम सुरु करु नये, अशा सूचना त्यांनी पावर ग्रीडच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
भुसावळ येथे नवीन कार्यालयाची निर्मिती, धुळे येथील फिडर विलगीकरणाची कामे तातडीने पुर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. कोल्हापुर सांगली, सातारा या जिल्हयांमध्ये शॉट सर्किटमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यात यावी, असे आदेश बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी अकोला येथील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीबाबतचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील विजेच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच कमी मनुष्यबळ असलेल्या ठिकाणी शहरी भागातील मनुष्यबळ नेमण्याविषयी चर्चा करण्यात आली. बैठकीत नवीन उपविभागीय कार्यालयांची निर्मिती करण्याविषयी सुध्दा चर्चा करण्यात आली. 
यावेळी बैठकीत राज्यातील विविध जिल्ह्यातील सर्व आमदार प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच महावितरणचे संचालक सर्वश्री दिनेश साबू, अभिजीत देशपांडे, सुनील पिंपळकुटे, पारेषणचे श्री. चव्हाण,      श्री. मुंडे, निर्मितीचे श्री. थोटवे, श्री. जयदेव, पावर ग्रीडचे श्री. खरे, श्री. मिश्रा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
******

No comments:

Post a Comment