* 15 जूनपर्यत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
* 2001 ते 2009 पर्यत या कालावधीतील थकीत कर्जदारांना मिळणार लाभ
नागपूर दि.07 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 7 हजार 314 थकीत शेतकरी सभासदांनाही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी दिनांक 15 जूनपर्यंत कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची शासनाने व्याप्ती वाढविली असून आता 2001 ते 2009 या कालावधीतील थकीत कर्जदार शेतकऱ्यांनाही कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याची योजना शासनाने जाहीर केली असून त्यासाठी या कालावधीतील थकबाकीदार शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या कालावधीतील सुमारे 7 हजार 314 शेतकरी सभासदांना सुधारीत योजनेचा लाभ मिळणार असून सुमारे 100 कोटी रुपयाचे कर्जमाफी मिळणार आहे. या कालावधीत मृत पावलेल्या शेतकरी सभासदांच्या वारसांनी संबंधीत सेवा सहकारी संस्थेत नाव नोंदवून कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कर्जमाफीच्या योजनेचा लाभ देण्यासाठी ग्रामपंचायत सेवा केंद्र तसेच आपले सरकार ग्राम सेवाकेंद्र येथे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या योजनेत पात्र असलेल्या सर्व थकबाकीदार शेतकरी सभासदांनी 15 जून पूर्वी ऑनलाईन अर्ज भरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
जिल्हा बँकेच्या 25 हजार सभासदांना कर्जमाफीचा लाभ
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शासनाने यापूर्वी जाहीर केलेल्या 2009 ते 2016 पर्यंतच्या कालावधीतील थकबाकीदार शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत 25 हजार 087 शेतकरी सभासदांना लाभ मिळाला आहे. बँकेतर्फे या कालावधीत सुमारे 182 कोटी रुपयाची कर्जमाफी मिळाली असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी सांगितले.
*****
No comments:
Post a Comment