Thursday, 24 May 2018

तूर खरेदीला मुदतवाढ देण्यास केंद्र शासन अनुकूल शेतक-यांकडून तूर खरेदी केल्याशिवाय खरेदी केंद्र बंद करणार नाही - सहकार मंत्री सुभाष देशमुख




मुंबई, दि. 24 : शेतक-यांकडून तूर खरेदी केल्याशिवाय राज्यातील  खरेदी केंद्र बंद करणार नाही. लवकरच तूर खरेदीला मुदतवाढ मिळणे अपेक्षीत असून शेतक-यांनी तूर खरेदीबाबत आश्वस्त राहावे, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.
तूर खरेदीला मुदतवाढ मिळण्यासाठी आज सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी  केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्या समवेत बैठक घेतली. या बैठकीत केंद्रीय कृषीमंत्र्यांसमवेत सकारात्मक चर्चा झाली असून तूर खरेदीला मुदतवाढ देण्यास केंद्र शासन अनुकूल आहे. या बैठकीला केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यासह केंद्रीय सचिव पटनायकराज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक चढ्ढा उपस्थित होते.
राज्यात यावर्षी 1 फेब्रुवारीपासून हमीभावाने तूर खरेदीला सुरुवात झाली. खरेदीचा विहीत कालावधी संपल्यानंतर 15 मेपर्यंत केंद्र शासनाने मुदतवाढ दिली होती. मात्र यावर्षी तूर खरेदीचे उद्दीष्ट ४४ लाख क्विंटल असून त्यापैकी १५ मे पर्यंत 193 खरेदी केंद्रावर 33 लाख 15 हजार 132 क्विंटल तूर खरेदी झाली आहे. त्यामुळे आणखी मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांची तूर खरेदी होण्यासाठी प्रयत्न सुरू असून केंद्र शासनाने मुदतवाढ देण्यास अनुकूलता दर्शवली आहे. लवकरच मुदतवाढीचे आदेश निघण्याची शक्यता आहे.
००००

No comments:

Post a Comment