Tuesday, 27 March 2018

लोकसहभागाचे मिळावे उदंड बळ सर्वजण मिळून करू १३ कोटी वृक्ष लागवड वनमंत्र्यांचे मान्यवरांना पत्राद्वारे आवाहन

मुंबई, दि. 27 : हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वन विभागाने लोकसहभागातून तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून २०१८ च्या पावसाळ्यात राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प आहे. मागील दोन वर्षांच्या वृक्ष लागवड कार्यक्रमात ज्याप्रमाणे लोकसहभागाचे उदंड बळ मिळाले त्याप्रमाणेच १३ कोटी वृक्ष लागवडीलाही ते मिळावे आणि आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून यावर्षीचा वृक्ष लागवडीचा संकल्पही पूर्णत्वाला जावा, असे आवाहन करणारे पत्र वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील सर्व मान्यवरांना पाठवले आहे.
वनमंत्र्यांनी या आशयाचे पत्र  राज्यातील सर्व विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्यराज्यातील लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य, सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, सर्व महानगरपालिकांचे महापौर, नगरपालिका अध्यक्ष, पंचायत समित्यांचे सभापती यांना पाठवले आहे. जागतिक वन दिनाचे औचित्य साधून वनमंत्र्यांनी या सर्व मान्यवरांना पाठवलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे कीसंयुक्त राष्ट्र संघाने यावर्षी  फॉरेस्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटीजहे घोषवाक्य निश्चित केले आहे. प्रदुषण कमी करून शहरांना मोकळा आणि आरोग्यदायी श्वास द्यायचा असेल, दुष्काळावर मात करायची असेल तर वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाशिवाय पर्याय नाही. याच हेतूने महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने पुढाकार घेऊन हरित महाराष्ट्राचे बीज मनामनात रुजवण्याचे आणि मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याला यशही मिळत आहे. सन २०१५ मधील तुलनेत २०१७ मध्ये वनेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादन २७३ चौ. कि.मी ने वाढले आहे. देशपातळीवर महाराष्ट्राने यात पहिला क्रमांक नोंदवला आहे. हे क्षेत्र एकूण भुभागाच्या ३.१९ टक्के इतके आहे. वनेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादन वाढीबरोबर महाराष्ट्राने बांबू लागवड, कांदळवन संरक्षण आणि संवर्धनवनामधील जलसंपदेची कामे यासारख्या इतर क्षेत्रातही देशपातळीवर अग्रस्थान पटकावले आहे. वनसंवर्धनातील वाढत्या लोकसहभागाने हे शक्य झाले आहे.
राज्यात हरित महाराष्ट्राचे महत्वाकांक्षी पाऊल पडले ते १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी २ कोटी ८३ लाख वृक्ष लागवड होऊन. नंतर २०१७ साली चार कोटी संकल्पाच्या बदल्यात राज्यात एका सप्ताहात ५ कोटी ४३ लाख वृक्ष लागवड झाली. सलग दोन वर्षे या वृक्ष लागवडीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकार्डसमध्ये घेण्यात आली.  वृक्ष लागवडीचा संकल्प विभागाचा न राहाता तो लोकांचा संकल्प झाला आणि अबाल वृद्धांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन हजारो हातांनी वृक्ष लावले, निसर्गाची उपासना केली.  आता ४६ लाख हरित सेनेचे या संकल्पाला पाठबळ मिळाले आहे. www.greenarmy.mahaforest.gov.in  या संकेतस्थळावरून आपल्या सर्वांनाही हरित सेनेचे सदस्यत्व घेता येणार आहे.  वृक्ष लागवडीच्या कामात सहभागी होता येणार आहे.  ही संख्या आपल्या सर्वांना मिळून १ कोटी सदस्यांपर्यंत न्यायची आहेआपल्या जिल्ह्यातील, मतदार संघातील लोकांना जास्तीत जास्त यात सहभागी करून घेण्याच्यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी या पत्रातून म्हटले आहे.
राज्यात २०१८ च्या पावसाळ्यात आपल्या सर्वांच्या सहभागातून राज्यात १३ कोटीच नाही तर विक्रमी वृक्ष लागवड होईल असा विश्वास वाटत असल्याचे तसेच यासाठी सर्वांनी समन्वयाने गाव, तालुका, जिल्हा आणि राज्यपातळीवर काम करण्याची गरज असल्याचेही वनमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे.
००००

No comments:

Post a Comment