Thursday, 21 December 2017

राज्यपालांशी साधला राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी संवाद



नागपूर, दि. 21 :  राजभवन येथे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज नागपूर येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या 70 व्या तुकडीच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधून विविध विषयांवर चर्चा केली. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे राज्यपालांनी दिली.
राजभवनच्या हिरवळीवर आयोजित कार्यक्रमाला राज्यपाल चे. विद्यासागर राव, राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे महासंचालक आर.एन.झा. अतिरिक्त महासंचालक राजीव रानडे, श्रीमती लिना श्रीवास्तव, राज्यपालांचे सचिव वेणूगोपाल रेड्डी, उपसचिव रणजितकुमार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
राज्य शासन बालकांच्या विकासाच्या दृष्टीने अनेक योजना राबवित असल्याचे सांगून राज्यपाल श्री. राव म्हणाले, विशेषता आदिवासी भागातील मुले विकासाच्या प्रवाहात आली पाहिजे यासाठी त्यांची शैक्षणिक विकास, आहार तसेच कुपोषणाचे उच्चाटन करण्यासाठी काम करण्यात येत असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले.
भारतीय संविधानाच्या कलम 73 व कलम 74 अन्वये ग्रामीण विकासाची कामे पंचायत राज संस्थांच्या मदतीने प्रभावीपणे करण्यात येत आहे. ब्रिटिशांनी सुध्दा ग्रामीण विकासासाठी काही कायदे केले होते. भारतीय संविधानामुळे पंचायत राज व्यवस्था बळकट झाल्याचे राज्यपालांनी एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले. पंचायत राज व्यवस्थेतील ग्रामपंचायत आणि नगर पालिकांना केंद्र व राज्य सरकारांनी अनेक अधिकार दिले असल्याचे राज्यपालांनी सांगितले. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेत स्थानिक स्वराज्य संस्थांना देखील विकासासाठी मोठया प्रमाणात अधिकार देण्यात आले आहे. पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब हा सिंचनासाठी वापरला गेला पाहिजे. कृषी क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्यास कृषी विकासाला गती मिळेल. असेही राज्यपालांनी एक प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
राज्यातील शेतकऱ्यांना शेती चांगल्याप्रकारे करता यावी यासाठी राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका पिक कर्ज उपलब्ध करुन देतात असे सांगून राज्यपाल श्री. राव म्हणाले, त्यामुळे शेतकऱ्यांना विविध प्रकारची पिके घेण्यास बँकांची मदतच होत असल्याचे सांगितले. वस्तू व सेवा कर सुरु करण्याचा उद्देश अत्यंत चांगला असून पारदर्शकता व गतीमानतेसाठी कॅशलेस व्यवहारावर भर देण्यात आला आहे. सेवा व कृषी क्षेत्रात कौशल्ये विकसित झाल्यास अनेकांना कौशल्यामुळे स्वयंरोजगार प्राप्त होण्यास मदत होणार असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
यावेळी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादतीच्या 70 व्या तुकडीचे 145 प्रशिक्षणार्थी अधिकारी यावेळी उपस्थित होते. डिसेंबर 2016 ला हे प्रशिक्षणार्थी अधिकारी या अकादमीत रुजू झाले. एप्रिल 2018 मध्ये देशातील विविध राज्यातील सेवेत हे अधिकारी रुजू होणार आहेत. विशेष म्हणजे या तुकडीत भुतान रॉयल सर्व्हीसचे दोन प्रशिक्षणार्थी अधिकारी आहेत. 40 महिला प्रशिक्षणार्थी अधिकारी सुध्दा यावेळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकादमीचे के. श्रीनिवासन यांनी केले. संचालन प्रशिक्षणार्थी अधिकारी श्रीमती रिमझिम पांडे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रशिक्षणार्थी अधिकारी श्री. मनिषकुमार यांनी मानले. यावेळी अकादमीचे ऋषी बिसेन यांचेसह अन्य अधिकारी उपस्थित होते.
*****

No comments:

Post a Comment