Friday, 2 February 2018

भारतातील पहिल्या सुसज्ज ‘कमांड ॲण्ड कंट्रोल’ रुममुळे प्रभावी वनसंवर्धन व संरक्षण - सुधीर मुनगंटीवार

* वनविभागाच्या सर्व संपत्तीचे संरक्षण
* वन्य प्राण्यांच्या संरक्षण करणे सुलभ
* 4 कोटी वृक्ष लागवडीची एकाच ठिकाणी माहिती
* पारदर्शक आणि प्रभावीपणे नियंत्रण
नागपूर, दि. 2 :  वन्य जीवांच्या सरंक्षणसोबतच वन संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे नियंत्रण व समन्वय ‘कमांड ॲण्ड कंट्रोल’ रुमच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे सुलभ होणार आहे. अत्याधुनिक तंत्राचा वापर तसेच जीआयएस प्रणालीसह सुसज्ज असलेली ही देशातील पहिली ‘कमांड ॲण्ड कंट्रोल’ रुम असल्याचे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  केले.
वनभवन येथे वनसंरक्षण व संवर्धनासोबतच वन्यजनावरांच्या संरक्षणासाठी तसेच नियंत्रणासाठी तयार करण्यात आलेल्या ‘कमांड ॲण्ड कंट्रोल’ रुमचे उद्घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी वन राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री. भगवान, राज्याच्या वन्यजीव विभागाचे प्रमुख ए. के. मिश्रा तसेच वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील वन विभागामध्ये पारदर्शकता व गतिमानता आणण्यासोबतच वनसंरक्षण व संवर्धन तसेच प्रभावी नियोजनासाठी एकाच ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध व्हावी यासाठी मुंबई, हैद्राबाद, भोपाळ भारतातील आदी ठिकाणी असलेल्या नियंत्रण कक्षाचा अभ्यास करुन अत्याधुनिक तंत्राचा वापर असलेली आणि व्हिडिओ वॉल तसेच जीआयएस प्रणाली असलेली सर्वोकृष्ट ‘कमांड ॲण्ड कंट्रोल’ तयार करण्यात आली आहे. यासाठी  1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या अत्याधुनिक ‘कमांड ॲण्ड कंट्रोल’ रुममुळे प्रशासन तसेच प्रत्यक्ष नियोजनामध्ये प्रभावी समन्वय होणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
देशात सर्वाधिक लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रमानुसार यावर्षी 13 कोटी वृक्ष लागवड व पुढील 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असून या अत्याधुनिक नियंत्रण कक्षामुळे वृक्ष लागवडीबद्दल जनतेमध्ये विश्वास व प्रेम निर्माण होईल. तसेच लावलेल्या प्रत्यक्ष माहिती घेणे सुलभ होणार असल्याचे सांगताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, 1 जुलै ते 30 जुलैपर्यंतच्या वृक्षारोपण मोहिमेचे नियंयत्रण ‘कमांड ॲण्ड कंट्रोल’ रुममधून करण्यासाठी व्यक्तीश: उपस्थित राहणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. 
‘कमांड ॲण्ड कंट्रोल’ रुमला राज्यातील प्रधान मुख्य वनसंरक्षक, मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक आदी कार्यालय थेट जोडण्यात आली आहेत. त्यामुळे प्रत्येक योजनांच्या तसेच आकस्मिक परिस्थिती हाताळण्यासाठी यापुढे शक्य होणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
मानव आणि वन्यजीव संघर्षाच्या घटनासंदर्भात बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जनेतचा विश्वास संपादन करणे आवश्यक आहे. वन हे रोजगाराचे साधन आहे. ही भावना वनाशेजारी राहणाऱ्या जनतेमध्ये निर्माण केल्यास वन व वन्यजीव संरक्षणासाठी  जनतेचा सहभाग प्राप्त होईल. श्यामाप्रसाद मुखर्जी जनधन योजनेच्या माध्यमातून वनाच्या संरक्षणासाठी चांगला सहभाग मिळत आहे. असेही ते म्हणाले.
जंगलातील वन्यजीवापासून मानवाला धोका निर्माण होत असल्यास अशा परिस्थितीत पर्यावरण प्रेमी तसेच निवृत्त न्यायाधीश आणि स्वयंसेवी संस्थासोबतच एनटीसी यांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती गठीत करावी. तसेच स्थानिक जनतेमध्ये विश्वास निर्माण होईल या दृष्टीने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच यासाठी विशेष प्रशिक्षित दल निर्माण करावे, अशी सूचनाही यावेळी त्यांनी केली. वन विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या हॅलो फॉरेस्ट-वन वाहिनी पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
‘कमांड ॲण्ड कंट्रोल’ व जीआयएस कक्षासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा यांनी वन्यजीव व मानव यासंदर्भात घडलेल्या घटनांची माहिती व त्यावर असलेल्या उपाययोजनाबाबतचे सादरीकरण यावेळी केले. स्वागत प्रसिद्धी व माहिती अधिकारी सुभाष डोंगरे यांनी तर आभार वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शना पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे संचालन राजेश मेश्राम यांनी केले.

****

No comments:

Post a Comment