नागपूर, दि. 22 :कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व संबंधित विभाग, घटक व यंत्रणांनी एकत्रितपणे व
समन्वयाने काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय
मृदा सर्वेक्षण आणि भूमि उपयोग नियोजन केंद्राच्या डॉ. एस.पी. रायचौधरी सभागृह
येथे कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन-उपाययोजना यासंदर्भात बैठकीचे आयोजन
करण्यात आले. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग, कृषीमंत्री पांडुरंग
फुंडकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृषीमुल्य
आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार रणधीर सावरकर, आमदार आशिष देशमुख, विजय
जावंधिया, कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजय कुमार, कृषी आयुक्त विजय झाडे, विभागीय
आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, लोकप्रतिनिधी, कृषी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व मान्यवर उपस्थित
होते. ही बैठक सुमारे साडेतीन तास चालली.
कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजना यासंदर्भातील पुस्तिका, माहितीपत्रक व
भिंतीपत्रक तसेच ‘आत्मा’ नागपूर यांच्यामार्फत विकसित करण्यात आलेल्या
एन.ओ. एफ.पी.सी. या ब्रँडचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व संबंधित विभाग व
यंत्रणांनी एकत्रितपणे व समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव
रोखण्यासंदर्भातील माहिती शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या बांधावर पोहोचून देण्यात
यावी. यासाठी अधिक सजगतेने काम करावे. बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य
शासनामार्फत मदत देण्याचे काम सुरु आहे. या पुढील काळात अशा प्रकारची समस्या
उद्भवणार नाही, यासाठी विशेष उपाययोजना करण्यावर भर द्यावा लागेल. सेंद्रिय शेती
सर्वांर्थाने उपयुक्त असून या शेतीला तसेच
गटशेतीच्या संकल्पनेलाही प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस
यांनी सांगितले. गुजरातच्या शेतकऱ्यांनाही या संकटाला सामोरे जावे लागले. तेथे योजलेल्या
उपायांना सर्व संबंधितांनी समन्वयाने आणि वेळेत त्यांची कामे केल्यामुळे यश लाभले.
याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले आणि आपल्या यंत्रणांना बोंडअळीवरील उपायाबाबत
शेतकऱ्यांशी थेट संवाद साधावा लागेल असे सांगितले.
केंद्रिय कृषी मंत्री राधामोहन सिंग म्हणाले,
कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या विविध उपाययोजना, तसेच
यासंदर्भातील नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. माहिती पुस्तिकांसारख्या
माध्यमातून यासंदर्भात व्यापक प्रचार- प्रसार करण्यात यावा. ज्या शेतकऱ्यांचे
नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे. महाराष्ट्रात जलयुक्त
शिवार अभियानअंतर्गत जलसंधारणाची विविध कामे प्रभावीपणे झाली असून राज्यात दुग्ध
व्यवसायालाही चालना देण्यात येत असल्याचे कृषीमंत्री सिंग यांनी सांगितले.
कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले, कपाशीवरील
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने यंदा तातडीने उपाययोजना
करण्याचे ठरविले असून यासंदर्भात शेतकऱ्यांपर्यत याबाबतची माहिती पोहोचवून त्यांना
प्रशिक्षित करण्यात येईल. बिटी बियाणांबरोबरच देशी बियाणेही शेतकऱ्यांना उपलब्ध
करुन द्यावे लागेल. दोषी असलेल्या बियाणे कंपन्यांवर कारवाई करण्यात आली असून कृषी
विभाग सतर्क असून शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ दिली जाणार नाही,
असेही श्री. फुंडकर यांनी सांगितले.
कृषी विभागचे अतिरिक्त मुख्य सचिव विजय कुमार
म्हणाले, गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभाग व संबंधित
विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिक सतर्कतेने काम करावे. प्रारंभिक स्थितीमध्येच या
समस्येचे प्रतिबंधन करणे आवश्यक असते. गुणनियंत्रण प्रणाली अधिक प्रभावी करण्यात
आली असल्याचे श्री. विजयकुमार यांनी सांगितले.
केंद्रिय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ.
विजय वाघमारे म्हणाले, कापूस उत्पादनात देश अग्रेसर असून कापसाच्या लागवडीखालील
क्षेत्रही वाढते आहे. बिटी कपाशीचा आपण स्विकार केला. मात्र कपाशीवरील गुलाबी
बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी कपाशीचा हंगाम जानेवारी
महिन्यापर्यंतच घेणे, पीकांमध्ये बदल करणे, आश्रय पिके घेणे यासारखे बदल करण्याची
आवश्यकता आहे. नकली बियाणांचा वापर शेतकऱ्यांनी
कटाक्षाने टाळावा असेही, डॉ. वाघमारे यांनी सांगितले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे
कुलगुरु डॉ. बी. व्यंकटेश्वरलु म्हणाले,
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने
सर्वप्रथम पाऊले उचलली. याच्या प्रतिबंधासाठी कडूनिंबाचा वापरही उपयुक्त ठरत
असल्याचे निर्देशनास आले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे
कुलगुरु डॉ. विलास भाले तसेच गुजरातचे कृषी विभागाचे उपसंचालक पि.बी. खिस्तारिया
यांनीही गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाय योजना
संदर्भातील सादरीकरण केले.
यावेळी पवनार येथील शेतकरी डॉ. नंदकिशोर तोटे व
सडक अर्जुनी येथील शेतकरी देवाजी बनकर यांनी मनोगत व्यक्त केले. कृषी राज्यमंत्री
सदाभाऊ खोत यांनी आभार मानले.
****
No comments:
Post a Comment