मुंबई, दि. 26 : राज्यातील प्रत्येक
शासकीय रुग्णालयात टप्प्या-टप्प्याने कर्करोग पूर्वतपासणी केंद्र (प्री- कॅन्सर
डिटेक्शन सेंटर) सुरू करण्यात येणार असून केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करुन
देण्याचेही प्रस्तावित आहे, अशी
माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज विधानसभेत दिली.
कर्करोगाच्या संदर्भात सदस्य उल्हास
पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली. यावर उत्तर देताना डॉ. सावंत यांनी माहिती
दिली, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून शासकीय आणि खासगी अशा एकूण 229
रुग्णालयात वेगवेगळ्या कर्करोगावर उपचार केले जातात. त्यामध्ये 68 हजार 300
रुग्णांना केमोथेरपीचे उपचार देण्यात आले आहेत. रेडिओथेरपीच्या माध्यमातून 59 हजार
838 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. तर 38 हजार 384 इतक्या रुग्णांवर
शस्त्रक्रियेच्या माध्यमातून उपचार करण्यात आले आहेत.
सदस्य उल्हास पाटील यांनी शिरोळ
तालुक्यात कर्करोग रुग्णांची संख्या मोठी संख्या असल्याचे सांगितले, त्यावर माहिती देताना डॉ. सावंत म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात कर्करोगाच्या (कॅन्सर) रुग्णांची नोंद
घेण्यासाठी येत्या दोन महिन्यात टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूटमार्फत कर्करोग नोंदणी
केंद्र (कॅन्सर रजिस्ट्री सेंटर) सुरू करण्यात येईल. त्या सर्वेक्षणातून उपलब्ध
होणाऱ्या माहितीच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांविषयी निर्णय घेण्यात येईल.
डॉ. सावंत पुढे म्हणाले, मालवणी येथे नुकतेच
प्री कॅन्सर डिटेक्शन सेंटर सुरु केले असून येणाऱ्या महिन्यात तेथे केमोथेरपी
सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याच धर्तीवर राज्यातील प्रत्येक शासकीय
रुग्णालयात प्री- कॅन्सर डिटेक्शन सेंटर आणि केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करुन
देण्याचे प्रस्तावित आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून कॅन्सर
रुग्णांना सध्या केमोथेरपीच्या 2 टप्प्यांचा (Cycle) लाभ देण्यात येत असून यापुढे हा लाभ उपचारासाठी 4 टप्प्यांचा करता येईल का
यावर विचार करण्यात येईल. तसेच टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून
राबविण्यात येत असलेली ‘कॅन्सर
वॉरिअर’ ही संकल्पनाही अधिक प्रमाणात
राबविण्यात येईल.
राज्य शासनाकडून कर्करोग रुग्णांवर
टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूट सोबतच नागपूर येथील संत तुकडोजी महाराज हॉस्पिटल तसेच
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट या मोठ्या संस्थेत उपचार केले जात आहेत. विभागीय
स्तरावर नागपूर, औरंगाबाद तसेच अमरावती येथे
कॅन्सरवर उपचार करण्याची शासनाची स्वत:ची सुविधा उपलब्ध आहे. तसेच ज्या- ज्या
भागात कॅन्सरच्या उपचाराची आवश्यकता आहे तेथे सर्वेक्षण करुन आवश्यकतेप्रमाणे अशी
सुविधा निर्माण करण्याबाबत निर्णय घेण्यात
येईल.
टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार
सुरू असलेल्या रुग्णांना उपचार सुरू असताना राहण्यासाठी गोवंडी येथे दोन इमारती
बांधण्याचे प्रस्तावित असून त्यामध्ये 300 सदनिकांची सोय करण्यात येईल. याठिकाणी जीवनावश्यक सेवांसह आपत्कालीन परिस्थितीत
उपचारासाठी डॉक्टरही उपलब्ध असेल, असेही
त्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य
सर्वश्री सत्यजीत पाटील, सरदार
तारासिंग, शशिकांत शिंदे, अजय चौधरी, श्रीमती
भारती लव्हेकर, श्रीमती वर्षा गायकवाड यांनी
सहभाग घेतला.
००००
No comments:
Post a Comment