मुंबई, दि. 3 :
विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षविरहित भूमिका घेत अनेकांना प्रेरणा देणारे
ज्येष्ठ नेते मधुकरराव उपाख्य मामासाहेब किंमतकर यांच्या निधनाने आपण एका ज्येष्ठ
मार्गदर्शकाला मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात
म्हणतात, नेहमीच सक्रीय कार्यकर्त्याच्या भूमिकेतून जबाबदारी सांभाळणाऱ्या
माजी मंत्री मामासाहेबांनी शून्यातून विश्व निर्माण केले. शिक्षक आणि वकील म्हणून
सेवा देणाऱ्या मामासाहेबांनी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यासोबत काम करताना
कामगार चळवळीपुरतीच आपली वकिली मर्यादित ठेवून एक आदर्श निर्माण केला. रामटेक
भागातून आमदार झाल्यानंतर आदिवासी शेतकऱ्यांना सिंचन सुविधा देण्याचा ध्यास घेऊन
सुरू केलेला सिंचन संघर्ष त्यांनी अखेरपर्यंत सुरू ठेवला. विदर्भाच्या सिंचनाचा
अनुशेष दूर करण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांच्या एकजुटीसाठी सतत आग्रही असणाऱ्या
मामासाहेबांनी या प्रश्नावर अनेकांना एकत्र आणले. विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या
माध्यमातून सुद्धा त्यांनी नियोजनाच्या पातळीवर योगदान दिले. पाणी, सिंचन आणि
अनुशेषाविषयी मार्गदर्शनासाठी अनेकजण हक्काने मामासाहेबांच्या घरी जायचे.
त्यांच्याशी अतिशय जवळून आणि आपुलकीने संवाद साधण्याचा योग मला अनेकदा आला. मी
मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील विदर्भासंदर्भात अतिशय पोटतिडकीने आणि हक्काने ते
विविध विषय मांडत असत. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या विकासाची आणि प्रश्नांची जाण
असलेला एक जाणता नेता आपल्यातून गेला आहे, असेही
मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
-----000-----
No comments:
Post a Comment