Saturday, 3 February 2018

मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून 1 लक्ष 63 हजार अर्जदारांना 769 कोटी कर्ज वाटप - सचिन कुर्वे

·         जिल्हा स्तरीय समन्वय समितीची बैठक
·         प्रलंबित कर्ज प्रकरणे एक महिन्यात निकाली काढा
·         अंमलबजावणीमध्ये राज्यात उल्लेखनिय कार्य

      नागपूर, दि.3 :  मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून विविध व्यवसायासाठी शिशू, किशोर व तरुण योजनेअंतर्गत जिल्हयातील 1 लक्ष 63 हजार 566 अर्जदारांना विविध व्यवसाय व उद्योग सुरु करण्यासाठी 759 कोटी 7 लक्ष रुपये विविध बँकाद्वारे मंजूर करण्यात आले आहेत. जिल्हयातील उद्योग सुरु करणाऱ्या अर्जदारांनी मुद्रा बँक योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले अर्ज एक महिण्याच्या आत निकाली काढावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आज दिल्यात.
            मुद्रा बँक योजनेच्या जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी विविध बँकांनी मुद्रा बँक योजनेअंतर्गत केलेल्या कर्ज पुरवठयाच्या आढावा घेण्यात आला त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते.
यावेळी जिल्हा समन्वय समितीचे सदस्य व आमदार प्रा. अनिल सोले, मुद्रा बँक योजना समितीचे सदस्य सचिव कृष्णा फिरके, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, डिकीचे निश्चय शेळके, लिड बँक व्यवस्थापक अयुब खान, श्रीराम बांधे, तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.
मुद्रा बँक योजनेअंतर्गत जिल्हयातील विविध राष्ट्रीय बँकांनी कर्ज वितरणामध्ये उत्कृष्ट कार्य केले असून राज्यात कर्ज वितरणामध्ये जिल्हा दुसऱ्या स्थानावर असल्याचे सांगतांना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी मार्चपूर्वी दोन लाखापेक्षा जास्त उद्योग व व्यवसाय सुरु करण्यास उत्सूक असलेल्या युवकांना तसेच अर्जदारांना या योजनेचा लाभ द्यावा, तसेच राज्यात सर्वोत्कृष्ट काम होईल, या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन बँकेच्या प्रतिनिधींना यावेळी केले.
मुद्रा बँक योजनेची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी व जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी तक्रार सोडविण्यासाठी प्रथम स्वतंत्र सेल तयार करण्यात आला आहे. जिल्हयातील उद्योग अथवा व्यवसाय सुरु करणाऱ्या प्रत्येक उत्सूक नागरिकांना त्यांच्या पात्रतेनुसार कर्जाचे वाटप करावे. जिल्हयातील शिशू योजनेमध्ये 1 लाख 51 हजार 847 नागरिकांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले असून सरासरी 33 टक्के नागरिकांना नियमितपणे कर्जाची वसूली होत आहे. मागील वर्षी 864 कोटी रुपयाचे वाटप करण्यात आले होते. यावर्षी सुध्दा चांगले काम करावे, असेही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले.
मुद्रा बँक कर्ज योजनेअंतर्गत शिशू, किशोर व तरुण योजनेसोबत स्टॅन्डअप व स्टार्टअप या योजनेमध्ये युवकांना सहज व सूलभ कर्ज पुरवठा करण्यासाठी विविध बँकाने युवकांसाठी कर्जमेळावे आयोजित करावे अशी सूचना समितीचे सदस्य व आमदार प्रा. अनिल सोले यांनी यावेळी केले. फार्चून फाऊंडेशनतर्फे येत्या 22 ते 24 फेब्रुवारी या कालावधीत डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात युथ एम्पॉवरमेंट समिट आयोजित करण्यात आला आहे. येथे किमान एक लाख युवक उपस्थित राहणार असून त्यांना मुद्रा बँक योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती देण्यासाठी जिल्हयातील सर्व बँकांनी आपले स्टॉल लावून युवकांना मुद्रा बँक योजने संदर्भात मार्गदर्शन करावे अशी सूचना बँकेच्या अधिकाऱ्यांना केली.
जिल्हयात विविध बँकाच्या 560 शाखा असून या शाखामार्फत ग्रामीण व शहरी भागातील उद्योग सुरु कणाऱ्या युवकांना मार्गदर्शन करण्यासोबतच तालुका स्तरावर या योजनेच्या प्रचार व प्रसार करण्यासाठी कर्ज मेळावे आयोजित करण्यात येत आहे. तालुका स्तरावर यासाठी प्रत्येकी एक लक्ष रुपये संबंधित तहसिलदारांना उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे यावेळी सांगितले. मुद्रा बँक योजनेमध्ये नागपूर जिल्हा राज्यात आघाडीवर राहील यादृष्टीने सर्व बँकांनी या योजनेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शन करुन त्यांचा सहभाग मिळावा असे आवाहनही मुद्रा बँक योजना समन्वय समितीतर्फे करण्यात आले.
प्रारंभी समितीचे सदस्य सचिव कृष्णा फिरके यांनी मुद्रा बँक योजनेअंतर्गत प्रचार व प्रसिध्दी संदर्भात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाबाबत माहिती दिली.
0000000


No comments:

Post a Comment