Friday, 2 February 2018

ॲमेझॉनच्या माध्यमातून वनोपजांच्या विक्रीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर - सुधीर मुनगंटीवार

* नागपूर येथे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या परिषदेचे उद्घाटन

नागपूर, दि. 2 :  बिजा लाकडापासुन तयार झालेला ग्‍लास हा अॅमेझॉन या अॅप वर विक्रीसाठी उपलब्‍ध करण्‍यात आला असुन अशा पध्‍दतीने वनोपजाची विक्री अॅमेझॉनच्‍या माध्‍यमातुन करण्‍याच्‍या प्रक्रियेत महाराष्‍ट्र देशात आघाडीवर असल्‍याचे प्रतिपादन अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

नागपूर येथे आज वरिष्‍ठ वनाधिका-यांच्‍या परिषदेच्‍या उदघाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, केंद्र सरकारच्‍या अर्थसंकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन ज्‍या घोषणा वनविभागासाठी करण्‍यात आल्या आहेत. त्‍यांचा योग्‍य अभ्‍यास करून, अर्थसंकल्‍पात वनविभागाला मिळालेल्‍या बाबींचे योग्‍य विश्‍लेषण करून राज्‍याला त्‍याचा लाभ कसा मिळेल, जास्‍तीत जास्‍त निधी कसा उपलब्‍ध होईल, यादृष्‍टीने प्रभावी पाठपुरावा करण्‍याची गरज आहे. कोणतीही सरकारी यंत्रणा पाठिशी नसताना योगगुरू रामदेव महाराज हे आत्‍मविश्‍वासाच्‍या बळावर पतंजली समुहाचा गाडा यशस्‍वीपणे पुढे नेत आहेत. त्‍याच आत्‍मविश्‍वासाच्‍या बळावर वनविभाग सुध्‍दा यशस्‍वीपणे पुढे जावू शकतो. यासाठी प्रबळ इच्‍छाशक्‍तीची आवश्‍यकता असल्‍याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्णाले. चंद्रपूरच्‍या वन अकादमीमध्‍ये राष्‍ट्रीय कौशल्‍य विकास केंद्र स्‍थापन करण्‍याच्‍या मागणीसाठी नवी दिल्‍लीत केंद्रीय कौशल्‍य विकासमंत्र्यांची भेट घेतली असता त्‍यांन कौशल्‍य विकासाचे विद्यापीठच स्‍थापन करण्‍याची भुमीका घेतली. आपला पाठपुरावा व सादरीकरण उत्‍तम असल्याने त्‍यांचे फलीत उत्‍तमच असेल, असेही ते यावेळी बोलताना म्‍हणाले.
   या परिषदेच्‍या उदघाटन समारंभाला वनविभागाचे राज्‍यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, वन विकास महामंडळाचे अध्‍यक्ष चंदनसिंह चंदेल, सचिव विकास खारगे, प्रधान मुख्‍य वनसंरक्षक श्री. भगवान, मग्रारोहयोचे आयुक्‍त नाईक यांच्‍यासह वनाधिका-यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व वन राज्‍यमंत्री राजे अंबरीश आत्राम यांच्‍या हस्‍ते सिव्‍हील लिस्‍ट 2018, विकासाच्‍या हिरव्‍या वाटा, डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना, माळढोक अभयारण्‍यातील पक्षी व इतर वन्‍यजीव, फाऊंड ऑफ जळगांव डिस्‍ट्रीक्‍ट, फ्लॉवर्स ऑफ जळगाव डिस्‍ट्रीक्‍ट , सिंधुवाणी, सागवेश्‍वर व राधानगरी अभयारण्‍य या पुस्‍तकांचे विमोचन करण्‍यात आले.
****




No comments:

Post a Comment