Saturday, 3 February 2018

सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमातील महिला उद्योजकांना ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स-2018’ समारंभात पुरस्कार देणार


नागपूर, दि. 3 :  राज्यातील महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण-2017 नुसार राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिला उद्योजकांना या महिन्यात मुंबई येथे आयोजित मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स-2018 समारंभात प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.
खालील पात्रता व निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक महिला उद्योजकांनी  5 फेब्रुवारी 2018 पूर्वी विहित नमुन्यातील अर्ज सर्व कागदपत्रांसह उद्योग सहसंचालक, नागपूर विभाग, नागपूर, 2रा माळा, उद्योग भवन, सिव्हिल लाईन्स, नागपूर अथवा महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, नागपूर 2रा माळा. उद्योग भवन, सिव्हिल लाईन्स नागपूर येथे सादर करण्याचे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, नागपूर यांनी केले आहे.
पात्रता : महिला उद्योजकांचे 100 टक्के भांडवल(एकल मालकी घटक), भागीदारी घटक ज्यामध्ये 100 टक्क भाग भांडवल(भागीदारी घटक), सहकार कायद्यांतर्गत ज्या सहकारी संस्थेमध्ये 100 टक्के महिला उद्याजकांचा समावेश असलेली संस्था(सहकारी क्षेत्र), ज्या घटकामध्ये महिला उद्योजकांचे किमान 100 टक्के भाग भांडवल असेल अशी कंपनी (खाजगी किंवा सार्वजनिक मर्यादित घटक), जो बचत गट नोंदणीकृती असून सदर व्याख्येतील क्रमांक 3 आणि 4 नुसार स्थापित झालेले आहेत(स्वयं सहाय्यता बचत गट) या घटकांमध्ये 50 टक्के महिला कामगार असलेल्या उपक्रमांना योजनेंतर्गत प्रोत्साहनासाठी पात्र समजण्यात येईल.
निकष : पुरस्कार्थी महिला उद्योजिका 14 डिसेंबर 2017 च्या शासन निर्णयामध्ये विहित करण्यात आलेल्या महिला उद्योजकांच्या व्याख्येमध्ये बसणारी असावी. उद्योग घटक गेल्या 3 वर्षांत सतत उत्पादनात असावा, महिला उद्योग घटकास राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत यापूर्वी कुठलाही पुरस्कार मिळालेला नसावा, उद्योग घटकाची निवड करताना विविध मुद्यांचा समावेश करण्यात येईल. उदा. गेल्या 3 वर्षांत घटकाची उत्पादन रोजगार निर्मिती, गुंतवणूक व नफा याद्वारे दिलेला वाढीचा दर, तंत्रज्ञानाची निवड व वापर(स्वत: विकसित केलेले/ स्वदेशी/ परदेशी) उद्योजिकेची पार्श्वभूमी, प्रथम पिढीची उद्योजिका आहे किंवा कसे? उद्योग उभारतणीत स्वावलंबित्व उद्योगाच्या स्थानाची निवड, उत्पादनाचा विकास(संशोधन व विकासासाठीचे प्रयत्न, गुणवत्ता नियंत्रणासाठी उपाय), आयात पर्यायी उत्पादन व निर्यात, डायर्व्हसिफिकेशन व बाजारपेठत नव्या उत्पादनाचा यशस्वीपणे समावेश, उद्योगाचे व्यवस्थापन यामध्ये इन्व्हेंटरी कंट्रोल, लेखे, मार्केटिंग बाबत कामगार कल्याण, उद्योजिका अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीची असल्यास अधिकचे गुण देण्यात येतील, अशी माहिती नागपूरच्या जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
                                                            *****


No comments:

Post a Comment