* 29 व्या राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा पंधरवडा आजपासून सुरु
* ‘सडक सुरक्षा,
जीवन
रक्षा’ ब्रीदवाक्य
* रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त
येत्या 7
मे पर्यंत विविध जनजागृतीपर
कार्यक्रमाचे आयोजन
नागपूर, दि. 23 : रस्त्यावरील अपघाताचे
प्रमाण कमी होण्यासाठी कायद्यासमवेतच
वाहन चालकांची सजगता महत्वपूर्ण
आहे. वाहन चालवितांना नियमांची काटेकोर
अंमलबजावणी होणे आवश्यक असून
याबाबत जागरुकता निर्माण होण्यासाठी
जनसहभाग महत्वपूर्ण असल्याचे मत सहपोलिस
आयुक्त शिवाजी बोडखे यांनी
व्यक्त केले.
गिरीपेठ येथील
प्रादेशिक परिवहन कार्यालयात आज रस्ता
सुरक्षा पंधरवड्याचे उद्घाटन करण्यात
आले.
त्यावेळी ते बेलत होते.
यावेळी पोलीस
अधिक्षक (ग्रामीण) शैलेश बलकवडे, उपायुक्त महसूल
सुधाकर तेलंग, माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयाचे संचालक राधाकृष्ण मुळी, प्रादेशिक परिवहन
अधिकारी श्रीपाद वाडेकर तसेच पोलिस विभाग, प्रादेशिक
परिवहन कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन
कार्यालय त्याचप्रमाणे संबंधित विभागाचे
अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना
सहपोलिस आयुक्त शिवाजी
बोडखे म्हणाले, रस्ते अपघाताचे
प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन
विभाग, वाहतूक विभागाने केलेले प्रयत्न
व जनजागृती, नवनवीन उपक्रम यामुळे शहरातील
नागरिकांनी ‘हेल्मेट’ वापरासंबंधी सहकार्य केले. सीसीटीव्ही नेटवर्क, ई-चलान
या उपक्रमामूळे बेशिस्त
वाहतुकीवर कारवाई करणे
सोपे झाले. यामुळे लोकांमध्ये
धाक बसून वाहतूकीच्या शिस्तीत
वाढ झाली. रस्ते अपघातात
जास्त प्रमाणात तरुणांचा समावेश
असतो. यासाठी भावी पिढीला वाहतूकीचे
नियम, ते पाळण्याचे फायदे, स्वत:
बरोबरच इतरांची घ्यावयाची काळजी
याबाबत जागृती निर्माण होणे
आवश्यक आहे. रस्ता सुरक्षा
पंधरवडा हा फक्त साजरा
न करता यातून सुरक्षित प्रवासासाठी
लोकप्रबोधन व जागृती करण्यासाठी
सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन
त्यांनी केले.
पोलिस अधीक्षक
शैलेश बलकवडे म्हणाले, सामाजिक
उपक्रमांतर्गत वर्षभरापासून रस्ते
अपघाताचे प्रमाण कमी व्हावे
यासाठी
ग्रामीण पोलिस विभागाच्या वतीने सशक्त भारत अभियान राबविल्या जात आहे. रस्त्यांवरील अपघाताचे
प्रमाण कमी करुन सुरक्षित
रस्ते प्रवास करण्यासाठी वाहनचालकांच्या वैयक्तिक जबाबदारी समवेतच
रस्ते बांधणीतील अभियांत्रिकी त्रुटीदेखील
कारणीभूत आहेत. वाहनचालकांवरील कार्यवाही
बरोबरच त्या नियमासंबंधी नागरिकांचे
प्रबोधन होणे गरजेचे आहे. नागरिकांबरोबरच मुलांना वाहतूकविषयक शिक्षणासाठी
प्रशिक्षण द्यावे.
