Friday, 5 January 2018

‘रंगवैखरी’ स्पर्धेत महाविद्यालयांनी सहभागी व्हावे !

 मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांचे आवाहन

मुंबई, दि. 5: राज्याच्या मराठी भाषा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे रंगवैखरीही वैशिष्ट्यपूर्ण राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा जानेवारी व फेब्रुवारी, २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.या स्पर्धेत राज्यातील जास्तीतजास्त महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आग्रही आवाहनमराठी भाषा तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज एका पत्रकाद्वारे केले.
महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून मराठी भाषा, साहित्य व महाराष्ट्राची विविधांगी संस्कृती या संदर्भातील विविध सार्थ कार्यक्रम शासनाच्या माध्यमातून सातत्याने योजले जात आहेत. याच उपक्रमांच्या मालिकेतील रंगवैखरी ही कलाविष्कार-स्पर्धा, मराठीच्या समृद्ध अशा भाषिक, साहित्यिक व सांस्कृतिक परंपरेचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने प्रेरित आहे, अशी माहिती श्री. तावडे यांनी दिली. स्पर्धेच्या या वर्षासाठी "महाराष्ट्री ते मराठी" (मराठी भाषेच्या विकासाचा टप्पा) हा विषय देण्यात आलेला आहे. या विषयाच्या अनुषंगाने सादर केल्या जाणाऱ्या सादरीकरणात नाट्य, चित्र, शिल्प, नृत्य, संगीत यांच्यापैकी किमान तीन कलांचा समावेश असणे गरजेचे आहे.मराठी भाषा गौरव दिनाच्या (२७ फेब्रुवारी) पार्श्वभूमीवर योजलेल्या या स्पर्धेत, मराठी साहित्य, नाट्य, संगीत, नृत्य, चित्र, शिल्प या कलांच्या माध्यमातून मराठी भाषा व संस्कृती यांचे रंगमंचीय प्रकटीकरण करण्याची संधी तरूण कलाकारांना मिळणार आहे.
आठ केंद्रांवर स्पर्धा
ही स्पर्धा राज्यस्तरीय असून प्राथमिक फेऱ्या मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, रत्नागिरी, औरंगाबाद, सिंधुदुर्ग अशा एकूण ८ केंद्रांवर होणार आहेत. या स्पर्धेची महाअंतिम फेरी मुंबईत घेण्यात येणार आहे. सांघिक सादरीकरण, नेपथ्य, प्रकाशयोजना, अभिनय, दिग्दर्शन इत्यादी सांघिक व वैयक्तिक कामगिरीसाठी एकूण ७ लाख ५० हजार रुपयांची भरघोस पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांविषयीच्या कलाकार व रसिकांच्या जाणिवा समृद्ध करणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील जास्तीतजास्त महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी आवर्जून सहभाग घ्यावा, असे आवाहनही श्री. तावडे यांनी केले.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, दि. १५ जानेवारीपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्याची सुविधा ऑनलाईनही उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक स्पर्धकांनी स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आणि नियम व अटींसाठी https://sites.google.com/site/rmvsrangavaikhari/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी संपर्क - राज्य मराठी विकास संस्था, मुंबई कार्यालय दूरध्वनी क्रमांक - ०२२ २२६५३९६६ / स्पर्धाप्रमुख गिरीश पतके चलभाष क्रमांक - ९८६९७०६३०१ / ई-पत्ता - rangavaikhari@gmail.com.
००००



No comments:

Post a Comment