विशेष वृत्त :
मुंबई, दि. 23 :
लाईव्ह वेबिनारद्वारे राज्यातील साडेपाचशेपेक्षा अधिक महाविद्यालये, शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी
इंटरनेटच्या माध्यमातून 10 मे रोजी होणाऱ्या सी.ई.टी परीक्षेसंदर्भात लाईव्ह
स्ट्रिमिंगद्वारे संवाद साधून सी.ई.टी सेलने विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन
केले.
सीईटी सेलतर्फे राज्य तंत्रशिक्षण
संचालनालय आणि कृषी प्रशिक्षण संशोधन केंद्र व पार्थ नॉलेज नेटवर्कच्या सहकार्याने
सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे येथे नुकतेच लाईव्ह मार्गदर्शन वेबिनार आयोजित
करण्यात आला होता. बारावी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी सी.ई.टी ही परीक्षा असून
विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील शिक्षणासंदर्भात हा महत्वाचा टप्पा असतो. त्यामुळे
याचा ताण विद्यार्थी व पालकांवर असतो. हा ताण दूर करण्याचे काम राज्याचा सी.ई.टी
सेल व राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने केले असल्याची माहिती तंत्रशिक्षण
संचलनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली.
या कार्यक्रमास तंत्रशिक्षण संचलनालयाचे सहसंचालक डॉ. सुभाष महाजन, राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद पुणे येथील संचालक डॉ.
हरिहर कौसडीकर आदी उपस्थित होते.
ही सी.ई.टी परीक्षा अभियांत्रिकी, कृषी आणि औषधनिर्माण शास्त्र या शाखांसाठी असून राज्यातील सुमारे चार लाख
32 हजार विद्यार्थी 1260 केंद्रावर परीक्षा देणार आहेत. सी.ई.टी सेल चे आयुक्त
आनंद रायते यांनी ही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शनाची संकल्पना मांडली व
साकारली.
शासन आपल्या दारी हा उपक्रम सरकारतर्फे राबविला जातो. त्यांचीच ही एक पुढची
पायरी म्हणजे राज्य CET Cell व
तंत्रशिक्षण संचलनालय या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या दारी डिजिटल माध्यमातून
पोहचला आहे, विद्यार्थ्यांना या परीक्षेबाबत असलेल्या शंका
निरसन करण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे, असे डॉ. वाघ
यांनी सांगितले. आपल्या राज्याची प्रगती ही सेवा क्षेत्रात अधिक झाली आहे.
औद्योगिक क्षेत्रातील प्रगती वाढविण्यासाठी चांगल्या अभियंत्यांची गरज असते. सीईटी
देणारे विद्यार्थीं ही गरज पूर्ण करणार आहेत, असेही ते
म्हणाले. याच लाईव्ह वेबिनारमधून विविध अभियांत्रिकी शाखांमधील संधी याबाबतही
मार्गदर्शन करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना आपले करिअरची दिशा
ठरविण्यासाठी फायदा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. महाजन म्हणाले की, यंदा सीईटीच्या
अभ्यासक्रमात थोडा फरक केला आहे, तो स्पष्ट व्हावा या
उद्देशाने हा लाईव्ह वेबिनार घेण्यात येत आहे. यंदा प्रथमच अकरावीच्या
अभ्यासक्रमावर आधारित काही प्रश्न असतील.
कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी
राज्यात कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी यंदा प्रथमच एमएचटी सीईटीतून
प्रवेशप्रक्रिया होत आहे, याबाबत माहिती
देताना डॉ. कौसडीकर म्हणाले, कृषी क्षेत्रात व्यवसायाच्या
खूप संधी उपलब्ध आहेत. राज्यात चार विद्यापीठे असून 190 महाविद्यालयातून कृषी
शाखेचे शिक्षण दिले जाते. यात दहा उपशाखांचे शिक्षण दिले जाते, सर्वात मोठे रोजगारनिर्मितीचे हे क्षेत्र असून यात सहभागी होऊन विद्यार्थी
समाजाची पर्यायाने देशाची प्रगती साधू शकतो.
ही परीक्षा म्हणजे कौशल्य मिळविण्याचे प्रवेशद्वार आहे, असे मत पार्थ नॉलेज नेटवर्कचे अध्यक्ष बबनराव मगदुम यांनी
व्यक्त केले. अभियंता, फार्मासिस्ट आणि कृषीतज्ज्ञ
घडविण्याची ही पहिली पायरी असून पुढे जाऊन मी रोजगार देणारा होईन, असा निश्चय लाईव्ह वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी करावा,
असे आवाहन त्यांनी केले.
या लाईव्ह वेबिनारमध्ये राज्य तंत्रशिक्षण संचलनालयाचे उपसंचालक डॉ. राजीव
शेटकर यांनी सीईटीची नियमावली समाजवून सांगितली. त्यानंतर CET च्या विषयानुसार मार्गदर्शन करण्यात आले. यात डॉ. राजेंद्र
कवठेकर, बी.डब्लू भोमे, बी. जी. मापारी,
डॉ. एस. के. नायर हे सहभागी
झाले. अभियांत्रिकी शाखेतील विविध संधी यावर डॉ. एस.एन.सपाली, डॉ. ए. एस. वायल, डॉ. अनुपा सबनीस आणि डॉ. ए.
डब्ल्यू. किवळेकर यांनी माहिती दिली. औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमातील
वेगवेगळ्या वाटा या विषयावर डॉ. अनुराधा मजुमदार आणि डॉ. मंदार कोडगुल यांनी
मार्गदर्शन केले. तर कृषी क्षेत्रातील उपशाखांची माहिती डॉ. एस. एस. माने, डॉ. एस.बी. पतंगे, डॉ. एच.बी. पाटील, डॉ. एस.डी. मसालकर, डॉ. पी.जी. वासनिक, डॉ. शिर्के यांनी दिली.
सामायिक प्रवेश प्रक्रियेबाबत एन.बी. पाटील आणि एस.डी. उपरवाट यांनी
मार्गदर्शन केले. लाईव्ह वेबिनारचे सूत्रसंचलन डॉ. अविनाश लोणकर, उदय अग्निहोत्री आणि डॉ. शार्दुल गांगण यांनी केले.
००००
No comments:
Post a Comment