महसूल उपायुक्त
तेलंग म्हणाले, आपल्या देशात
रस्ते अपघाताच्या प्रमाणाची आकडेवारी
वाढत आहे. बरेचदा गाडीमध्ये
एअर बॅग्ज नसल्यामुळे अपघात
होतात. मुळात वाहन चालविण्याचा परवाना
मिळणे ही बाब कठीण
असली पाहीजे. परवाना देण्यापूर्वी
वाहन चालकांच्या सर्व परीक्षा
व्यवस्थित पार पडायला
हव्यात. शालेय विद्यार्थ्यांना शाळेत
रस्ता सुरक्षेबद्दल दर 2-3 महिन्यांनी तज्ज्ञामार्फत
प्रशिक्षण द्यावे, जेणेकरुन भावी
पिढीला रस्ते वाहतुकीच्या
नियमांबद्दल आगावू माहिती मिळेल.
माहिती व जनसंपर्क
विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी
म्हणाले, रस्ते अपघाताच्या प्रमाणात वाढ
होण्यामध्ये इतर कारणांमध्ये ‘मोबाईल’
हे देखील महत्वाचे कारण
आहे.
इअर फोन घालून वाहन
चालविणे, ट्रॅफिक सिग्नल तोडणे, दारु
पिवून वाहन चालविणे अशा
मानवी चुकांमुळे रस्ते अपघाताचे
प्रमाण वाढले आहे. रस्ते अपघात
थांबविण्यासाठी वाहन चालकांची वैयक्तिक
जबाबदारी महत्वपूर्ण आहे. अपघातावर नियंत्रण
मिळवण्यासाठी शासनाप्रमाणेच
नागरिकांचे देखील कर्तव्य असल्याचे
मत त्यांनी यावेळी व्यक्त
केले.
प्रास्ताविकात प्रादेशिक
परिवहन अधिकारी शरद जिचकार
म्हणाले, रस्ता सुरक्षा पंधरवडा हा केवळ
ठराविक कालावधी साठीच नसून
या अभियानामुळे रस्ते
सुरक्षेबाबत उजळणी होते. ‘सुरक्षित
रस्ता प्रवाह’ हा प्रत्येक
नागरिकाचा हक्क आहे. रस्ता सुरक्षा
अभियानाबाबत नागरिकांमध्ये प्रसार
आणि प्रचार व्हावा यासाठी
रस्ता सुरक्षा पंधरवडा दरवर्षी
आयोजित केला जातो. यंदाचे या अभियानाचे
29 वे वर्ष आहे. देशभर रस्ता
सुरक्षा पंधरवडा आयोजित करुन
विविध जनजागृतीपर कार्यकम आयोजित
केले जातात. येत्या कालावधित प्रादेशिक
परिवहन कार्यालय तसेच पोलिस
विभागाच्या वतीने अवयवदान जनजागृती, प्रथमोपचार, ड्रायव्हिंग स्कूलच्या
तपासण्या आदी उपक्रम आयोजित केल्या
जातील. वाहन परवाना
नुतनीकरणसाठी चालकांना वाहतूक
नियमांचा उजळणी वर्ग आवश्यक
आहे.
यामुळे रस्ते वाहतूकीत सुसुत्रता
निर्माण होत असल्याचे त्यांनी
यावेळी सांगितले.
ग्राहक न्याय
परिषद व इंडियन
सोसायटी ऑफ अनेस्थेशिया, नागपूर शाखा
या संस्थेच्या वतीने
उद्या दिनांक 24 एप्रिल 2018 रोजी ‘बेसिक
लाईफ सपोर्ट’ या उपक्रमाअंतर्गत ‘तुम्ही
एक जीव वाचवू शकता’
हा कार्यक्रम प्रादेशिक परिवहन
कार्यालयात सकाळी 11 वाजता आयोजित
करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला
जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद
जिचकार यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी ‘रस्ता
सुरक्षा प्रदर्शना’चे उद्घाटन
मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संचालन
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी
मार्तंड नेवासकर तर आभार
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी
मानले.
****
No comments:
Post a Comment