सभापती विशाल चोरडिया यांचा 'ईओ ग्लोबल सिटीझन पुरस्कार' देऊन गौरव
मुंबई, दि. 20: 'आंत्रप्रेन्युअर्स
ऑर्गनायझेशन' अर्थात 'ईओ' या आंतरराष्ट्रीय उद्योजक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य खादी व
ग्रामोद्योग मंडळाचे सभापती विशाल चोरडिया यांचा 'ईओ ग्लोबल
सिटीझन पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला. राज्यातील मनुष्यबळास कौशल्यवृद्धीची जोड देऊन त्यांना रोजगारक्षम
करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या राज्य सरकारच्या खादी व ग्रामोद्योग
मंडळाच्या ‘महाखादी’ या उपक्रमासाठी श्री.
चोरडिया यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान मिळालेले चोरडिया हे पहिलेच भारतीय असून जगभरातून
आलेल्या १२ नामांकनांमधून ९ परीक्षकांच्या मंडळाने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली. नुकताच
कॅनडा येथील टोरंटो येथे झालेल्या ईओच्या ग्लोबल लीडरशीप परिषदेत 'ईओ'च्या पहिल्या मुख्य
कार्यकारी अधिकारी किंबर्ली हिकॉक स्मिथ यांच्या हस्ते हा पुरस्कार चोरडिया यांना
प्रदान करण्यात आला.
महाखादी हा राज्य सरकारचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम असून
राज्य सरकारच्या खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या अंतर्गत तो राबविण्यात येत आहे.
ग्रामोद्योगांना जगाच्या नकाशावर आणणे, शासनाच्या विविध योजना व सामान्य नागरिक यांमध्ये समन्वय राखणे व
त्याद्वारे स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे हा उपक्रमामागील मुख्य उद्देश
आहे.
महाखादी अंतर्गत खादीचा प्रसार व प्रचार करण्याचे काम केले
जाते. यासाठी पुण्यातील कृषी महाविद्यालायाच्या आवारातील हातकागद संस्थेमध्ये
विक्री केंद्र देखील सुरु करण्यात आले आहे. स्वतः एक उद्योजक असलेल्या विशाल
चोरडिया यांनी मंडळाचे सभापती झाल्यावर ‘महाखादी’ उपक्रमाद्वारे सामान्य नागरिकांच्या रोजगार
सक्षमीकरणासाठी राबवलेला हा यशस्वी प्रयत्न लक्षात घेत ईओच्या वतीने चोरडिया यांचा
ग्लोबल सिटीझन पुरस्काराने सन्मान करण्यात
आला.
'ईओ' अर्थात 'आंत्रप्रीनर्स ऑर्गनायजेशन' ही आंतरराष्ट्रीय
दर्जाची उद्योजकांची संघटना असून जगभरातील ५४ देशांत संस्थेचे १७३ अध्याय आहेत. याअंतर्गत सुमारे १२
हजारांहून अधिक उद्योजक जोडले गेले आहेत. युवा उद्योजकांनी १९८७ साली या संघटनेची स्थापना केली असून उद्योजकांनी
एकमेकांपासून काहीतरी शिकावे, आपले
अनुभव शेअर करावेत व स्वत:चा विकास करावा या उद्देशाने या संघटनेची स्थापना
करण्यात आली. उद्योजकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांना
या व्यासपीठावर आपल्या उद्योग व त्या
संबंधित गोष्टींविषयी मार्गदर्शन मिळावे हा या संघटनेचा हेतू आहे.
००००

No comments:
Post a Comment